– दिलीप बोरकर
यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज संध्याकाळी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये होत आहे. मडगाव हे गोव्याचे सांस्कृतिक शहर! या शहराला गोव्याची सांस्कृतिक राजधानीही म्हटले जाते. कारण मठग्रामला प्रदीर्घ संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. त्यातच मडगाव हा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा मतदारसंघही आहे.
गेली सात वर्षे ‘इफ्फी’ गोव्याच्या राजधानीत, पणजी शहरात ओयोजित करण्यात येत होता. उद्घाटनापासून समारोपापर्यंतचे सर्व कार्यक्रम करण्याची मक्तेदारी पणजी शहराला बहाल करण्यात आली होती. आज पहिल्यांदाच ४२व्या इफ्फीचे म्हणजे गोव्यातील ८ व्या इफ्फीचे उद्घाटन स्थळ पणजी शहरातून मडगाव शहरात स्थलांतरित होतेय. उद्घाटन सोहळा मडगावला आणि समारोप सोहळा पणजीला असे जरी आतापर्यंत नक्की झालेले असले तरी ऐनवेळी समारोपही मडगावलाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मडगाव हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा असल्याने आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्षही असल्याने गोव्यात दरवर्षी साजरा होणार्या इफ्फीचा उद्घाटन सोहळा एकदातरी मडगावात रवींद्र भवनात म्हणजे आपल्या मतदारसंघात व्हावा अशी त्यांची इच्छा ही असणारच! त्यात पुढच्या दोन-तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्याने इफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी वाजले जाणारे ढोल ताशांचे पडसाद आपल्या मतदारांच्या कानी गुंजत राहावेत, अशीही त्यांची आंतरिक इच्छा असणारच आणि त्यात काही वावगे असण्याचे कारण नाही.
गोव्यात प्रथमच इफ्फीचे उद्घाटन स्थळ मडगावला आल्याने मडगाव मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा निश्चितच उंचावल्या असतील. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपटक्षेत्रातील संबंधीत लोकांचाच महोत्सव असतो आणि कधीतरी थिएटरात जाऊन चित्रपट पाहणार्यांचे त्यात काम नसते असे जर विधान केले तर काही लोकांना निश्चितच खटकण्याची शक्यता आहे. पण हे विधान त्या लोकांसाठी आहे की, ज्यांना चित्रपट क्षेत्राविषयी काडीचीही ओढ नाही आणि तरीसुद्धा ग्लॅमर असलेले कलाकार पाहायला मिळतील म्हणून जे कोणी उद्घाटन सोहळ्यात गर्दी करू पाहताहेत त्यांच्यासाठी.
आता प्रश्न असा येतो की, इफ्फीचा उत्सव हा फक्त चित्रपट क्षेत्राशी लागेबांधे असलेल्यांसाठीच मर्यादित ठेवावा की सर्वसामान्य जनतेसाठी तो खुला करावा? चित्रपट महोत्सव हा मनोरंजनाचा ‘इवेंट’ नसून तो अभ्यासाचा महायज्ञ आहे अशी सर्वसाधारणपणे धारणा असते. तीच संकल्पना दृष्टीसमोर ठेवून जगभरात चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते. तेव्हा उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहाण्यासाठी प्रवेशपत्रिका अथवा निमंत्रणपत्रिका मिळालेल्या नाहीत म्हणून आयोजकांच्या नावाने सर्वसामान्य जनतेने बोटे मोडण्याचे कारण नाही. जगभरात जशा काही महत्त्वाच्या घटना घडून जातात त्याच धर्तीचा हा चित्रपट महोत्सव असल्याने त्याचे दर्शन चॅनलच्या बातमीपत्रात होतच असते. त्यावरच सामान्य जनतेने समाधान मानावे. पण चित्रपटसृष्टीशी संबंध असलेल्यांना डावलून मंत्री – आमदारांच्या गोतावळ्यास, सरकारी अधिकारी वर्गाच्या नातेवाईकांस प्रवेशिका देऊन सभागृहात त्यांचीच वर्णी लावली तर मात्र जनतेस आवाज उठवण्याचा अधिकार आहे.
गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सगळ्या इफ्फीत हाच प्रकार दिसून आल्याने आपल्यालाही उद्घाटन सोहळ्याची प्रवेशिका मिळावी अशी अपेक्षा जनतेने बाळगली तर त्यांना दोष देता येणार नाही. ज्या लोकांनी चित्रपटात योगदान दिलेले आहे, ज्यांना गोमंतकीय चित्रपटातील अथवा नाटकातील कलाकार म्हणून ओळखतात त्या व्यक्ती आपल्याला प्रवेशिका अथवा निमंत्रण पत्रिका न मिळाल्याने होऊ घातलेला उद्घाटन सोहळा घरबसल्या वृत्तवाहिनीवर पाहात असतात अथवा ज्यांना प्रवेशिका पाठवल्या गेल्या अथवा ज्यांनी निर्ल्लज्जपणाने त्या मिळवल्या ते कलाकार मात्र मागच्या खुर्च्यांवर बसलेले असतात. आणि ज्यांचा चित्रपटक्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, चित्रपट हा ज्यांचे मनोरंजनाचे साधन आहे ते मात्र पहिल्या चार रांगातून पुढे पुढे करताना दिसतात. खरे म्हणजे ही शोकांतिका आहे. ज्यांचे कलाक्षेत्रातील अस्तित्व नगण्य आहे, त्यांना कलाकारांच्या अवतीभोवती फेर धरण्याची संधी देऊन गोवा मनोरंजन संस्था आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शनच आजपर्यंत करत आलेली आहे. लाचारी हेच ज्यांचे कर्तृत्व आहे, त्या धुरिणांना लाचाराना खुश ठेवण्याच्या प्रसंगास तोंड द्यावे लागते त्याला ते तरी काय करतील?
