आरजीपीच्या ‘त्या’ दहा सदस्यांची हकालपट्टी बेकायदा

0
11

आमदार वीरेश बोरकरांच्या समर्थकांचा दावा; कारणे दाखवा नोटीस न बजावता कारवाई

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी दहा सदस्यांची पक्षातून केलेली हकालपट्टी बेकायदा असल्याचा दावा आमदार वीरेश बोरकर यांच्या गटातील काही सदस्यांनी सांताक्रूझ येथे काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला आरजीपीचे संस्थापक सदस्य विशाल देसाई, प्रशांत पागी, प्रेमानंद गावडे, मनिला शिरोडकर, मेल्विन डिसोझा, संजय नाईक, राहुल नाईक आदींची उपस्थिती होती.

आरजीपीच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून 10 संस्थापक आणि प्राथमिक सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नाईक यांनी जारी केलेल्या नोटिशीच्या वैधतेवर त्या दहा जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार वीरेश बोरकर यांना पुन्हा नेतृत्वपदी येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप समर्थकांनी केला.

आरजीपीतून दहा जणांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नाही. पक्ष नेतृत्वाने त्यांचे स्पष्टीकरण न घेता किंवा त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची संधी न देता पक्षातून हकालपट्टीची नोटीस जारी करून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. आरजीपीकडून शिस्तभंगाची कारवाई निवडकपणे केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

आमदार वीरेश बोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर त्याच वादाशी त्यांची नावे जोडलेली असूनही त्यांना अशी कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही, असेही समर्थकांनी सांगितले.