आषाढस्य प्रथम दिवसे…

0
90
 • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ या प्रारंभाला भाळून अखिल भारतवर्षामध्ये कालिदासमहोत्सव साजरा करावा यात कवीचे श्रेष्ठत्व आणि कवितेची महती साठविलेली आहे. त्याचा आठव हा भारतीय ऋतुचक्राचा आणि कालिदासप्रतिभेचा महोत्सव आहे…

भारतीय वाङ्‌मयाच्या नभोमंडलातील देदीप्यमान तारा म्हणून कविकुलगुरू कालिदासाला संबोधले जाते, ही काही नव्याने सांगण्याची बाब राहिलेली नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वसूरींनी त्याच्या ऋतंभरा प्रज्ञेविषयी आणि नवोन्मेषशालिनी प्रतिभेविषयी मुक्त कंठाने गौरवोद्गार काढलेले आहेत. त्याला ‘कविताकामिनीचा विलास’ या शब्दांत संबोधले आहे. त्याच्या रसमाधुर्यामध्ये केवळ शब्दसौष्ठव नाही. केवळ कल्पनाविलास नाही. केवळ अलंकारप्राचुर्य नाही. जीवनाच्या सम्यक अंगोपांगांना स्पर्श करणारी त्याची प्रतिभा आहे. सरसरमणीय, समुचित आणि अपूर्व उपमा त्याने उपयोजिल्यामुळे ‘उपमा कालिदासस्य’ अशी त्याच्या काव्यात्म प्रतिभेची प्रतिमा उमटली आहे. विविधता, मर्मदृष्टी आणि सौंदर्योपासकता हे त्याच्या वैखरीचे गुणविशेष आहेत. म्हणून त्याची कविता आस्वाद्य झालेली आहे. तो केवळ कवी नाही; तो श्रेष्ठ नाटककार आहे. असे अद्वैत अवघ्याच प्रतिभावंतांमध्ये आढळते. बाणभट्टासारख्या श्रेष्ठ प्रतिभावंताने त्याच्या काव्यशैलीला उद्देशून ः
निर्गतासु न वा कस्य कालिदासस्य सूक्तिषु|
प्रीतिर्मधुरसान्द्रासु मञ्जरीष्विव जायते॥
असे उद्गार काढावेत, यातच कालिदासाच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची महत्ता दडलेली आहे. भारतीय संस्कृतीमधील मूल्यविवेकाचे सजग भान असलेला हा कवी-नाटककार असल्यामुळे आमच्या भारतीय जीवनमूल्यांचा तो उद्गाता आहे, मानदंड आहे.

कालिदासाच्या साहित्यकृती म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. ‘मालविकाग्निमित्रः’, ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ ही त्याची सर्वांगसुंदर अशी तीन नाटके. ‘कुमारसंभव’ आणि ‘रघुवंश’ ही अलौकिक स्वरूपाची महाकाव्ये. ‘ऋतुसंहार’ हे सृष्टिचक्राचे विलोभनीय दर्शन घडविणारे लघुकाव्य आणि ‘मेघदूत’ हे खंडकाव्य. हे काव्य म्हणजे त्याच्या परिणतप्रज्ञ प्रतिभाविलासाचा कलशाध्याय. त्याच्या दुसर्‍या चरणातील ः
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं|
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥
या ओळींमुळे मंत्रभारित व्हावे आणि ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ या प्रारंभाला भाळून अखिल भारतवर्षामध्ये कालिदासमहोत्सव साजरा करावा यात कवीचे श्रेष्ठत्व आणि कवितेची महती साठविलेली आहे. त्याचा आठव हा भारतीय ऋतुचक्राचा आणि कालिदासप्रतिभेचा महोत्सव आहे.

