कदंबने धडक दिल्यामुळे गिरीत दुचाकीस्वार ठार

0
31

म्हापसा बस्थानकावरून पणजीकडे जाणार्‍या कदंब बसने रस्त्याच्या बाजूने जाणार्‍या डिओ स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार फ्राईड फ्रान्सिस्को आल्मेदा (३८, गिरी) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी सकाळी १०.१५ वा. च्या दरम्यान गिरी येथील ग्रीनपार्क हॉटेलजवळ घडली. कदंब बस (जीए ०३ ०३८२) ही म्हापसा बसस्थानकावरून पणजीकडे जात होती. त्यावेळी त्याच दिशेने आल्मेदा हा आपल्या जीए ०३ एएस ०६०७ या डिओवरून जात होता. यावेळी कदंब बसने डिओला धडक दिली. त्यामुळे आल्मेदा बसखाली सापडला. बसने त्याला फरफटत ओढत नेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
म्हापसा पोलिसांना या घटनेची खबर कळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आल्मेदा याला उपचारासाठी पेडे म्हापसा येथील इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी कदंब बसचालक महेंद्र मनोहर गांवकर (४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक विभा वळवईकर करीत आहेत.