आयुर्वेदाबद्दलचे मिथक आणि तथ्य

0
12

गैरसमज दूर करून जाणून घेऊया आयुर्वेदाची खरी ओळख

  • डॉ मनाली महेश पवार

आयुर्वेद ही केवळ औषधांची पद्धत नाही. आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, निद्रा, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, रोगप्रतिबंध, व्यक्तीनुसार उपचार आणि औषधोपचार यांचा विचार करणारी एक व्यापक चिकित्सा परंपरा आहे. मात्र आधुनिक काळात आयुर्वेदाकडे पाहताना परंपरा आणि वैज्ञानिक पडताळणी यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या वेगवान जीवनशैलीत आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक, हर्बल, केमिकल-फ्री, साइड इफेक्ट्स नाहीत अशा शब्दांचा वापरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनातही अनेक श्रद्धा, अपेक्षा आणि गैरसमज आहेत. काहीजण आयुर्वेद म्हणजे फक्त काढे, चूर्ण, तेलमालिश किंवा पंचकर्म असे मानतात; तर काहीजण आयुर्वेदातील प्रत्येक उपचार हा कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित आणि प्रत्येक आजारावर हमखास परिणामकारक असतो असे समजतात.
प्रत्यक्षात आयुर्वेद ही केवळ औषधांची पद्धत नाही. आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, निद्रा, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, रोगप्रतिबंध, व्यक्तीनुसार उपचार आणि औषधोपचार यांचा विचार करणारी एक व्यापक चिकित्सा परंपरा आहे. मात्र आधुनिक काळात आयुर्वेदाकडे पाहताना परंपरा आणि वैज्ञानिक पडताळणी यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.
थकज नेही आयुर्वेदाच्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आचरणासाठी स्वतंत्र मापदंड प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये पात्र व्यावसायिक, योग्य सुविधा, औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नैतिक वैद्यकीय आचरण यांना महत्त्व दिले आहे.
म्हणूनच आयुर्वेदाबद्दलच्या काही प्रचलित मिथकांचा आणि त्यामागील तथ्यांचा विचार करूया.

मिथक 1 : आयुर्वेद म्हणजे फक्त काढे आणि घरगुती उपाय.
तथ्य : आयुर्वेदाची व्याप्ती यापेक्षा खूप मोठी आहे.
आयुर्वेदात आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, निद्रा, व्यायाम, मानसिक आरोग्य, औषधी वनस्पती, विविध औषधकल्पना आणि चिकित्सापद्धती यांचा विचार केला जातो.
प्रत्येक व्यक्तीला एकच औषध किंवा एकच आहार लागू होईल असे आयुर्वेद मानत नाही. व्यक्तीची प्रकृती, वय, अग्नी, बल, ऋतू, देश, रोगाची अवस्था आणि इतर अनेक घटकांचा विचार करून उपचार ठरवला जातो.
त्यामुळे आयुर्वेदाला केवळ काढ्यांची पद्धत म्हणणे म्हणजे त्याच्या व्यापक दृष्टिकोनाला मर्यादित करणे होय.

मिथक 2 : आयुर्वेदिक औषध म्हणजे नैसर्गिक, म्हणून ते 100 टक्के सुरक्षित.
तथ्य : नैसर्गिक म्हणजे आपोआप सुरक्षित असे नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे.
औषधी वनस्पतींमध्येही सक्रिय रासायनिक घटक असतात. त्यांचा शरीरावर परिणाम होतो; त्यामुळे योग्य औषध, योग्य मात्रा, योग्य कालावधी आणि योग्य व्यक्ती यांचा विचार आवश्यक असतो.
काही आयुर्वेदिक औषधांमध्ये वनस्पतीजन्य घटकांबरोबर खनिज किंवा धातूजन्य घटक असू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुणवत्तापूर्ण, योग्य स्रोतांकडून होणे महत्त्वाचे आहे.
भारताच्या आयुष मंत्रालयाच्या फार्माकोव्हिजिलन्स उपक्रमातही नॅचरल इज ऑलवेज सेफ हा गैरसमज दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. औषधांमुळे होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल प्रतिक्रियांची नोंद आणि देखरेख करण्याची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.