कालिदासाच्या ‘मेघदूत’ची थोरवी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. अभिरुचिसंपन्न रसिकांना आनंदानुभव देणारी ती साहित्यकृती आहे. मराठीत कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोखंडे, दाढे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांता शेळके, वसंत बापट (‘मेघहृदय’ या शीर्षकाने केलेले रूपांतर), ना. ग. गोरे, वसंतराव पटवर्धन व चिंतामणराव देशमुख इत्यादिकांनी या काव्याचा सरसरमणीय अनुवाद केलेला आहे. ‘साहित्य अकादमी’च्या रवींद्रनाथ ग्रंथालयात ए. एल. संचेती यांनी जोधपूरहून संपादित केलेला ‘सर्वभाषाकालिदासीयम्’ हा ग्रंथ माझ्या पाहण्यात आला. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, बांगला, ओरिसा, आसामी, मणिपुरी, सिंधी, उर्दू, पंजाबी आणि काश्मिरी या बारा भाषांतून केलेला अनुवाद यात समाविष्ट आहे. अर्थात मूळ संहिता आहेच. अनेक पाश्‍चात्त्य भाषांमधून त्याचा अनुवाद झाला असेलच. ही रसिकप्रियता काय दर्शविते? कालिदासाच्या प्रतिभेतील बलस्थाने आणि सौंदर्यस्थळे यांचा स्वरमेळ येथे आहे. शिवाय कालिदासाने भारताच्या विभिन्न प्रदेशांत केलेली परिक्रमा येथे प्रतिबिंबित झालेली आहे. भारतीय जीवनसंचिताचे नवनीत या काव्यात उतरल्याची जाणीव येथे होते.

‘मेघदूत’ हे अम्लान काव्य आहे. ते कितीही वेळा वाचले तरी त्यातील रसमाधुर्य कमी होत नाही. कालिदासाच्या वर्णनकौशल्यामुळे आणि शब्दकळेमुळे या काव्याला नित्यनूतनत्व प्राप्त होते. रचनेच्या दृष्टीने त्याला कुणी ‘गीतकाव्य’ म्हणतात, तर कुणी ‘विरहगीत’ असेही म्हणतात. या काव्याचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ असे दोन विभाग आहेत. या काव्यात ‘मंदाक्रान्ता’ हे वृत्त योजलेले आहे. शंभराहून अधिक श्‍लोक त्यात आहेत. संदिग्धपणे असे म्हणण्याचे कारण म्हणजे, लोकप्रियतेमुळे त्यात प्रक्षिप्त श्‍लोकांची भर पडलेली आहे. ‘मंदाक्रान्ता’ हे वृत्त आशयपरिपोषणासाठी अनुकूल ठरले आहे.

खरे पाहू गेल्यास या काव्याचे कथानक लहानसे आहे; परंतु कालिदासाच्या प्रतिभास्पर्शाने ते महान ठरले आहे. कोण्या एका यक्षास कुबेराच्या शापामुळे एक वर्षापर्यंत स्वतःच्या पत्नीपासून दूर रामगिरीवर राहावे लागते. शापाचा अवधी एका वर्षापुरता. पण हा एकान्त यक्षाला असह्य होतो. तो मेघास दूत या नात्याने संदेश देऊन आपल्या पत्नीकडे अलकानगरीत पाठवितो. काव्यरचनेच्या दृष्टीने हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार म्हणता येईल. एरव्ही मेघ हा अचेतन स्वरूपाचा. तो सचेजन स्वरूपाच्या यक्षपत्नीकडे संदेश कसा पोचविणार? कवीने यातून वाट काढली आणि उद्गारला ः
कामार्त्ता हि प्रकृतिकृपणाश्‍चेतनाचेतनेषु

 • प्रणयार्त जिवांमध्ये सचेतन आणि अचेतन यांमधील फरक कसा बरे निर्माण होईल?
  अन्य कुणाची याचना न करता यक्षाने मेघाची निवड केली याचे प्रयोजन कोणते?
  जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां
  जानामि त्वां प्रकृतिपुरुषं मघोनः|
  तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्धुर्गतो हं
  याण्चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा॥
 • हे मेघा, तू प्रसिद्ध अशा पुष्करावर्तक वंशात जन्म घेतला आहेस, इंद्राचा तू प्रमुख सेवक आहेस. माझ्या प्रियेची ताटातूट झाल्यामुळे तुझी याचना मी करीत आहे. क्षुद्र वृत्तीच्या लोकांच्या उपकारांपेक्षा सज्जन माणसांना केलेली विनवणी निष्फळ झाली तरी ती मला यथायोग्य वाटते.
 • हे मेघा! तापलेल्या जिवाची काहिली तू नाहीशी करतोस, म्हणून तुला विनवितो. यक्षांना प्रिय असलेल्या अलकानगरीत तुला जायचे आहे. शिवमस्तकीच्या चंद्रकलेचे आल्हाददायी चांदणे तिथे विलसत असते.

कुठल्या मार्गाने जावे हे मेघाला सांगत असताना यक्ष जी भावकोमल शब्दकळेची योजना करतो, ती मुळातून वाचायला हवी. कालिदासाची तन्मयता येथे प्रकट झाली आहे.
हे घना! अनिर्वेध मार्गाने तू जात असताना तुझी वहिनी तुला दिसेल. एकेक दिवस मोजत काळ कंठीत असताना ती शिणली असेल. स्त्रियांची हृदये जात्याच फुलांप्रमाणे कोमल असल्यामुळे विरहकालात कोमेजून जातात. परंतु त्यांच्या मनातील आशातंतू चिवट असल्यामुळे तो त्यांना तारत असतो.
भूगर्भातील कंद अंकुरित करून तिचे निपुत्रिकत्व टाकून तुझी श्रवणमधुर गर्जिते ऐकून ती हर्षभरित होईल. कमलदेठांचे पाथेय घेऊन राजहंस तुझी साथसंगत करतील.
गतकाळातील संस्मरणे जागवीत कवी उद्गारतो ः
ज्या उतरणीवर श्रीरामाची वंदनीय पावले उमटली, त्या पर्वतसख्याला तू पहिल्यांदा दृढालिंगन दे. प्रदीर्घ विरहानंतर मित्रभेटीचा हृद्य सोहळा अनुभवल्यानंतर उष्ण आसवे गाळून तो आपला प्रगाढ स्वरूपाचा मित्रभाव प्रकट करील.
सोयीचा मार्ग सुचवीत असताना यश उद्गारतो ः
जेव्हा जेव्हा तुला थकवा येईल तेव्हा तेव्हा तू गिरिशिखरांचा आधार घे. सख्या, दमल्यावर विमल झर्‍याच्या पाण्याचे प्राशन कर.
‘उपमा कालिदासस्य’ या वचनाची प्रचिती आणून देणारे हे वर्णन हृदयंगम आहे ः
रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत्पुरस्ता-
द्वल्मीकाग्रात्प्रभवति धनुःखण्डमाखण्डलस्य|
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते
बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेषस्य विष्णोः॥

 • पुढे वारुळ आहे. इंद्रधनूने आपली मनोहारी रूपकळा उभारली आहे. रत्नकिरणांचा कल्लोळ उसळताना अनुपमेय तेजाचे रूप झळकत आहे. तुझी सावळी तनू त्यामुळे विशेष स्वरूपाची कांती धारण करील. गोपवेषधारी श्रीविष्णू जणू शिरावर मोरपीस धारण करीत आहे असे वाटेल.
  पूर्वमेघातील निसर्गवर्णने नितांत रमणीय आहेत. त्यांतील ही काही क्षणचित्रे-
  सुगीची फळे देणे तुझ्याच हाती आहे, हे जाणून शेतकर्‍यांच्या भोळाभाबड्या गृहिणी आत्मीयतेने तुझ्याकडे पाहतात. नुकतीच नांगरणी केल्यामुळे दरवळणार्‍या माळावरून तू वेगाने पुन्हा एकदा उत्तर दिशेकडे जा आणि हलकेच पश्‍चिमेकडे वळून पहा.
  कुंजवनात भिल्लिणी विसावा घेण्यासाठी क्षणभर रमल्या आहेत. सरींचा वर्षाव करीत जरासा हलका होऊन मोकळेपणाने वेगवान हो. विंध्य पर्वताच्या तळाशी खडक फोडून रेवा नदी वाहते. अशावेळी काळ्या देहांवर शुभ्र हत्तींची नक्षी रेखिली आहे असे वाटते.

श्‍लोक क्रमांक २०, २१, २२, २३, २५ आणि २६ मधील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. विस्तारभयास्तव केवळ त्यांचा उल्लेख केला आहे.
२७ व्या श्‍लोकात उत्तर दिशेला असलेल्या उज्जयिनीच्या मनोहर सौधांचे कालिदासाने वर्णन केले आहे. २८ व्या श्‍लोकात निसर्गानुभूती आणि रमणीविलास यांचे साहचर्य आढळते. ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’ या वचनात चिरंतन प्रीतिभावनेचे शब्दशिल्प कालिदने उभे केले आहे. २९ व्या श्‍लोकात आपल्या प्रियेची अवस्था भावपूर्ण शब्दांत यक्षाला कथन केली आहे ः
सिंधू नदीचे जळ ओसरताना आपली प्रिया वेणीसारखी कृश झालेली आहे असे यक्ष मेघास सांगतो. तरुवरांवरून पानगळ होत आहे. त्यामुळे तिच्यावर पांडुरता आली आहे. प्रिय मित्रा, हे तुझे अहोभाग्य आहे. माझ्या सखीची कृशता जाईल असा काहीतरी उपाय तू सुचव! असा कथानकाचा परिपोष करीत ‘पूर्वमेघ’मधील ६४ व ६५ व्या श्‍लोकात अर्थघन, आशयघन आणि पंचसंवेदनात्मक चित्रे रेखाटत कालिदास परमोच्च बिंदू गाठतो.


