आषाढस्य प्रथम दिवसे

0
29
  • मीना समुद्र

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदासाला असा मेघ दिसला आणि त्याच्या अलौकिक प्रतिभेने अद्वितीय, अजर, अमर असे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य लिहिले. उपमेबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या कालिदासाच्या कल्पनाविलासाने वाचकाला थक्क करून सोडणारे असे हे अप्रतिम छोटेखानी काव्य!

वैशाखात सर्वत्र पेटलेला वणवा; धडाडून पेटलेल्या अग्निकुंडाची सोसवेनाशी धग; जिवाची होणारी काहिली; जाळणारा, पोळणारा उन्हाळा- यातून सोडविण्यासाठी आपण प्रार्थना करतो ती ईश्वराची. त्यासाठी नवस बोलतो, अभिषेक करतो आणि देवाजीची करुणा आकाशातून बरसेल म्हणून त्याच्याकडे डोळे लावून बसतो, त्याची आसुसून प्रतीक्षा करतो. ‘बरसो रे’ म्हणून त्याला विनवतो. अशावेळी आकाशात जलभरला मेघ वाऱ्याच्या रथात स्वार होऊन आला की मनातल्या आशेला धुमारे फुटतात; कारण मेघ हा जगताच्या आशेचा पुंज आहे. सृष्टीतल्या वृक्षवल्लरी, वनस्पतींसाठी, सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीसाठी, सुबत्तेसाठी, शांतता, समाधान, आनंद, गारवा देण्यासाठी येणारा असा हा पहिल्या पावसाचा मेघ असतो. अन्नजल जीवनाबाबत तो निश्चिंत करतो. असा हा आश्वासक मेघ पावसाचा शुभसंदेशच जणू घेऊन येतो, त्यामुळे त्याचे दर्शन, स्पर्शन आणि त्याच्या निनादाचे श्रवण सारेच कसे शुभ मानले जाते. धरणी आणि आकाशाचा रेशिमबंध जपणारा हा आषाढी मेघ अतिशय दयाळू, कृपाळू, सर्वांना हवाहवासा वाटणारा.

