लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवन ते निवडणूक आयोग असा काल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा समावेश होता. मतचोरीच्या आरोपांवर उत्तर द्या अशा मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अन्य खासदार आणि बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
राहुल गांधी यांनी मागच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतांची चोरी कशा मार्गाने केली गेली, त्याचा प्रयोग देशभरात कसा झाला? हे त्यांनी विविध याद्या दाखवत आणि त्यातले घोळ दाखवत सांगितले होते. यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली. मात्र या सगळ्याचा विचार न करता राहुल गांधी यांनी काल त्यांच्या नेतृत्वात विरोधी खासदारांना बरोबर घेत मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढला. या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात या खासदारांना नेण्यात आले होते.
मी शपथपत्र का देऊ : राहुल गांधी
मतचोरीसंबंधी सादर केलेली सर्व माहिती ही निवडणूक आयोगाने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारेच आहे, ती माहिती माझी नाही. त्यामुळे मी त्यावर शपथपत्र का देऊ? असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचे आरोप केले होते, त्यावर आयोगाने त्यांना स्वाक्षरी केलेले शपथपत्र सादर करण्याची सूचना दिली होती.

