आवेश

0
12
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आवेश ही एक महाशक्ती आहे. जो-जो आवेशाला स्पर्श करतो त्याचा तत्काळ कायापालट होतो. आवेश आपल्याला स्वस्थ बसायला संधीच देत नाही. आपली झोप उडवून आपल्याला सक्रिय बनवण्याची जबाबदारी आवेश चोखपणे पार पाडतो.

अग्नी वार्‍याने प्रज्वलित होऊन त्याच्या ठिणग्या पटापट फुरफुरत असतात. तसाच तरुण्याचा आवेश उसळत्या रक्ताच्या उन्मादातून फुरफुरायला हवा. ज्याचे बाहू नवनिर्मितीसाठी पुढे-पुढे सरसावत नाहीत तो तरुण गबाळाच म्हणायला हवा. सगळ्या प्रगतीचे आशास्थान ही युवाशक्ती आहे. तरुण हा शरीरापेक्षा मनाने उत्साही असायला हवा. प्रत्येक तरुणाच्या कृतीतून त्याच्या दंडातील आवेश व्यक्त व्हायला हवा.

नुकताच यौवनामध्ये आलेला नवपाडा बैल बघा, दोन्ही शिंगे रोखून तो कसा उसळी घेतो. धनुष्याची कमान ताणल्याप्रमाणे सगळे अंग वाकवून तो कसा हवेत उडून झेप घेतो ते बघा. सगळे अंग मातीत माखवून कसा भयंकर चित्कार करीत धावून जातो ते पाहिल्यावर अंगावर भीतीने काटा उभा राहतो. या बैलाचा आवेश पाहून आपल्या तरुणांनी स्फूर्ती घ्यायला हवी.

तारुण्याचा काळ हा मर्यादित असतो. तो येतो कधी आणि हा-हा म्हणता कसा संपून जातो हेच आपल्याला कळत नाही.
कोंबड्यांच्या झुंजीच्या शर्यतीत असाच आवेश दिसून येतो. त्यांच्या आपसातील चोचींच्या प्रहाराने त्यांचे अंग रक्तबंबाळ होते. थकव्याने त्यांचा झोक जाताना दिसतो; पण आवेशाचा पारा कसाच उतरत नाही.

तारुण्याच्या आवेशाने एखादा तरुण दहा हात विहीर खणत जाईल. घणाच्या ठोक्याने भल्या मोठ्या पाषाणाचे छिन्न-विछिन्न तुकडे-तुकडे करेल, मोठ्या कपारी खणून मातीचा ढिगारा उभारेल, पण त्याचा आवेश ओसरणार नाही.

आवेश हे जिवंतपणाचे लक्षण आहे. कुत्रा ज्या आवेशाने शत्रूवर झेप घेतो ते पाहण्यासारखे असते. वाघ आणि सिंह असे हिंस्र प्राणी आपली शिकार साधताना ज्या आवेशाने उडी घेतात ते पाहिले की अंगाचा थरकाप उडतो.

बोलण्यामध्येदेखील आवेश असायला हवा. ज्या तडफेने रुबाबात आणि ऐटित आपण बोलतो ते ऐकून प्रतिस्पर्धी एकदम थंडगारच व्हायला हवा. बोलण्याचा आवेश एवढा जबरदस्त असतो की बोलणे चालू असताना ऐकणारा त्या आवेशाच्या तडाख्यात भांबावून जातो. क्रिकेट सामन्याचे समालोचन करताना आलोचक निवेदनामध्ये जे चढ-उतार घेतो ते आवेशाचे आकर्षणच असते. त्यामध्ये मग्न होऊन आवेशाच्या भरातच श्रोत्याचे स्पंदन वाढत जाते.
‘बी’ एकदा जमिनीत पेरले की त्याचा अंकुर बाहेर पडताना एका आवेशातच येत असतो. पहिल्या पावसाच्या सरीचा आवेशदेखील वाखाणण्यासारखा असतो.

