इंग्रजांचे पंतप्रधान ः ऋषी सुनक

0
11
  • – दत्ता भि. नाईक

ब्रिटनसमोर आर्थिक समस्या उभी राहणे हा काळाने उगवलेला सूड आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनमधील कायदा व परंपरेच्या आधारावर पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. यात कुठेही कुणाचीही वंचना केलेली नाही. यातून भारत-ब्रिटन संबंध सुरळीत व्हावेत ही अपेक्षा.

दि. २४ ऑक्टोबर रोजी भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक ऋषी सुनक यांची युनायटेड किंगडम म्हणजे रूढार्थाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. एक अनपेक्षित व पूर्णपणे इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणून या निवडीकडे पाहिले जाते. त्यांची निवड लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्षाने केलेली नसून कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजे हुजूर पक्षाने केलेली आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील लॉर्ड लोकांचा पक्ष आहे. ‘भारताला स्वातंत्र्य पचवता येणार नाही’ असे वक्तव्य करणारे विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे हुजूर पक्षाचे पंतप्रधान होते. युद्धोत्तर काळातील सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचे सरकार घडल्यामुळेच पंतप्रधान ऍटली यांच्या कारकिर्दीत भारताला स्वातंत्र्य मिळाले असे जाणकारांचे मत आहे.

१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी हुजूर पक्षाचे पंतप्रधान हॅरल्ड यांनी पाकिस्तानची बाजू घेतली होती. ब्रिटनमध्ये वंशवाद वाढला की हुजूर पक्षाची मते वाढतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर जो मुळातच वंशाने ब्रिटिश नाही, वर्णाने श्‍वेत नाही, ख्रिस्ती धर्माच्या कोणत्याही पंथाचा नाही, इतकेच नव्हे तर उघडपणे हिंदू धर्मानुसार आचरण करणारा आहे, असे व्यक्तिमत्त्व ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान व्हावे ही मोठी आश्‍चर्याची बाब आहे. ब्रिटनमध्ये प्रोटेस्टंट व स्कॉटिश चर्चचा प्रभाव आहे. एकदाच रोमन कॅथोलिक पंथाच्या व्यक्तीने ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवले होते. डिजरेली नावाचा एक ज्यू या पदावर विराजमान झाला होता. त्याने भूमध्यसमुद्र व लालसमुद्र यांना जोडणार्‍या सामुद्रधुनीचे सुएझ कालव्यामध्ये रूपांतर केले होते.

बिनविरोध निवड
ऋषी सुनक यांची रीतसरपणे निवड झालेली असल्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याकडून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले असून दि. २८ रोजी त्यांचा शपथविधी होईल असे पूर्वी ठरले होते. परंतु २५ ऑक्टोबर रोजीच त्यांना पदग्रहण करावे लागले. नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट देऊन आंतरराष्ट्रीय वेदांत तत्त्वज्ञान व भक्तिमार्ग यांच्याशी असलेला आपला संबंध दृढ केला. स्वतः दिवाळी साजरी केली. बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात ऋषी सुनक अर्थमंत्री होते. मध्यंतरी लीझ ट्रस यांच्याशीही त्यांची स्पर्धा होती. यात लीझ ट्रस यांनी बाजी मारली तरी ती तात्पुरतीच ठरली. लीझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बोरीस जॉन्सन व पेनी मॉरडॉंट यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा मार्ग मोकळा झाला. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे देशाच्या लोकसभेतील पक्षाच्या दोनशेहून अधिक खासदारांनी पाठिंबा दिल्यामुळेही मार्ग सुकर झाला.

ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सावरणे व संकटातून सुखरूपपणे बाहेर पडणे यासारखे कठीण कर्तव्य त्यांनी पार पाडले आहे. बोरीस जॉन्सन यांनी कोरोनाच्या काळात मेजवानीचे आयोजन केल्यामुळे त्यांना ७ जुलै रोजी पंतप्रधानपदाचा त्याग करावा लागला होता. त्यावेळीच ऋषी सुनक यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यांना लीझ ट्रस यांनी जोरदार आव्हान दिले व सहज आघाडी घेतली. देशाची दोलायमान अवस्थेला पोहोचलेली अर्थव्यवस्था सावरता न आल्यामुळे अवघ्या पंचेचाळीस दिवसांत त्यांना पद सोडावे लागले. या वेळेस विरोधकांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांची बिनविरोध निवड झाली.

गोपूजक हिंदू
ऋषी सुनक यांचे घराणे अखंड भारतातील अखंड पंजाबमधील गुजरानवाला येथील असून ते पंजाबी खत्री आहेत. आज हे गाव पाकिस्तानमध्ये आहे. पंजाबी खत्री ही क्षत्रियांमधील सर्वात श्रेष्ठ जात मानली जाते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंबीय ब्रिटनमध्ये स्थायिक झाले व त्यांना तेथील नागरिकत्वही मिळाले. सुनक यांचा जन्मही तेथेच १९८० साली झाला. त्यांनी शिक्षण विंचेस्टर, ऑक्सफर्ड व स्टॅनफर्ड विश्‍वविद्यालयातून घेतले. तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या तिन्ही विषयांचे ते तज्ज्ञ असून सध्याच्या युगात आवश्यक असलेली एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी घेतलेली आहे.