‘मेघदूत’च्या ‘उत्तरमेघ’मध्ये ५५ श्‍लोक आहेत. पहिल्या श्‍लोकात अलकानगरीचे चित्र कालिदासाने रेखाटले आहे. तिथे कोणते दृश्य तुला दिसेल बरे!

तेथील स्त्रियांनी फुलांचा साजशृंगार केला आहे. कुंद माळून कमलपुष्पांशी त्या सहज क्रीडा करतात. लोध्रफुलांचे पराग माखून गोर्‍या चेेहर्‍यांचा गोरेपणा अधिक खुलवितात. केशसंभारावर कोरांटी ठेवतात. कानांवर शिरीषपुष्पे खोवतात. तुझ्या आगमनानंतर जो कदंब फुलतो, त्या फुलांनी भांग सजवितात.
तेथील वृक्ष सदैव बहरलेले असतात. फुललेल्या कमलिनीभोवती हंसमालिका मेखलेप्रमाणे शोभून दिसते. घरात पाळलेले मोर आपला झळझळणारा पिसारा फुलवून केकारव करतात. चंद्राच्या पूर्णबिंबाच्या स्रवणार्‍या धारेमध्ये रात्र न्हात असते.
अशा या निसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मीलनसुखाला अंतरलेला यक्ष आपली व्यथा मेघाला सांगतो. अशा प्रकारच्या मणिमय सदनांमध्ये आपल्या सख्यांबरोबर आनंदविहार करणार्‍या अन्य यक्षांचे तो वर्णन करतो.

शीतल गंगाप्रवाहाचे सेवन केल्यामुळे तेथील वारा अधिक शीतल झालेला आहे. तेथील काठावरच्या मंदारवृक्षांच्या सावलीमुळे धरातल सुखशीतल होईल.
अशाप्रकारची वातावरणनिर्मिती करीत यक्ष मेघाला आपले ‘लक्ष्य’ सांगतो ः
कुबेरसदनाच्या जवळच उत्तरेस आमचे घर आहे. दुरून पाहताना दाराशी इंद्रधनूचे तोरण डोळ्यांत भरते. माझ्या सखीने प्रिय पुत्राचे संगोपन करावे त्याप्रमाणे मंदारवृक्ष अंगणात वाढविला आहे. सहजतेने फांदी झुकविली असता त्याचे गुच्छ हाती येतात.
जलाशयाजवळच पाचुमण्यांच्या तिच्या पायर्‍यांवरून आत उतरल्यावर निळ्या देठांवर सुवर्णकमळे डुलत आहेत असे वाटते. तिथे हंस विहार करीत असाताना त्यांना असीम सुख लाभते. तुलादेखील मानससरोवराजवळ जावेसे वाटणार नाही.

 • उत्तरमेघातही अशी सौंदर्यस्थळे आहेत की त्यातील कोणती निवडावीत असा प्रश्‍न पडतो. यक्षपत्नीच्या विरहावस्थेची चित्रे तितक्याच उत्कटतेने कालिदासाने रंगविली आहेत. मलिन वस्त्र नेसून, मांडीवर वीणा घेऊन आपली प्रिया बसली असेल. आपले नाव गुंफलेले असेल असे गीत गायला ती आतुर झाली असेल. गाताना वीणेच्या तारांवर तिच्या डोळ्यांतील अश्रुबिंदू ओघळले असतील. स्वतःच घेतलेल्या तानांचं विस्मरण तिला झाले असेल. अशा प्रकारच्या तिच्या भावनांदोलनाची चित्रे रेखाटताना कालिदास इतका तन्मय झालेला आहे की ते त्याच्या स्वानुभवाचे बोल वाटावेत. र्जीी ीुशशींशीीं ीेपसी रीश ींहेीश ींहरीं ींशश्रश्र ेष ीरववशीीं ींर्हेीसहीं या पी. बी. शेले याच्या उद्गारांची येथे आठवण होते.
  कालोतीर्णता हा वाङ्‌मयीन कृतीचा निकष असेल, तर तो ‘मेघदूत’सारख्या अभिजात काव्याला तंतोतंत लागू पडतो.