आरोग्य सर्वेक्षणाला राज्यात उत्तम प्रतिसाद

0
139

>> सरकारी यंत्रणेद्वारे १५ एप्रिलपर्यंत सर्वेक्षण

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरील राज्यातील सामूदायिक आरोग्य सर्वेक्षणाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला असून १५ एप्रिलपर्यत सर्वेक्षण चालणार आहे. या आरोग्य सर्वेक्षणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

राज्यात कोरोना विषाणूच्या फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन सामूदायिक आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विरोधकांचा आरोग्य सर्वेक्षणाला होणारा  विरोध बाजूला सारून सरकारी यंत्रणेने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. राज्यस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करून कोरोनाचा प्रसार रोखण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गोवा सरकारने आरोग्य सर्वेक्षण करून माहिती गोळा करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.

राज्यातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, बीएलओ यांच्या सहकार्यातून आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. आरोग्य सर्वेक्षण करणारे पथक घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखाकडून आरोग्य खात्याने तयार केलेल्या प्रश्‍नावलीनुसार प्रश्‍न विचारून माहितीचे संकलन ऍपच्या माध्यमातून केले जात आहे. आरोग्य सर्वेक्षण करणारे पथक खबरदारीचा उपाय म्हणून कुणाच्याही घरात जात नाही. घराच्या बाहेर थांबून माहिती जाणून घेत आहे.

राज्यात ३ एप्रिल २०२० नंतर कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्यात आत्तापर्यत सात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील पाच कोरोनो रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. परदेशातून आलेल्या सहा व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच परदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या बंधूला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक संसर्ग झालेला नाही, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात आहे.

नागरिकांचा उत्तम

प्रतिसाद ः मुख्यमंत्री

राज्यातील सामाजिक आरोग्य सर्वेक्षणाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईसाठी गोमंतकीय जनता एकसंघ आहे. याच एकजुटीतून गोव्यातून कोरोना विषाणूला हद्दपार करू शकतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.