Home बातम्या इफ्फीचे उद्घाटन दर्यासंगमावर वातानुकूलित शामियान्यात

इफ्फीचे उद्घाटन दर्यासंगमावर वातानुकूलित शामियान्यात

0

अंदाजे ६० लाख रु. खर्चून शामियाना उभारण्यात येणार असून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील. लोकांना तेथे बसण्याची सोय असेल, असे इएसजीच्या प्रशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांनी काल सांगितले.

उद्घाटन स्थळी आकर्षक असा सेट उभारण्यात येणार असून त्याची जबाबदारी हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उद्घाटन व समारोप सोहळा असे दोन्ही प्रमुख सोहळे यंदा पणजीतच होणार आहेत.

इफ्फीनिमित्त यंदा राज्यातील किमान ७-८ स्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरलेले असून विविध ठिकाणी उघड्यावर चित्रपटही दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

१० कोटी खर्च अपेक्षित

इफ्फीच्या आयोजनासाठी यंदा गोवा सरकारला अंदाजे १० कोटी रु. खर्च येणार असून त्यापैकी काही कोटी हे प्रायोजकांकडून मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इव्हेंटची जबाबदारी पर्सेप्टवर

इफ्फीसाठी इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनी म्हणून पर्सेप्ट कंपनीची निवड करण्यात आलेली असून उद्घाटन व समारोप सोहळा आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असे वाघ यांनी सांगितले.

प्रतिनिधी बनण्यासाठी ३७०० अर्ज

इफ्फीचे प्रतिनिधी बनण्यासाठी आतापर्यंत ३७०० अर्ज आलेले असून त्यापैकी २८०० जणांचे अर्ज यापूर्वीच मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्घाटनसाठी अक्षय कुमारचे नाव चर्चेत

इफ्फीचे उद्घाटक म्हणून ख्यातनाम अभिनेते अक्षय कुमार यांचे नाव चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.