आरोग्य यंत्रणा कोलमडेल

0
35

राज्यात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड गतीने वाढत चालली आहे. चाचणी करणार्‍या दर तीन व्यक्तींपैकी एक पॉझिटिव्ह सापडते आहे. ही रुग्णवाढ प्रचंड आहे आणि ती अर्थातच ओमिक्रॉनच्या सामाजिक संसर्गाकडे निर्देश करते आहे. सरकारनियुक्त तज्ज्ञ समितीने सरकारला सुरवातीला पॉझिटिव्हिटीच्या प्रमाणानुसार निर्बंध घालण्यासाठी जी गणिती सूत्रे आखून दिली होती, त्याचा आम्ही भाकीत केल्यानुसार पार बोजवारा उडाला. त्यामुळे नंतर तज्ज्ञ समितीने इस्पितळातील खाटा भरतील त्यानुसार निर्बंध घाला असे सरकारला सांगितले असल्याने रुग्णसंख्या अफाट वाढत असली तरी सरकार जनतेवर कोणतेही निर्बंध घालण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही.
गेल्या सात दिवसांतच तेरा हजारांवर नवे रुग्ण राज्यात आढळून आले. म्हणजेच सध्याचा साप्ताहिक टेस्ट पॉझिटिव्हिटी दर सरासरी तब्बल २६.२५ टक्के भरतो. कालचे दैनंदिन प्रमाण तर ३१.८४ म्हणजे ३२ टक्क्यांवर गेले आहे. रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण मात्र कमी असल्याने लॉकडाऊनची कोणतीही आवश्यकता तूर्त तरी नाही हे जरी खरे असले तरी इस्पितळात दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांची संख्या वाढत्या रुग्णंसख्येबरोबरच वाढते आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक निर्बंधांची नक्कीच जरूरी आहे. ज्या प्रकारे राज्यात अजूनही गर्दी जमवणारे अनावश्यक कार्यक्रम केले जात आहेत, त्यावर सरकारने तात्काळ बंदी घालणे गरजेेचे आहे, अन्यथा परिस्थिती येत्या काही दिवसांत हाताबाहेर जाईल. राज्यात कोरोनाने कहर मांडलेला असताना सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारे दीडशहाणे कोण आहेत? निवडणूक आयोगाने जाहीर सभा, मिरवणुका, रोडशो यावर येत्या १५ जानेवारीपर्यंत बंदी घातलेली आहे. सद्यस्थिती पाहिल्यास ती मुदत वाढवणे आयोगाला अपरिहार्य असेल. त्यामुळे सुदैवाने राजकीय धुरळा सध्या खाली बसलेला असला तरी पक्षप्रवेश सोहळे आणि घरोघरी प्रचारही राजकीय पक्षांनीही जरा आटोपता घेणे गरजेचे आहे.
तिसर्‍या लाटेत जानेवारीच्या मध्यापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारांच्या घरात जाईल असा अंदाज राज्याचे महामारीतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्यांचा हा अंदाज पहिल्या दहा दिवसांतच पार झाला. १५ जानेवारीस ही संख्या दहाऐवजी पंचवीस हजारांच्या घरात जाईल असे दिसते.
या तिसर्‍या लाटेत राज्यात आजवर एकूण १६५ जणांना इस्पितळात दाखल करावे लागले, ज्यातील २० जणांचा मृत्यू झाला. म्हणजे इस्पितळात दाखल कराव्या लागलेल्या दर १०० पैकी १२-१३ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांत सव्वाशे लोकांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे गेल्या सात दिवसांतील एकूण कोरोना रुग्णांशी तुलना करता हे प्रमाण ०.९४ टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.पण सध्या फार मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागलेेले असल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खाली खाली जात असल्याने इस्पितळे भरून जाण्याची वेळही आता तशी फार दूर नाही.
दिवसाला नऊ हजारांवर चाचण्या सध्या कराव्या लागत आहेत. हे लक्षात घेतले तर कोरोना चाचणी करण्याची आपली व्यवस्था येत्या काही दिवसांत पार कोलमडून पडू शकते. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी सरकारने तत्पर पावले उचलली पाहिजेत. खासगी चाचण्यांचे दर सरकारने निश्‍चित केले, पण राज्यात अजूनही खासगी पॅथोलॅबना कोरोना चाचण्या करण्याचे परवाने व्यापक प्रमाणात का दिले जात नाहीत? रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असेल तर जेवढ्या लवकर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या व उपचार होतील तेवढे श्रेयस्कर असते. मात्र, सध्या चाचण्यांवरच प्रचंड ताण आलेला असल्याने केंद्र सरकारने रुग्णांच्या सर्व संबंधितांच्या चाचण्या न करताच थेट औषधोपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल अर्थात चाचण्या करणार्‍या कर्मचार्‍यांवरील ताण कमी करण्यासाठी उचलणे भाग पडले आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे रुग्णांवर योग्य तत्पर उपचार होण्याची. गोवा हे मोफत कोविड उपचार देणारे देशातील एकमेव राज्य आहे हे उत्तमच आहे, परंतु रुग्णसंख्या कितीही वाढली, अगदी लाखोंच्या घरात गेली, तरी सर्व रुग्णांना तत्पर उपचार मिळतील, औषधे वेळीच उपलब्ध होतील, दैनंदिन वैद्यकीय मार्गदर्शन मिळेल या दृष्टीने सरकारने नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्ण वाढत जातील आणि बरे होण्याचे प्रमाण खाली घसरत जाईल, तशा इस्पितळांच्या खाटाही भरत जातील हे विसरले जाऊ नये. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढत चालला आहे. ही पुढील धोक्याची घंटा आहे हे विसरले जाऊ नये.