इन्फोसिसचे जनक नारायण मूर्ती व सुधा कुलकर्णी-मूर्ती यांचे ते जावई असल्याने ते भारतातही सर्वज्ञात आहेत. त्यांची पत्नी अक्षता या मूर्ती दांपत्याच्या केटामारन व्हेंचर्स या कंपनीच्या संचालकपदावर आहेत. २०१५ साली रिचमंड मतदारसंघातून सुनक प्रथम ब्रिटनच्या संसदेवर निवडून आले व त्यानंतर २०१७ मध्ये ते पुन्हा निवडले गेले व २०२० साली देशाचे अर्थमंत्री बनले.
राजधानी लंडनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजे चार्ल्स तृतीयकडून नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर दहा हाऊसिंग स्ट्रीट येथे बोलताना ऋषी सुनक यांनी देश कोणत्या प्रकारच्या आर्थिक संकटातून जात आहे याची त्यांना कल्पना असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या पूर्वीच्या पंतप्रधान लीझ ट्रस यांना अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यात अपयश आल्यामुळे त्यांची कारकीर्द केवळ पंचेचाळीस दिवसांपुरती राहिली. सात आठवड्यांपूर्वी नाकारल्या गेलेल्या सुनक यांचे पुनरागमन ही एक मोठी घटना आहे. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष गोवेकर व आयर्लेंडचे पंतप्रधान मालवणी होऊन गेलेले आहेत, परंतु ते हिंदू धर्मीय नव्हते. पाश्‍चात्त्य जगतातील एके काळच्या ज्या महासत्तेने ‘इंडियन्स ऍण्ड डॉग्स नॉट अलाऊड’सारख्या पाट्या उपहारगृहांवर लावल्या होत्या, ज्या देशाने ‘आम्ही गोमांस भक्षण करणारे तुम्हा गोपुजकांवर राज्य करतो’ अशी दर्पोक्ती केली होती, त्या देशाच्या पंतप्रधानपदी केवळ हिंदू नव्हे तर गोपूजकही बनतो हे लक्षात ठेवावे लागेल.


आर्थिक संकटाचे आव्हान
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण जगातून ऋषी सुनक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. ज्यो बायडेन यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले. याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या कार्यकाळात भारत व ब्रिटन या दोन देशांमधील मैत्रीसंबंध अधिकाधिक दृढ होतील. व्यापारातील भागीदारी मोठी उंची गाठेल. याशिवाय कित्येक द्विपक्षीय बिंदूंवर सहमती व सहकार्य उत्तरोत्तर वाढेल. रोडमॅप २०३० ही संकल्पना यशस्वी होईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्तेचे आसन नेहमीच काटेरी असते. आनंदसोहळा तात्पुरता असतो. ब्रिटनमध्ये सध्या महागाईने शिखर गाठले आहे. कोरोना व रशिया-युक्रेन युद्धाचे बसलेले चटके सध्या देश भोगत आहे. वाढता विजेवरचा खर्च व मंदावलेली विकासाची गती ही मोठी आव्हाने सुनक यांच्यासमोर आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सरकारी खजिन्याची लूट वाढता कामा नये. ट्रस यांनी करकपातीचे धोरण राबवले ते त्यांच्या अंगलट आले. गुंतवणूकदार नाराज झाले व भांडवली बाजाराला गळती लागली. ही सर्व आव्हाने सुनक यांच्यासमोर आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा दांडगा अनुभव असला तरीही ब्रिटनसारख्या देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणे हे काम शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.

ज्या ब्रिटनने भारतावर सुमारे दोनशे वर्षे राज्य केले, त्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची ब्रिटनवर राजवट सुरू झालेली आहे. हा चक्रनेमिक्रम न्याय आहे वगैरे प्रकारची चर्चा चालत राहील. ब्रिटिशांनी आपल्या देशावर अन्यायाने राज्य केले. भारतातीलच नव्हे तर अख्ख्या आशिया व आफ्रिका खंडातील द्रव्य लुटून आपला देश समृद्ध केला, त्या ब्रिटनसमोर आर्थिक समस्या उभी राहणे हा काळाने उगवलेला सूड आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनमधील कायदा व परंपरेच्या आधारावर पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. यात कुठेही कुणाचीही वंचना केलेली नाही. भारत-ब्रिटन संबंध सुरळीत होणे ही काळाची गरज आहे. त्यात पंतप्रधान म्हणून सुनक त्यांच्या देशाचे हित जपण्याचा प्रयत्न करणार याबद्दल शंका नाही व त्यांनी तसेच वागावे ही आपली अपेक्षा असली पाहिजे.
ऋषी सुनक यांनी ब्रिटनची नौका वादळातून बाहेर काढावी हीच सामान्य भारतीयांची अपेक्षा असली पाहिजे. ब्रिटनचे बेट समुद्रात बुडाले तरी चालेल असे म्हणणार्‍यांनी आपल्या जिभेवर आवर घातला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांचे जे वर्णन केले होते ते सिद्ध करण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणूनच ऋषी सुनक व त्याचा देश ब्रिटन यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत.