31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

आरोग्याचा मंत्र ः उपवास

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज, पणजी)

उपवास सोडताना किंवा सोडल्यानंतर एकदम विपरीत अन्न व जडान्न कधीही खाऊ नये. नाहीतर बर्‍याच वेळा असे दिसते की आठवड्यातून एक-दोन दिवस नेहमीचेच उपवास असतो म्हणणारे सकाळी शिर्‍याचा नाश्ता, दुपारी साबुदाणा खिचडी भरपूर तेलतूप- बटाटा वापरून व रात्री जेवणामध्ये भजी खातात!

भारतामध्ये ‘धार्मिक उपवास’ हे सर्रास केले जातात. आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री, संकष्टी, नवरात्र, सोळा सोमवार, मार्गशीर्षातले गुरुवार, पर्यूषण अशा अनेक कारणांनी अनेक लोक वेगवेगळे उपवास करीत असतात. काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात. उपवास प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही न्यावा. शरीर, मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी व सिद्धीसाठी उपवास महत्त्वाचा आहे. म्हणून उपवासाला ‘धार्मिक उपवास’ म्हणा वा ‘आरोग्य उपवास’ प्रत्येकाने त्याचे आचरण करावे. कारण आजकाल अतिखाणे सर्वांचेच होते. भूक नसताना खाणे, पोट भरलेले असताना खाणे, सतत अरबट-चरबट खात राहाणे, पौष्टीक आहारापेक्षा जिभेला आवडणारेच चटपटीत- मसालेदार खाणे, फास्ट फूड, जंक फूड यांचे अतिसेवन अशा अनेक कारणांनी विविध आजार बळावले आहेत. यातले महत्त्वाचे म्हणजे ताप, जुलाब, उलटी, आमवात, स्थूलता इ. या सर्वांमध्ये ‘लंघन’ किंवा ‘उपवास’ ही प्राथमिक चिकित्सा होय.
आयुर्वेद ग्रंथात उपवासालाच लंघन म्हटले आहे.
‘लघुभोजनम् उपवासो वा लंघनम् |’

 • संपूर्ण भोजनत्याग किंवा हलके भोजन करणे याला उपवास किंवा लंघन म्हटले जाते.
  ‘यत् किंचित् लाघवकरं देहे तत् लंघनम्‌|’
 • ज्या कशाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो ते म्हणजे लंघन होय.
  आयुर्वेदशास्त्रामध्ये ताप, उलटी, जुलाब, स्थूलता, अपचन अशा अनेक रोगांमध्ये लंघन हा पहिला व महत्त्वाचा उपचार सांगितला आहे.
  उपवासाचे फायदे ः
  ‘अनवस्थितदोषानां पाचनमग्नेः दीपनं ज्वरस्य|
  नाशनं आहारेच्छाकरं रुचिकरं लाघवकसं च॥
  आयुर्वेदशास्त्रामध्ये ज्वर किंवा तापाची चिकित्सा सांगताना लंघनाची महती सांगितली आहे.
 • उचित उपवास वा लंघनामुळे असंतुलित दोषांचे पचन होते.
 • पचनास जबाबदार असणारा अग्नी प्रदीप्त होतो.
 • ताप नाहिसा होतो.
 • जेवणाची इच्छा होते.
 • तोंडाला चव येते.
 • शरीर हलके होते.
 • आरोग्याचा लाभ होतो व ओज म्हणजे सर्वश्रेष्ठ शरीरतेजाचे वर्धन होते.
  आयुर्वेदशास्त्रात उपवासाची अजून एक व्याख्या सापडते, ती अशी….
  ‘उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह |
  उपवासो स विज्ञेयो न शरीरविशोषणम् ॥
  पापकर्मापासून निवृत्त होऊन परमेश्‍वरापाशी चित्त एकाग्र करणे याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे शरीर शोषण करणे नव्हे.
  कडक उपवास एखाद्या प्रकृतीला चालू शकतो. लघु म्हणजे हलका व कमी आहार हा सर्वांनाच आरोग्यप्रद ठरतो.
  ‘सायं प्रातर्मनुष्याणां भोजनं वेदनिनिर्मितम् |
  नान्तराभोजनं कुर्यात उपवासी तथा भवेत् ॥
  सकाळी व संध्याकाळी असे केवळ दोन वेळा भोजन करणे वेदसंमत आहे. याखेरीज संपूर्ण दिवसात आणखी भोजन केले नाही तर त्याने मनुष्याला उपवासाचेच फळ मिळते.

उपवास करायचा तो प्रकृतीला अनुरूप असायला हवा. केवळ एक नियम म्हणून कडक उपवास करणे आयुर्वेदाला अभिप्रेत नाही. म्हणूनच लंघनाला योग्य कोण? अयोग्य कोण… हे सांगितले आहे,
लंघनास योग्य ः
प्रमेह, स्थौल्य, शिरोरोग, त्वचारोग, अपचन, अग्निमांद्य, ताप असणार्‍यांनी लंघन करावे.

