Home Featured इंडिगोची एकाच दिवसात1 हजार विमान उड्डाणे रद्द

इंडिगोची एकाच दिवसात1 हजार विमान उड्डाणे रद्द

0

देशातील सर्वात मोठी विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो सध्या एका अभूतपूर्व ऑपरेशनल संकटातून जात आहे. गेल्या 4 दिवसांत इंडिगोची शेकडो विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतर काल 5 डिसेंबर या एकाच दिवशी इंडिगोच्या 1000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
वैमानिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेचे व्यवस्थापन करणे कंपनीसाठी एक मोठे आव्हान ठरले आहे. याचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला आहे.

या गंभीर स्थितीवर इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया देत प्रवाशांची जाहीर माफी मागितली. विमान रद्द होणे किंवा विलंब होणे यामुळे प्रवाशांना झालेल्या प्रचंड गैरसोयीबद्दल माफी मागतो, असे एल्बर्स यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या कामकाजात अडथळे येत आहेत आणि 5 डिसेंबर रोजी कामकाजावर सर्वात मोठा परिणाम झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शुल्क पूर्णपणे माफ करणार
सर्व प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांनी मूळ पेमेंट केलेल्या पद्धतीनुसार आपोआप रिफंड दिला जाईल. तसेच 5 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत ज्या प्रवाशांनी तिकिट रद्द केले आहे किंवा आणि प्रवासाची वेळ बदलली आहे अशा प्रवाशांना त्यासाठीचे शुल्क पूर्णपणे माफ केल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

डीजीसीएकडून दिलासा
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) ज्या नवीन नियमामुळे इंडिगोमध्ये वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली होती, तो निर्णय मागे घेतला आहे. डीजीसीएने शुक्रवारी नोटीस जारी करत याची माहिती दिली.