Home बातम्या ‘आर्टिस्ट’ने गाजवला ‘ऑस्कर’

‘आर्टिस्ट’ने गाजवला ‘ऑस्कर’

0

यंदाच्या ८४व्या ऑस्कर पुरस्कार समारंभात फ्रेंच प्रेमकहाणीचे कथानक असलेल्या कृष्णधवल मूकपट ‘दि आर्टिस्ट’ने महत्त्वाचे बहुतेक पुरस्कार मिळविले. या चित्रपटास महत्त्वाच्या विभागांतील एकूण पाच पुरस्कार मिळाले.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारासह मायकल हजानाव्हिसियश यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, जीन दुजार्दिन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून, उत्कृष्ट संगीतासाठी लुदोव्हिक बोर्स तर सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी मार्क ब्रिड्‌ज यांना असे पाच मानाचे पुरस्कार ‘आटिस्ट’ने पटकावले.

‘आटिस्ट’पुढे आठ तितक्याच ताकदीच्या चित्रपटांचे आव्हान होते. यात मार्टीन स्कोर्सेसी यांचा ‘ह्यूगो’, वूडी ऍलन यांचा ‘मिडनाईट ईन पॅरीस’ आणि ‘दि हेल्प’ या चित्रपटांचा समावेश होता. यातील ‘ह्यूगो’ या चित्रपटासही तांत्रिक विभागातील पाच ‘ऑस्कर’ मिळाले. अभिनेत्री मेरियल स्त्रीप हिला ‘दि आयर्न लेडी’ चित्रपटात इग्लंडच्या माजी प्रधानमंत्री मार्गारेट थेचर यांची भूमिका केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

‘ह्युगो’ला तांत्रिक विभागातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (रॉबर्ट रिचर्डसनट), सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (डेट फेरेटी), सर्वोत्कृष्ट दृष्य प्रभाव (रॉब लिगाटो, जोस विल्यमस्, बेन ग्रॉसमन आणि ऍलेक्स हेनिंग), सर्वोत्कृष्ट संगीत संकलन (फिलिप स्टॉकटॉन आणि युजेन गेर्टी), सर्वोत्कृष्ट संगीत मिश्रण (टॉम फ्लेंशमन आणि जॉन मिडग्ले) असे पुरस्कार मिळाले. ‘बिगिनर्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ख्रिस्तोफर प्लमर या ८२ वर्षाच्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सह-अभिनेता तर अभिनेत्री ऑक्टाव्हिया स्पेंसर हिला ‘द हेल्प’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सह-अभिनेत्री ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ‘रंगो’ या सरड्याची भूमिका असलेल्या ऍनिमेशन पटाने सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन सिनेमासाठीचा ऑस्कर मिळवला. आर्थिक चणचणीतून मार्ग काढणार्‍या एका गरीब वस्तीतील हायस्कूल फुटबॉल संघावर आधारित ‘अनडिफिटेड’या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार लाभला.