मिथक 3 : आयुर्वेदिक औषधांना कोणतेही साईड इफेक्टस्‌‍ नसतात.
तथ्य : कोणतीही औषधपद्धती वापरताना औषधाची मात्रा, कालावधी, रुग्णाची प्रकृती आणि इतर औषधांशी होणारे संभाव्य परस्परसंवाद लक्षात घ्यावे लागतात.
दिल्ली आयुष संचालनालयाच्या अधिकृत माहितीनुसार आयुर्वेदिक औषधांमध्येही सक्रिय घटक असल्याने त्यांचे अपेक्षित परिणाम तसेच अनिष्ट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे स्वतःहून औषध घेणे टाळावे.
याच कारणामुळे आज फार्माकोव्हिजिलन्स म्हणजेच औषधांच्या सुरक्षिततेचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते.

मिथक 4 : डॉक्टरांनी दिलेली औषधे बंद करून फक्त आयुर्वेद सुरू केला की सर्व आजार बरे होतात.
तथ्य : असा निर्णय स्वतःहून घेणे धोकादायक ठरू शकते.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अपस्मार, थायरॉईडचे विकार, गंभीर संसर्ग, कर्करोग किंवा इतर दीर्घकालीन आजारांमध्ये रुग्णाने आधीपासून घेत असलेली औषधे अचानक बंद करणे योग्य नाही.
आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असल्यास रुग्णाने आपल्या आयुर्वेद चिकित्सकाला तसेच इतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सर्व औषधांची माहिती द्यावी.
काही वेळा विविध औषधांमध्ये परस्पर क्रिया होण्याची शक्यता असू शकते. म्हणून सर्व औषधे एकत्र घेऊ शकतो किंवा एक औषध बंद करून दुसरे सुरू करा असा सार्वत्रिक नियम नाही.

मिथक 5 : आयुर्वेदाला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
तथ्य : हा दावादेखील अतिशय सरसकट आहे.
आयुर्वेदातील विविध औषधे, वनस्पती, उपचारपद्धती आणि संकल्पनांवर संशोधन झाले आहे आणि अजूनही संशोधन सुरू आहे. भारताच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष अंतर्गत सीसीआरएएस आणि आयुष रिसर्च पोर्टलवर आयुर्वेदासंबंधी चिकित्सालयीन, पूर्व-चिकित्सालयीन आणि औषध संशोधन उपलब्ध आहे.
मात्र याचा अर्थ असा नाही की आयुर्वेदातील प्रत्येक उपचारासाठी समान दर्जाचा किंवा पुरेसा वैद्यकीय पुरावा उपलब्ध आहे. ही गोष्ट प्रामाणिकपणे स्वीकारणे आवश्यक आहे.
थकज च्या ट्रेडिशनल मेडिसिन सेंटरकडूनही ट्रेडिशनल मेडिसन ीींरवळींळेपरश्र ाशवळलळपश मध्ये सुरक्षिता आणि परिणामकारकतेबाबत वैज्ञानिक पुरावा मजबूत करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
म्हणून योग्य भूमिका अशी असावी-
जिथे पुरावा आहे, तिथे तो स्वीकारूया; जिथे पुरावा अपुरा आहे, तिथे अधिक संशोधन करूया.

मिथक 6 : आयुर्वेदिक उपचार घेतल्यावर लगेच परिणाम दिसला पाहिजे.
तथ्य : प्रत्येक उपचाराचा परिणाम दिसण्याचा कालावधी सारखा नसतो. रोगाचे स्वरूप, कालावधी, रुग्णाची अवस्था, जीवनशैली, आहार, औषध आणि उपचारपद्धती यानुसार परिणाम बदलू शकतो.
काही परिस्थितींमध्ये लक्षणांमध्ये तुलनेने लवकर बदल जाणवू शकतो, तर काही दीर्घकालीन समस्यांमध्ये उपचारास वेळ लागू शकतो. त्यामुळे तीन दिवसांत परिणाम नाही म्हणजे आयुर्वेद काम करत नाही हा निष्कर्ष चुकीचा आहे.
त्याचप्रमाणे औषध घेतले की नक्कीच परिणाम होईल असा अतिरेकही योग्य नाही.

