आला पह्यला पाऊस

0
1
  • डॉ. सचिन कांदोळकर

पावसाचे वारे वाहू लागले की पावशा पक्षी जणू बोलतो- ‘पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे!’ या वार्तेने शेतकऱ्यांची लगभग सुरू होते. त्यांची कोयप, वखर, नांगर, तिफन, चाहूर, सरत, मोघडा, पाभर अशी अवजारे तयारच असतात. बियाण्याचे पोते भरून ठेवलेले असते. म्हणून ‘भीज भीज धरणीमाते’ अशी कवयित्री शांता शेळके विनवणी करतात. कारण पेरणीवर अवघे जग विसंबून असते. पेरणी म्हणजे ‘ढोराची चारनी’ अन्‌‍ ‘कोटी पोटाची भरनी’ असते. आणि मग तो येतो….

‘नेमेचि येतो मग पावसाळा, सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असे कवीने म्हटले आहे. आज पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र तो उशिरा आला तरीही अनिलांसारखा कवी त्याचे कौतुक करतो, स्वागत करतो अन्‌‍ म्हणतो-
असा उशिरा आलेला पाऊस
तळहातावर झेलून घ्यावा
टिपून ल्यावा पापण्यांवरती
कपाळीच्या घामामध्ये मिळवावा
मराठीत अनेक कवींनी पाऊस या विषयावर कविता लिहिलेल्या आहेत. अक्षरओळख होण्यापूर्वीच आपल्याला तोंडपाठ झालेली ही पहिली मराठी कविता ः
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा…
ये गं ये गं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून…
या कवितेबरोबरच बालपणात अभ्यासलेल्या आणखीही काही पावसाळी कविता सहज आठवतात. शांता शेळके यांच्या पावसावरील कवितेच्या या ओळी बालपणात घेऊन जातात-
पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकळले नभ
सोसाट्याचा वारा
या ओळी आठवताच घरट्यात घुसून बसलेली पाखरे, पानांतून हळूच डोकावून पाहणारी खार, झाडाच्या तळी निवारा शोधणारी गुरे, नदीला आलेला पूर अशी कितीतरी चित्रे डोळ्यांसमोरून सरकत जातात.
पुढे मग बालकवी, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, ग्रेस, इंदिरा यांच्या पावसाळी कविता पाठ्यपुस्तकांतून येत राहिल्या. ‘श्रावणमास’ ही अजरामर कविता लिहिणाऱ्या बालकवींची ‘पाऊस’ ही अशीच एक सुंदर कविता. या कवितेत पाऊस पडण्यापूर्वी आकाशात दिसणाऱ्या ढगांचे बालकवींनी वर्णन केले आहे. वर्षादेवीने दशदिशांतून माल आणून ठेवला आहे आणि जवळपास कोठारी दिसत नसल्यामुळे वाऱ्याने तो उधळून लावला आहे. त्यामुळेच पाऊस पडतो आहे, असा या कवितेचा विषय आहे. अकरावी की बारावीच्या पाठ्यपुस्तकात ‘हिरवळ आणिक पाणी, तिथे स्फुरती मजला गाणी’ असे म्हणणाऱ्या बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी’ ही कविता येऊन गेली. कवितेत वर्णन केल्याप्रमाणे सारी सृष्टी भिजून चिंब झाली आहे, पाने जणू टाळ्या पिटत आहेत, अधूनमधून वीज चमकते आहे, मोर भिजून गेला आहे, वेली ‘ऋतुमती’ झाल्या आहेत… शेवटी ‘मी-तूपण सारे विसरून। आपणही जाऊ मिसळून’ असा भाव या कवितेत व्यक्त होतो.

याच काळात ग्रेस यांची ‘पाऊस आला पाऊस आला गारांचा वर्षाव। गुरे अडकली रानामध्ये दयाघना धाव’ अशा ओळींनी सुरुवात होणारी पावसाची कविता समोर आली. पाठ्यपुस्तकातील अशा कितीतरी कवितांची उदाहरणे देता येतील. मराठीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकतरी पावसाळी कविता समाविष्ट केली जायची. एखाद्या पाठ्यपुस्तकात अशी कविता नसेल तर ते पाठ्यपुस्तकच कोरडे वाटावे, असे ते दिवस होते.

पाठ्यपुस्तकाबाहेरील काही पावसाळी कवितादेखील आपल्यावर भुरळ घालतात. दरवर्षी पहिला पाऊस आला की हमखास आठवते ती बहिणाबाईंची ‘आला पाऊस’ ही कविता. ‘मन’, ‘कशाले काय म्हनू नही’, ‘खोप्यामधीं खोपा’, ‘अरे संसार संसार’, ‘माझी माय सरसोती’, ‘देव अजब गारोडी’, ‘माझी मुक्ताई’ यांसारख्या काही कविता एकतर पाठ्यपुस्तकांमधून वाचनात आल्या होत्या किंवा कार्यक्रमांमधून ऐकलेल्या होत्या. बहिणाबाई शाळेत कधी गेल्या नाहीत, ‘अशी असावी कविता, फिरून तशी नसावी कविता’ याचे शिक्षण त्यांनी घेतले नाही. तरीही ‘घरोट्या’तून (जात्यामधून) पीठ यावे तसे पोटातून त्यांच्या ओठी सहजपणे गाणे आले आहे. त्यांच्या कवितेतील शब्द लय घेऊनच अवतरले आहेत. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या कवितेचे पुस्तक काढताना शीर्षक दिले होते- ‘बहिणाबाईची गाणी’
बहिणाबाई चौधरी यांची पावसावरची कविता आजही टवटवीत वाटते. पावसाचे वारे वाहू लागले की पावशा पक्षी जणू बोलतो- ‘पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे!’ या वार्तेने शेतकऱ्यांची लगभग सुरू होते. त्यांची कोयप, वखर, नांगर, तिफन, चाहूर, सरत, मोघडा, पाभर अशी अवजारे तयारच असतात. ‘आभायात गडगड’ होताच बहिणाबाईंच्या उरी ‘धडधड’ सुरू होते. ती ‘चौघडा’ कधी बरसतो याची वाट पाहते. बियाण्याचे पोते भरून ठेवलेले असते. म्हणून ‘भीज भीज धरणीमाते’ अशी कवयित्री विनवणी करते. कारण पेरणीवर अवघे जग विसंबून असते. पेरणी म्हणजे ‘ढोराची चारनी’ अन्‌‍ ‘कोटी पोटाची भरनी’ असते. आणि मग तो येतो….
बहिणाबाईंनी ‘आला पाऊस’ या कवितेत पहिल्या पावसाचे वर्णन केले आहे-
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
इंदिरा संत यांनी बहिणाबाईंना निसर्गकन्या असे म्हटले आहे. या निसर्गकन्येने धरित्रीला दंडवत करणारी कविता लिहिली. ‘पेरनी’, ‘कापनी’, ‘रगडनी’, ‘उपननी’ अशा शीर्षकांच्या त्यांच्या काही कविता आहेत. निसर्ग, पाऊस, शेतीभाती, गावातील व्यवहार हेच त्यांच्या कवितेचे विषय बनले. भोवतालचा निसर्ग पाहून त्यांचे मन बहरून येते. सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या- बहिणाबाईंच्या- अनेक आठवणी सांगितल्या आहेत. कुणीतरी बहिणाबाईंना आंब्यालगतच असलेले आणि अडथळा आणणारे गुलमोहराचे झाड तोडायला सांगितले. बहिणाबाईंनी उलट त्याला विचारले, ‘गुलमोहराऐवजी आंब्याचे झाड का नाही तोडत?’ त्यावर तो उत्तरला- ‘त्याचे आंबे तरी मिळतात. गुलमोहराचा काय उपयोग?’ हे ऐकताच बहिणाबाई म्हणाल्या, ‘गुलमोहरापासून काही मिळत नसेल, पण त्याच्याकडे पाहून मन भरून निघतं.’

पहिला पाऊस जमीन शिंपडून जातो तेव्हा ‘धरत्रीचा परमय’ सर्वत्र पसरतो. त्या सुवासाने धरतीच्या आरशात ‘सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या बहिणाबाईंचे मन सुखावते. ‘आला पाऊस पाऊस। आता सरींवर सरी’ या ओळींतील शब्दाशब्दांतून त्यांना झालेला आनंद जाणवतो. शेत-शिवार आणि नदी-नाल्यांप्रमाणे कवयित्रीचे मनही भरून गेले आहे.
बहिणाबाईंच्या कवितेतील पाऊस अगदी ‘धूमधडाक्यात’ वाजत-गाजत येतो. पण काहीवेळा तो ‘धिंगाणा’ घालतो. इंदिरा संत यांनादेखील अशा पावसाला विनवणी करावी लागते-
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमोळी
अन्‌‍ दारात सायली
पहिल्या पावसाचे अनेक कवींनी स्वागत केले आहे. पण दया पवार म्हणतात ः
पावसा, पावसा तू आलास
छप्पर लागे घनघोर गळतीला
चिखलात चिल्यापिल्यांची पाटी
भुकेपोटी लागली वळवळायला
बहिणाबाईदेखील आपल्या कवितेत हीच खंत व्यक्त करतात-
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
पहिल्या पावसाने लहान मुले आनंदाने न्हाऊन निघतात. काळा काळा कापूस कधी पिंजतो आणि ढगांशी वारा कधी झुंजतो याची ती आतुरतेने वाट पाहत असतात. बहिणाबाईंच्या ‘आला पाऊस’ या कवितेत ललकारी ठोकत पावसात भिजणारी आणि गडगडाट होताच घरात दडणारी पोरे आहेत. पाऊस पडताच मोठ्या माणसांना वडे-भजी आठवतील. बहिणाबाई त्यांना उद्देशून सांगतात ः
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
बहिणाबाईंना निसर्गात परमेश्वर दिसतो. पांडुरंगाचे गीता-भागवत पावसात सामावते व मातीत उगवते, असे त्या सांगून जातात. ‘आला पाऊस’ या कवितेत पाऊस म्हणजे परमेश्वराच्या डोळ्यातील अश्रू आहेत, असे सांगून शेतकऱ्याचे वास्तव मांडतात-
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास
…पहिल्या पावसामुळे आता शेते उगवणार आहेत. धरित्रीच्या कुशीमध्ये मातीची शाल पांघरून ‘बीयबियानं’ निजणार आहे आणि त्याची दिसामाशी वाढ होत जाणार आहे. ‘पह्यल्या’ पावसाने हर्षभरित होऊन बहिणाबाई आपली इच्छा व्यक्त करतात ः
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वऱ्हे येऊं दे रे रोपं
आतां पाऊस पाऊस
बहिणाबाईंची पावसावरील ही कविता म्हणजे धरित्रीच्या कुशीतून रोपासारखे उगवलेले गाणे आहे. त्यांच्या कवितेतील प्रतिमासृष्टी धरित्रीशी निगडित अशीच आहे. ‘नको लागू जीवा, सदा मतलबापाठी। हिरीताचं देनं घेनं, नही पोटासाठी’ असा सतत उपदेश करणाऱ्या एका भूमिकन्येच्या ‘हिरीताचे’ (हृदयाचे) हे देणे आहे.