ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांनी काल स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन मुंबईतील पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’ मध्ये आत्महत्या केली. यावेळी आशा भोसले या ‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळ्यासाठी सिंगापूरमध्ये होत्या. काल दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याच इमारतीमध्ये लता मंगेशकर यांचे निवासस्थान आहे.
आशा भोसले ‘मिफ्ता’ सोहळ्यासाठी सिंगापूरला रवाना झाल्या तेव्हा त्यांनी आपले परवानाधारक रिव्हॉल्व्हर घरातच ठेवले होते. त्याच रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घेऊन वर्षा भोसले यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे आशा भोसले यांना कालच सिंगापूरमधील सोहळ्यात ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता व अभिनेते सचिन यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली होती. त्यावेळी ‘‘हल्ली महाराष्ट्रात प्रेम मिळत नाही, ते इथं सिंगापूरमध्ये मिळालं’’ असे उद्गार त्यांनी काढले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच आशाताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. वर्षा भोसले यांनी काही हिंदी व मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते व नंतर त्या पत्रकारितेमध्येही सक्रिय होत्या. ‘रीडिफ डॉट कॉम’ या संकेतस्थळावर तसेच ‘संडे ऑब्जर्व्हर’, ‘जंटलमन’ आदी नियतकालिकांसाठी त्या राजकीय विषयांवर स्तंभलेखन करीत असत. मात्र, सन २००३ पासून त्यांनी पत्रकारितेलाही रामराम ठोकला होता. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसे. सन २००८ मध्ये त्यांनी औषधाचा जादा डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तातडीने औषधोपचार झाल्याने तेव्हा त्यांचे प्राण वाचले होते. मात्र, यावेळी त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त आहेत. वयाची पन्नाशी पार केलेल्या वर्षा या घटस्फोटिता होत्या. मुक्त क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता, मात्र, नंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता.