Home बातम्या इफ्फीचे आज मडगावात उद्घाटन

इफ्फीचे आज मडगावात उद्घाटन

0

महोत्सवासाठी रवींद्र भवनचे नूतनीकरण करण्यात आलेले असून भवनला नवा साज चढवण्यात आलेला आहे. यापूर्वी दरवर्षी उद्घाटन सोहळा पणजीतील कला अकादमीमध्ये होत असे. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कोन्सुल ऑफ बोर्डो’ हा पोर्तुगाली चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. तर ‘धी लेडी’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

यावर्षी कालवश झालेले हिंदी चित्रपट अभिनेते शम्मी कपूर, गायक जगजित सिंग, भूपेन हजारिका व दिग्दर्शक मणी कौल यांचे चित्रपट इफ्फीत दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यंदा महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट व दुर्मिळ असे लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत १६ लघुपट आहेत. तर वसुधा पुरस्कारासाठी ४ लघुपट असल्याची माहितीही त्यांनी दिली.

६० देशातील १६७ चित्रपट

यंदाच्या इफ्फीमध्ये ६० देशातील १६७ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

थ्री-डी चित्रपट

यंदा प्रथमच इफ्फीत थ्री-डी चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून जगभरातील उत्कृष्ट असे थ्री-डी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळाच्या अध्यक्षपदी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदुर गोपाळकृष्णन् यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात अमेरिकी चित्रपटांवर फोकस टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय अभिजात रशियन चित्रपट, पोलंडचे चित्रपट तसेच अन्य पाश्‍चिमात्य देशातील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

फ्रेंच दिग्दर्शक लुरू बेरून यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दाक्षिणात्य अभिनेते सूर्या हे हजर राहणार आहेत.

भारतीय भाषा मंच,

जुने गोवे समितीचा मोर्चा

आजच्या उद्घाटनावेळी निषेध मोर्चा काढण्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंच व जुने गोवे बचाव कृती समितीने ठरविले असून त्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा तैनात केली आहे. उद्घाटनाच्यावेळी सुमारे ८०० पोलीस तैनात करण्यात येणार आहे. काल सकाळी जुने गोवे बचाव समितीची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तारीख बदलण्यावर पुढील वर्षी विचार करू असे सांगितले मात्र त्या आश्‍वासनाने समितीचे समाधान न झाल्याने निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.दरम्यान, इफ्फीच्या पार्श्वभूमीवर मडगावात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवानिमित्त लावलेल्या जाहिरातीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

सरकारी कार्यालये आज २.३० पर्यंत

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे आज पणजी व मडगाव येथील सर्व सरकारी कार्यालये दुपारी २.३० वा. बंद होणार असल्याचे, अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आयनॉक्स मागील रस्ता बंद

इफ्फीनिमित्ताने आयनॉक्स मागील जनरल बर्नांड ग्युडिस रस्ता (पणजी बाजार ते डी.बी. मार्गपर्यंतची लेन) २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.