आरबीआयकडून रेपो दरामध्ये वाढ

0
13

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली अस्थिरता, वाढती महागाई, भांडवली बाजारातील मोठी पडझड या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर काल भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी रेपो रेटमध्ये वाढ करत असल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 25 मूलांकांची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरुन 5.50 टक्के इतका झाला आहे. याचा परिणाम आता कर्जदारांवर होणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकाकडून लवकरच गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा व्याजदरात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या सामान्य नागरिकांचा मासिक हप्ता म्हणजे ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेलांच्या किमतीत होत असलेल्या सातत्याने भारतासाठी चिंतेचा विषय आहे. महागाई दरात सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण आरबीआयने नोंदवले. फेब्रुवारी 2025 नंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर किंवा त्यामध्ये कपात करण्याचे धोरण ठेवले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के इतका केला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात रेपो रेटचा हा दर कायम होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 पासून रिझर्व्ह बँकेने सातत्याने रेपो रेटमध्ये कपात करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.