आरजीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न

0
6

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप

भाजपने महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत फूट पाडून या पक्षांचे जसे दोन तुकडे करत या पक्षांचे चिन्ह आपणाला हवे त्या गटाला मिळवून देण्यास यश मिळवले त्याचप्रमाणे भाजप आता गोव्यात काँग्रेस पक्षाबरोबर युती केलेल्या रेव्ह्युलेशनरी गोवन्स पार्टीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही तसेच राजकारण भाजप करू पाहत आहे. तसेच गोव्यात काँग्रेस पक्षालाही अपशकून करून त्या पक्षातही फूट घालण्यासाठी गोव्यात ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाचा नवा पक्ष स्थापन करू पाहत आहे, असा आरोप काल गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

काल समाज माध्यमावर टाकलेल्या आपल्या एका व्हिडिओद्वारे हा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, भाजपचा महाराष्ट्रातील प्रयोग गोव्यात यशस्वी होणार नसल्याचेही चोडणकर यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
गोव्यातील जनता सूज्ञ असून भाजपच्या वरील षड्‌‍यंत्र व कटकारस्थानाला गोव्यातील जनता बळी पडणार नसून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे. गोव्यात ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या नावाचा पक्ष स्थापन करण्यासाठी भाजपने ज्या हालचाली सुरू केलेल्या आहेत त्याविरूद्ध काँग्रेस पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहितीही चोडणकर यांनी आपल्या व्हिडिओतून दिली आहे.

काँग्रेस पक्षाने रेव्ह्युलेशनरी गोवन्स पार्टीशी युती केल्याने भाजपचे धाबे दणाणले असून त्यांच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी रेव्ह्युलेशनरी गोवन्स पार्टीत फूट घालून पक्षाचे दोन गट तयार करण्याचा व पक्षाचे चिन्ह गोठवून नंतर जो गट त्यांना पाठिंबा देईल त्यांना मिळवून देण्याचा कट रचला असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. मात्र, त्यांना रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्ष फोडण्यास तसेच गोव्यात ‘गोवा काँग्रेस’ नावाचा पक्ष स्थापन करण्यास यश येणार नसल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा निर्णय गोमंतकीय जनतेने घेतलेला आहे. त्यामुळे भाजपची कटकारस्थाने सफल होणार नसल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

मोरजीत उद्या गोवा राखण यात्रा
गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे राज्यभर ‘गोवा राखण यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून उद्या मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी मोरजी येथील मिलाग्रीस चर्चपासून मांद्रे मतदारसंघातील यात्रेला प्रारंभ होणार आहे. गोव्यातील जमिनी, माळराने आणि नद्या कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही. गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि अस्तित्व पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने ‘गोवा राखण यात्रे’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मांद्रे गट काँग्रेस समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही केले.

विरोधी पक्षांनी काँग्रेसवर
टीका करणे थांबवावे

गोव्यातील विरोधी पक्षांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावर टीका करणे बंद करावे. त्यापेक्षा सत्ताधारी भाजपवर टीका करून काँग्रेस पक्षाची मदत करावी, अशी हाक काल काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. यात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना विरोधी पक्षही काँग्रेस पक्षाला का लक्ष्य करीत आहेत, असा प्रश्न चोडणकर यांनी केला.
आम आदमी पक्षाचे माजी राज्य सरचिटणीस फ्रान्सिस कुएल्हो यांच्यासह आणखी काहीजणांना काल काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चोडणकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, पक्षाचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे व सहप्रभारी अंजली निंबाळकर आदी हजर होते.