आसामच्या नगांव जिल्ह्यातील कामपूर भागात शनिवारी पहाटे 2:17 च्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात सात रानटी हत्तींचा मृत्यू झाला. मृत हत्तींमध्ये एका गर्भवती हत्तिणीचाही समावेश आहे. तर हत्तीचे एक पिल्लू गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही धडक इतकी भीषण होती की राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. मात्र, ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला किंवा रेल्वे कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना जमुनामुख-कामपूर रेल्वे सेक्शनवर हा अपघात झाला. लोको पायलटने हत्तींना पाहताच आपत्कालीन ब्रेक लावले, परंतु दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या मार्गावरील 9 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, 13 ट्रेन नियंत्रित (रेग्युलेट) केल्या आणि 2 ट्रेन अंशतः रद्द करण्यात आल्या. जखमी हत्तीच्या पिल्लावर उपचार सुरू आहेत.