 • तेलकट, तुपकट, जडान्न, मिठाई इत्यादीचे अतिरिक्त सेवन करणार्‍यांनी लंघन करावे.
 • शरीरात आमदोष, विषद्रव्यांचा संचय होत असल्यास लंघन करावे.
 • कफ व पित्तप्रधान अवस्थेमध्येच उपवास करावा व तेव्हाही शरीरबल उत्तम अवस्थेत आहे याकडे लक्ष ठेवावे.
  लंघनास अयोग्य ः
 • वाताधिक्य असल्यास, वातरोग, क्षयरोग झाला असल्यास, राग आल्यास उपवास करू नये.
 • लहान मुले, वृद्ध, दुर्बल व्यक्ती यांनीही उपवास करू नये.
 • जोवर शरीराची शक्ती कमी होत नाही, तोवरच लंघन करावे. कारण या शरीरशक्तीवरच आरोग्य अवलंबून असते. लंघन आरोग्यप्राप्तीसाठीच करायचे असल्याने त्याचा अतिरेक होता कामा नये.
 • लंघन/उपवास योग्य झाला हे कसे समजाल?
 • शरीरास हलकेपणा येणे,
 • मलमूत्रविसर्जन वेळच्या वेळेस व सहज होणे.
 • सर्व इंद्रिये म्हणजे नाक, कान वगैरे आपापली कार्ये योग्य प्रकारे करू लागणे.
 • तहान, भूक नियमित वेळेस लागणे
 • श्‍वसनक्रिया सहज होणे.
 • हृदयाचे स्पंदन प्राकृत होणे
 • दिवसभर स्फूर्तीची अनुभूती होणे.
 • उत्साह वाटणे.
  याउलट शरीर कृश होणे, चक्कर येणे, असह्य तहान लागणे, तोंडाला चव नसणे, कोरडा खोकला सुरू होणे, इंद्रियांची ताकद कमी होणे, झोप न येणे, आवाज क्षीण होणे, त्वचा कोरडी होणे, डोके दुखणे, सांधे दुखणे, मलमूत्राचा अवरोध अशी लक्षणे दिसत असता उपवास अतिप्रमाणात झाल्याचे समजावे.
  ‘लंघनम् अल्पदोषाणाम् |’
 • जेव्हा दोषांचे बल कमी असेल तेव्हा उपचार म्हणून केवळ लंघन करावयास सांगितले आहे. लंघनाने अग्नी वा वायू या दोघांची वृद्धी होत असते.
  बर्‍याच वेळा महिनाभर नुसत्या पाण्यावर राहून नुसता फळांचा रस पिऊन उपवास करणारी मंडळी दिसतात. त्यातील बहुतेक सर्व नंतर आजारी पडतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सर्वत्र वर्ज्यच असतो.
  महिना-पंधरा दिवस शरीराला वेगळीच सवय लावली तरी पुढे दैनंदिन जीवनात खाणे- पिणे नेहमीचेच असते. म्हणून उपवास व नेहमीचे खाणे- पिणे यात अतिटोकाचा फरक करू नये.
  उपवास सोडताना किंवा सोडल्यानंतर एकदम विपरीत अन्न व जडान्न कधीही खाऊ नये. नाहीतर बर्‍याच वेळा असे दिसते की आठवड्यातून एक-दोन दिवस नेहमीचेच उपवास असतो म्हणणारे सकाळी शिर्‍याचा नाश्ता, दुपारी साबुदाणा खिचडी भरपूर तेलतूप- बटाटा वापरून व रात्री जेवणामध्ये भजी! खरंच! यात आरोग्य साध्य होतं का अध्यात्म याचा ज्याने- त्याने विचार करावा.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

पित्तशामक ‘लिंबू’

डॉ. मनाली म. पवारसांतईनेज-पणजी लिंबू तसा सर्वांनाच परिचित आहे, पण तरीही लिंबाचे योग्य गुणधर्म व उपयोग माहीत असणे...

आयुर्वेद आणि स्वयंपाक पद्धत

वैद्य स्वाती अणवेकर एखादा पदार्थ हा केळीच्या पानात किवा मग मातीचे आवरण लावून चुलीमध्ये भाजला जातो. असे केल्याने...

तत्त्वज्ञान समजून आचरण करावे योगसाधना – ४९५ अंतरंग योग – ८०

डॉ. सीताकांत घाणेकर जीवनाची गमावलेली खोली प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकांची उपासना केली पाहिजे. त्यांच्यामागे लपलेला दिव्य अर्थ समजून...

त्रिफळा ः महा, अमृततुल्य औषध

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो,...

॥ बायोस्कोप ॥ ऑन् लाइन्… ऑफ् लाइन् …

प्रा. रमेश सप्रे शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन?...