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हटल्यावर देश-विदेशातील पाहुणे आणि प्रतिनिधी महोत्सवाला हजेरी लावतात. प्रतिनिधीतही आपल्या क्षेत्रात प्रचंड कामगिरी केलेले दिग्गज कलाकार असतात. ते सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून येतात आणि निघून जातात. तरीसुद्धा रेड कार्पेटवर अथवा मोक्याच्या ठिकाणी वावरणार्याकडे बोट दाखवून त्यांच्या ओळखीची विचारणा प्रतिनिधींकडून होते. पण अशा ठिकाणी गोव्यातील एकही नावाजता कलाकार वावरताना आजपर्यंत दिसलेला नाही. महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या आगतस्वागतासाठी गोव्यातील कलाकार जात नाही तर कोण तरी सरकारी अधिकारी अथवा सरकार दरबारी मागेपुढे करत वावरणारे जात असतात. मुख्यमंत्री अथवा अधिकार्यांच्या गळी पडून असल्या कामावर स्वतःची वर्णी लावून घेणारेच नकलाकार इफ्फीच्या कार्यकाळात इथे तिथे धावपळ करताना दिसतात. हा सगळा प्रकार किळसवाणाच असतो. तरीसुद्धा त्याचा स्वीकार केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आयोजकांनी या दृष्टीने कधी विचारच केलेला नसातो. त्यांना चित्रपट महोत्सव यशस्वी करायचा असतो. त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता असते. सभागृह भरगच्च भरलेले आहे आणि वेळेप्रसंगी टाळ्यांचा कडकडाट करणारे प्रेक्षकही आहेत एवढ्या पुरतीच त्यांची आयोजनाची संकल्पना असते. पण ही संकल्पना आता बदलायला हवी. सभागृह भरगच्च भरायला हवे. पण त्या सभागृहात देश-विदेशांतील कलाकारांसमवेत गोव्यातील कलाकारांचा भरणा दृष्टीक्षेपात यायला हवा. जेव्हा कार्यक्रमाच्यावेळी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे सभागृहातून फिरतात तेव्हा हे सगळे कलाकार दिसले पाहिजेत.
गोव्यातील चित्रपट महोत्सवाकडे पाहताना तो फक्त चित्रपट महोत्सव म्हणूनच पाहू नये असा एक विचारही या प्रसंगी आल्याशिवाय राहात नाही. चित्रपट महोत्सव हा जरी चित्रपटसृष्टीशी संबंधीत असलेल्यांचा महोत्सव असला आणि इतर ठिकाणी भरविण्यात येणारे महोत्सव त्याच मर्यादित संकल्पनेत पार पाडले जात असले तरी गोव्याच्या बाबतील थोडा वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे.
गोव्याच्या आरंभाच्या इफ्फीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी शहराला जत्रेचे स्वरूप दिलेले होते. चित्रपटगृहात चित्रपटांचे प्रदर्शन चाललेले असताना पणजी परिसराला जत्रेचे स्वरूप आणलेले. चित्रपट महोत्सवाचा माहोल तयार केला गेल्याने जो कोणी सदर महोत्सवाला प्रतिनिधी बनले नव्हते तेसुद्धा महोत्सवाचा आस्वाद घेताना दिसत होते. सदर प्रकाराला कित्येकांनी आक्षेपही घेतला होता. हा चक्क बाजार आहे आणि महोत्सव काळात त्याची गरज नाही अशी टीका करून प्रकारावर बंदीसुद्धा आणली होती. ह्या प्रकारानंतर चित्रपट महोत्सव कधी आला आणि गेला हेसुद्धा गोमंतकीय जनतेला कळलेले नव्हते.
गोव्यात होणार्या चित्रपट महोत्सवांकडे फक्त चित्रपट महोत्सवच म्हणून पाहू नये अशीही कित्येकांची धारणा आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पर्यटनाच्या दृष्टीनेही तेवढाच महत्त्वाचा आहे. महोत्सवाच्या नावाने जे कोणी देश-विदेशातील प्रतिनिधी गोव्यात येताहेत त्यांना गोव्याची संस्कृतीही पहाण्याची संधी मिळायला हवी.
गोव्यात वर्षभर कुठल्या ना कुठल्या मैदानावर ग्राहक मेळावे अथवा बाजार भरत असतात. इफ्फीच्या काळात अशाच प्रकारची नगरी जर निर्माण केली तर एक वेगळ्या प्रकारचा माहोल अस्तित्वात येणे शक्य आहे. त्यातून अर्थकारणाचेही जनित्र फिरू लागल्याने गोव्याला दुहेरी फायदा नक्कीच लाभू शकतो.
आजचा दिवस महोत्सवाच्या उद्घाटनाचा असल्याने दरवर्षीप्रमाणेच उद्घाटन सोहळा उरकला जाईल. दहा दिवसांनी चित्रपट महोत्सवाचेही सूप वाजेल. तरीसुद्धा कधीतरी, कोणीतरी असा विचार करायची गरज आहे.