‘आषाढस्य प्रथम दिवसे’- आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदासाला असा मेघ दिसला आणि त्याच्या अलौकिक प्रतिभेने अद्वितीय, अजर, अमर असे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य लिहिले. उपमेबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या कालिदासाच्या कल्पनाविलासाने वाचकाला थक्क करून सोडणारे आणि त्याचा स्नेहभाजन बनवणारे हे अप्रतिम छोटेखानी काव्य! कुबेराच्या दरबारात यक्षाला मिळालेल्या शापामुळे वर्षभर आपल्या प्रियतमेपासून दूर, अतिशय विरहव्याकुळ स्थितीत त्याला हा मेघ दिसला आणि त्यालाच सखा, भ्राता संबोधून त्याने त्याला हिमालयातल्या अलका नगरीत राहणाऱ्या आपल्या प्रियेला संदेश देण्यासाठी पाठवताना अतिशय भावरम्य शब्दात निरोप सांगितला आणि त्याला जाण्यासाठी मार्ग सांगितला. मेघावर अशी कामगिरी सोपविली कारण मेघ आकाशगामी कुठेही जाऊ शकणारा, कामरूप- छोटामोठा आकार धारण करू शकणारा आणि सर्वत्र ज्याचे स्वागतच होते असा. शिवाय तो शुभांगही. सायंप्रार्थनेच्या श्रीविष्णूच्या श्लोकात नाही का जगत्पालक, जगच्चालक, जगरक्षक अशा विष्णूचा रंगही ‘मेघवर्णम्‌‍ शुभांगम्‌‍’ असा सांगितलेला? राम, कृष्णाचाही हाच श्यामल मेघवर्ण. तर असा तो शुभसूचक, वरदायी, पर्जन्य आणणारा, आर्द्र, मेघ! कालिदासाच्या यक्षाने रामगिरीपासून अलकानगरीचा मार्ग मेघाला यथास्थित वर्णन केला आहे. रामगिरी, माल, आम्रकूट, दशार्ण म्हणजे विदिशा नगरी, नीचै नावाचा पर्वत, वाट थोडी वाकडी करून आपली प्रिय उज्जयिनी, दशपूर, कुरुक्षेत्र, कनखल, क्रौंचरंध्र, कैलास, अलका अशी ठिकाणे घेत, तिथल्या नद्यांचे सौंदर्यपान आणि जलपान करीत, रानेवने- उद्यानातील फुलाफळांचे, वृक्षवल्लरींचे सौंदर्य न्याहाळीत, पर्वतमित्राला भेटत, सर्वांची दुःखे, ताप दूर करीत जायला सांगितले आहे. कारण हा आषाढाचा पहिला मेघ आहे. वर्षाकाळ जवळ आल्याची सूचना घेऊन तो आला आहे. ‘संतप्तानां त्वमसि शरणं’ असे म्हणत त्याची भलावण करत पुष्करावर्तक नावाच्या सुप्रसिद्ध मेघकुळातील तो उदारचरित असल्याने नक्कीच आपले मनोरथ पूर्ण करील. आपला व्याकुळ निरोप देऊन आपली स्थिती प्रियेला वर्णन करेल आणि त्यामुळे तिला धीर येईल असे यक्षाला वाटते. आपली प्रिया जिथे राहते त्या रम्य अलकानगरीचे आणि प्रियेचे वर्णन करताना एखाद्या वृक्षाचा फूलबहार ओसंडून टपटपावा तसे त्याचे शब्द येतात. ‘मेघदूत’ हे असे भावसुगंधी आणि तप्त जमिनीवरच्या पहिल्या वर्षावाच्या संकेतानेच दरवळणारे मृद्गंधी भावकाव्य आहे.
कालिदासाने आपल्या मातीतले काव्य लिहिले. आपल्या संस्कृतीची बीजे साहित्यातून रूजवली आणि आपल्या कल्पनेचा साज त्यावर चढवला. अस्सल भारतीय मातीतलं हे काव्य त्याच्या अफलातून कल्पना, उपमाअलंकार आणि जीवनानुभवाचे सार सांगणारी सहज सुभाषिते यामुळे ‘मेघदूत’ हे सरस्वतीचा कंठमणी ठरले आणि साहित्यरसिकांच्या मनात कायमचे घर करून राहिले. यक्षाच्या मिषाने कालिदासाच्या काळचं भौतिक ज्ञान-विज्ञान, हवामानशास्त्र, सृष्टिविज्ञान आणि कृषिविज्ञान यांची माहिती कालिदास वर्णन करतो. आणि आपल्या अनोख्या काव्याद्वारे साहित्य, विज्ञान आणि भूगोलाची अद्भुत आणि अभूतपूर्व अशी सांगड घालतो. मेघाला सांगितलेला मार्ग, त्या-त्या ठिकाणचे पाऊसपाणी, फळेफुले यांचे वर्णन इतके अचूक आहे की अनेक संशोधकांनी त्या मार्गाने जाऊन संशोधन करून ते सार्थ असल्याची कबुली दिली आहे. कालिदासाचे व्यवहारज्ञान, त्याची कुलशीलसंपन्नता आणि काही रीतिरिवाजांची, लोकव्यवहारांची, नीतिमूल्याची कल्पना या काव्यावरून येते, इतके ते सरस सुंदर वठले आहे. विरहव्याकुळ आर्ततेमध्येही कालिदासाचा यक्ष ‘तुझा आणि विद्युल्लतेचा वियोग कधीही न होवो’ अशी इच्छा मनापासून व्यक्त करतो. विशाल उदारमनस्कतेचे हे उत्तम उदाहरण आहे.

