आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट संघटनेविरोधात एफआयआर

0
14

>> चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळुरू पोलिसांची कारवाई

आयपीएलचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए), डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जबाबदार एजन्सींच्या अनागोंदी आणि निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
बंगळुरुच्या क्यूबॉन पार्क पोलीस स्थानकात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (डीसीपी) मध्य शेखर एट टेक्कन्नावर यांनी याची पुष्टी केली आहे. पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत हा गुन्हा नोंदवला असून, त्यामध्ये अनेकांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत.
भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये कलम 105 , कलम 125(12) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्ये), कलम 142 (बेकायदेशीरपणे एकत्र गोळा होणे), कलम 121 आणि कलम 190 यांचा समावेश आहे.तसेच त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सुरक्षेबाबत निष्काळजीपणा, गर्दीचे गैरव्यवस्थापन आणि लोकांचे जीवन धोक्यात आणणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने त्यांची पहिले आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी चाहते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमले होते. त्यात तरुण-तरुणींचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते.

पोलिसांच्या सल्ल्याकडे सरकारचे दुर्लक्ष
वाहतूक कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पोलिसांना हा कार्यक्रम रविवारी, म्हणजेच सुट्टीच्या आयोजित करण्याचा सल्ला दिला होता. असे असताना देखील कर्नाटक सरकारने दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवण्याचा आग्रह धरला.

आरसीबीकडून 10 लाखांची मदत जाहीर
चेंगराचेंगरीत मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना आरसीबीने आता 10 लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल असोशल मीडिया पोस्ट केली.

आरसीबीच्या ‘त्या’ पोस्टमुळे वाढली गर्दी?
आरबीसीने सोशल मीडियावर केलेल्या ‘त्या’ एका पोस्टमुळेच गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आरसीबी व्यवस्थापनाला 4 रोजी विजयी रॅली न काढण्याचा सल्ला दिला होता. पण, आरसीबीने 4 जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून ठिकाण आणि वेळेची घोषणा करून टाकली. आरसीबीने मोफत प्रवेश पास देण्याची घोषणाही केली होती. त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली, असे सूत्रांनी सांगितले.

अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन
या चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकारने बंगळुरुचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यात अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह क्यूबॉन पार्क स्थानकाच्या पोलीस निरीक्षकालाही निलंबित केले आहे.