भोमवासीयांचे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रतिपादन
बांधकाम अधिकारी आज देणार भोम गावाला भेट
जुने गोवे ते भोम ह्या सुमारे 7 कि. मी. लांबीच्या प्रस्तावित महामार्गाच्या विस्तारीकरण प्रश्नी चर्चा करण्यासाठी काल भोम येथील नागरिकांनी पर्वरी येथील मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी प्रस्तावित उड्डाण पुलासंबंधीचे आराखडा आम्हाला दाखवण्यात आल्यानंतर आम्ही आमची पुढील कृती काय ते ठरवणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत तेथे हजर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित उड्डाणपूल व जमीन संपादनासाठीची योजना काय आहे त्यासंबंधीची सगळी माहिती कागदपत्रांसह भोमवासीयांना दिली.
बांधकाम अधिकारी
आज भेट देणार
भोम येथील नागरिकांच्या विनंतीनुसार आज मंगळवारी 22 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी भोम गावाला भेट देणार असून यावेळी प्रत्यक्ष प्रस्तावित महामार्गाच्या स्थळावरून या प्रकल्पासंबंधीची सविस्तर माहिती स्थानिक जनतेला पुरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत बोलताना भोमवासीयांना सांगितले.
केवळ चार बांधकामे पाडणार
महामार्गाच्या प्रस्तावित विस्तारीकरणामुळे भोममधील केवळ केवळ चार बांधकामे पाडावी लागतील. त्यात निवास घरे व मंदिर यांचा समावेश नसल्याचे भोमवासीयांना सांगितले. जी चार बांधकामे पाडण्यात येतील त्या बांधकामांच्या मालकांना पर्यायी जमीन व पैसे देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. मात्र, भोमवासीयांनी मंगळवारी (आज) जेव्हा अभियंते भोममध्ये येऊन आम्हाला आराखडा व महामार्गासाठीचे प्रत्यक्ष आरेखन दाखवतील त्यानंंतरच आम्ही पुढे काय करायचे ते ठरवू, असे मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी भोममधील काही नागरिकांनी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन भोम येथील प्रस्तावित महामार्ग विस्तारीकरणाला विरोध दर्शविला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवारी (काल) सकाळी पर्वरी येथील मंत्रालयात या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. ठरल्यानुसार काल सकाळी पर्वरी येथील मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली.
25 मीटर रुंदीचा रस्ता
हा महामार्ग 60 मीटर रुंदीचा नव्हे तर 25 मीटर रुंदीचा असेल. त्याची कल्पना आम्ही भोमवासीयांना दिलेली आहे. उद्या मंगळवारी अभियंत्यांनी आखणी केल्यानंतर सगळे काही स्पष्ट होणार आहे असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
बगलमार्गसाठी सूचवलेली जमीन दलदलीची ः मुख्यमंत्री
तत्पूर्वी चर्चेसाठीच्या बैठकीतून बोलताना भोम येथील नागरिकांनी सरकारला या महामार्गाच्या प्रस्तावित विस्तारीकरणाऐवजी आपण केलेल्या सुचनेनुसार सरकारने बगलमार्गाचा पर्याय विचारात घ्यावा, असा आग्रह धरला. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, बगलमार्गासाठी ग्रामस्थांनी सुचवलेली जमीन ही खाजन जमीन असून ती दलदलीची आहे. त्यामुळे ती जमीन बगलमार्गासाठी योग्य नसल्याचे सांगितले.