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की, कालिदास हा अत्यंत अडाणी होता. गोपाळांबरोबर रानात जाई आणि ज्या फांदीवर बसला तीच तोडण्याचा प्रयत्न त्याने केला. तेव्हा राजाकडून अपमानित झालेल्या मंत्र्याने त्याच्यावर सूड उगविण्यासाठी राजकन्येशी कालिदासाचा विवाह केला. विदुषी राजकन्येच्या लक्षात त्याचे अशिक्षितपण आल्यावर तिने त्याला घराबाहेर काढून विद्या मिळवून परत येण्यास सांगितले, तेव्हा कालीदेवीच्या उपासनेने त्याने ज्ञान प्राप्त केले आणि परत आल्यावर ‘अस्ति कश्चित्‌‍ वाग्विशेषः?’ असे पत्नीने विचारल्यावर या प्रत्येक शब्दापासून सुरू होणारी रघुवंश, मेघदूत आणि कुमारसंभव ही काव्ये लिहिली. अभिज्ञान शाकुन्तलम्‌‍, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, ऋतुसंहार असे जीवनानुभवाने समृद्ध ग्रंथ लिहून सुंदर, अमूल्य अशी साहित्यसंपदा त्याने निर्माण केली. ती सर्वत्र वाखाणली गेली. पण मेघदूत हे सर्वांचा मेरुमणी ठरले. आणि कालिदासाचा काळ माहीत नसल्याने मेघदूतातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हाच ‘कालिदासदिन’ मानला गेला. उद्या साहित्य, नृत्य, संगीताच्या कार्यक्रमांनी आणि गुणगौरवाने हा दिवस सर्वत्र निनादून जाईल.

मेघाला दूत करण्याची अफलातून कल्पना कालिदासाला ऋग्वेदातील ‘भरूद्‌‍ सूक्ता’वरून सुचली असावी असे भारतीय इति. सं. मं.च्या त्रैमासिकातल्या एका लेखात दिसते. कालिदास वेदशास्त्रसंपन्न विद्वान बनलेला होता तेव्हा त्याने वेद अभ्यासले असणारच. ऋषिगण, मुनिगणांना पावसाळ्याच्या आरंभी होणाऱ्या निसर्गशक्तीचा जोरदार विस्मयकारक प्रत्यय आल्याने त्यांनी त्यांचे स्तवन केले. नंतर निसर्गस्थितीच्या निरीक्षणावरून काही आडाखे बांधले. शावाश्व नावाच्या ऋषींनी लिहिलेल्या सूक्तातल्या ऋचेत ‘शत्रुनाशक, पूजार्ह व धनसंपन्न मरुतांनो, तुम्ही रथवीती राजाचा पिता दर्भ्य याच्याकडे जा आणि बरोबर माझ्या स्तोत्रांच्या वायुलहरींनाही वाहून न्या आणि गोमतीच्या किनारी डोंगराळ भागात राहणाऱ्या त्या राजाकडून धनसंपत्ती आणा’ असे म्हटले आहे. हे ऋषी सिंधू नदीच्या पूर्वेकडे किनाऱ्याच्या जवळपास आणि आजच्या प. पंजाब भागात राहत होते. पावसाळ्यात भारताच्या दक्षिण द्वीपकल्पावरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे बंगालच्या उपसागरावर पोचून तेथून फिरून पूर्व किनाऱ्यावर ओरिसा, मग उत्तर ओरिसा, म. प्रदेश, राजस्थान, दिल्ली ओलांडून पंजाबमध्ये प्रवेश करतात- ही ऋग्वेदकालीन वाऱ्यांची स्थिती आजही उपकरणांद्वारे कळते. अशा या मरुत्‌‍सूक्तावरून कालिदासाला ‘मेघदूता’ची कल्पना सुचली असावी.

ते काही असो. कविकुलगुरू कालिदासाचे ‘मेघदूत’ हे एक अद्भुत, अफलातून, अद्वितीय कल्पनारम्यतेने नटलेले, हळुवार भावगर्भ असे अजरामर, लोकप्रिय खंडकाव्य आहे. ते अक्षरवाङ्मय आहे, हे निःसंशय, निर्विवाद!