माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि केंद्र सरकारसोबत झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आंदोलन शांत होताच पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे सीजेपीने पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तात्काळ थांबवून सर्व गुन्हे मागे न घेतल्यास आणि 25 जुलैच्या कराराची लेखी प्रत मंगळवारपर्यंत न मिळाल्यास पुन्हा देशभरात तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा सीजेपीने केंद्र सरकारला दिला.
राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कॉक्रोच जनता पार्टीने सरकारवर गंभीर आरोप केले.
आंदोलनाची तीव्रता कमी होताच सरकार विद्यार्थ्यांना एकेक करून लक्ष्य करेल, अशी शंका आम्हाला आधीपासूनच होती. सरकारचे हे जुनेच धोरण आहे. 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आंदोलकांवर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, सरकारने या कराराचा पूर्णपणे भंग केला आहे, असे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले.

