‘इंडिया’कडून सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

0
13

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीने देखील त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची काल घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही घोषणा केली. दरम्यान, रेड्डी यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियाही सुरू झाली आहे. या अधिसूचनेनुसार, 21 ऑगस्टपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. तसेच 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 9 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अन्नादुराई यांच्या नावावर चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुषार गांधी यांचे नाव सुचवले होते, तर द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षाने अन्नादुराई यांचे नाव पुढे केले होते. गांधी व अन्नादुराई यांच्याबरोबर रेड्डी यांचे नाव देखील पुढे आले. त्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली.

रेड्डी, गांधी व अन्नादुराई यांच्यापैकी कोणाची निवड करायची याचा निर्णय इंडिया आघाडीने राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवला होता. यासंबंधी अधिक चर्चा करण्यासाठी खर्गे, शरद पवार व इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट झाली. या भेटीवळी सर्वांच्या सहमतीने इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सुदर्शन रेड्डी यांचे नाव निश्चित झाले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.