साप जमिनीवरून सरपटत जाताना किती आवेशात जातात ते बघा. मधमाशा प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करताना कशा तुटून पडतात, तो त्यांचा आवेश बघा. आकाशातील घार जेव्हा जमिनीवरील कोंबडीच्या पिलांना उचलते तेव्हा तिचा आवेश बघा. भिंतीवरील सरडा किती आवेशाने आपल्या भक्ष्याला गिळंकृत करतो त्या आवेशाचे निरीक्षण करा.

शिकताना विद्यार्थ्यालादेखील आवेश हवा, हे ध्यानात ठेवा. अभ्यास करताना अर्थात चार-पाच तास धानस्थपणे बसण्याचा आवेश हवा. लिहिताना सतत तीन तास लेखन करण्याचा आवेश हवा. निवडणुकीच्या धामधुमीत जिंकणारा उमेदवार किती तास भाषणे करतो आणि किती जणांच्या गाठी-भेटी घेतो, या आवेशाला सीमाच नाही.

कधी आपला आवेश फसवा आणि एकांगी असतो. आपल्या शक्तीची आपणच फुशारकी मारू नये. कित्येकदा आत्म-आवेशाच्या मर्यादांची कल्पना आपल्याला नसते. अशा वेळी आपला आवेश अंगलट येऊ शकतो आणि चारचौघांत आपलीच फजिती होऊ शकते.

आखाड्यात कुस्ती करणार्‍याला अथवा कबड्डी खेळणार्‍याला आवेशाचे पाठबळ असते. त्या आवेशाचे गणितच वेगळे असते. कारण खेळाडूंचा जोष तात्पुरता व त्या खेळापर्यंत मर्यादित असतो. येथे प्रेक्षकदेखील आवेशाने आरोळ्या ठोकत प्रोत्साहन देत असतात.

आवेश ही एक महाशक्ती आहे. जो-जो आवेशाला स्पर्श करतो त्याचा तत्काळ कायापालट होतो. आवेश आपल्याला स्वस्थ बसायला संधीच देत नाही. आपली झोप उडवून आपल्याला सक्रिय बनवण्याची जबाबदारी आवेश चोखपणे पार पाडतो.
विजेचे बटन दाबले की चटकन दिवा पेटून उजेड पडतो. तसाच आवेशाचा संचार शरीरात होताच देहबोली लगेच चमत्कारिक वाटायला लागते.

हातात शस्त्र न घेता एवढी मोठी ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचा आवेश महात्मा गांधीजीनी संपूर्ण जगापुढे ठेवला. त्या आवेशाचे प्रतिध्वनी जगाच्या कानाकोपर्‍यातील गुलाम राष्ट्रांमध्ये उमटले आणि त्यांनीही स्वतंत्रतेचा वसा घेतला. हा आवेश शांततेचा व अहिंसेचा होता.

याचा अर्थ, आवेश साइलंट असू शकतो आणि तो अदृश्यपणे संचार करत असतो. सत्य आणि अहिंसा या दोन्ही तत्त्वांना आवेशाचे आवरण असते. सूर्याला जसा प्रकाश-किरणांचा परिघ असतो तसाच आवेशाचा परिघ संयमाच्या जीवन-निष्ठांना आपल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण संरक्षण देत असतो.

महाभारताच्या महायुद्धात श्रीकृष्ण हातात शस्त्र न घेता आरंभापासून शेवटपर्यंत कुरुक्षेत्रावर वावरले, पण आपला आवेशच त्यांनी पांडवांच्या सत्यनिष्ठेत संचारित केला. या आवेशानेच हस्तिनापुरासाठी विजय खेचून आणला. धर्माचा अधर्मावर विजय हा आवेशाचा चमत्कार ठरला.
आवेशाचा महिमा स्पष्ट करताना शब्दच अपुरे पडतील. एवढा अतिमहान व महाबलवान आवेश होय!!