मिथक 7 : आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म.
तथ्य : पंचकर्म हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे चिकित्साशास्त्रीय अंग आहे; परंतु आयुर्वेद = पंचकर्म असे समीकरण चुकीचे आहे.
रुग्णाची अवस्था, रोग, दोष-दुष्य संबंध, अग्नी, बल, ऋतू आणि इतर घटकांचा विचार करून उपचारपद्धती ठरवली जाते.
प्रत्येक व्यक्तीला पंचकर्माची गरज असतेच असे नाही.
पंचकर्म ही स्पा ट्रिटमेंट किंवा रिलॅक्सेशन मॅसेज यांची समानार्थी संकल्पनादेखील नाही. योग्य निदान, पूर्वकर्म, मुख्य कर्म आणि पश्चात्कर्म यांचा चिकित्सकीय विचार आवश्यक असतो.
मिथक 8 : पंचकर्म म्हणजे फक्त तेलमालिश.
तथ्य : अभ्यंग हा आयुर्वेदातील एक उपचार आहे; परंतु पंचकर्माची संकल्पना त्यापेक्षा व्यापक आहे. पंचकर्मातील विविध उपचार विशिष्ट चिकित्सीय उद्देशाने आणि योग्य पात्र चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात.
सोशल मीडियावरील पंचकर्म करून शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर काढा अशा आकर्षक घोषणांकडे वैद्यकीय दृष्टीने सावधपणे पाहणे गरजेचे आहे.
उपचाराची गरज आहे का, कोणता उपचार योग्य आहे, किती कालावधीचा आहे- हे व्यक्तीनुसार ठरते.

मिथक 9 : घरच्या घरी सगळे आयुर्वेदिक उपचार करता येतात.
तथ्य : काही साधे आरोग्यदायी आहार-विहाराचे नियम दैनंदिन जीवनात नक्कीच अंगीकारता येतात. उदा. योग्य झोप, नियमित व्यायाम, ऋतूनुसार आहार, ताजे व संतुलित अन्न, योग्य प्रमाणात पाणी, ताणाचे व्यवस्थापन इत्यादी. परंतु औषधांची मात्रा ठरवणे, दीर्घकाळ औषध घेणे, शोधन उपचार करणे किंवा गंभीर आजारावर उपचार करणे हे स्वतःच्या अंदाजाने करू नये.
माझ्या नातेवाईकाला हे औषध उपयोगी पडले, त्यामुळे मलाही तेच घ्यायचे हा उपचाराचा योग्य आधार नाही.

मिथक 10 : माझ्या मित्राला फायदा झाला, म्हणजे मलादेखील होईल.
तथ्य : आयुर्वेदात व्यक्तिनिष्ठ उपचाराला विशेष महत्त्व आहे. दोन व्यक्तींना एकसारखी लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती, अग्नी, वय, आहार, जीवनशैली, इतर आजार आणि औषधोपचार वेगळे असू शकतात.
म्हणून दुसऱ्या व्यक्तीला उपयोगी पडलेले औषध स्वतःसाठी योग्य असेलच असे नाही. प्रिस्क्रिप्शन शेअर करणे म्हणजे ट्रिटमेंट शेअर करणे नव्हे.

मिथक 11 : आयुर्वेदिक औषधे घेत असताना आहाराचे काही महत्त्व नाही.
तथ्य : आयुर्वेदात आहाराला चिकित्सेचा महत्त्वाचा भाग मानले जाते. फक्त औषध घेऊन बाकी जीवनशैली पूर्वीसारखीच ठेवली तर अपेक्षित परिणाम मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
रोग आणि व्यक्तीनुसार काही पदार्थ टाळण्याचा किंवा काही पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला चिकित्सक देऊ शकतो. अधिकृत आयुष मार्गदर्शक माहितीतही औषधोपचारानुसार आहारातील बदल व्यक्तीनुसार ठरू शकतात असे नमूद केले आहे.
म्हणूनच आयुर्वेदाचा मूलभूत संदेश केवळ औषध घ्या एवढाच नाही; तर आहार-विहार सुधारणाही उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.

मिथक 12 : आयुर्वेद म्हणजे फक्त आजारी पडल्यानंतरची चिकित्सा.
तथ्य : आयुर्वेदाचा मोठा भर स्वास्थ्यरक्षणावर आहे. आजच्या जीवनशैलीत झोपेची कमतरता, सतत स्क्रीनचा वापर, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, अति खाणे आणि प्रदूषण यांचा शरीरावर परिणाम होतो.
त्यामुळे आजार होण्याची वाट न पाहता-
नियमित दिनचर्या, योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, ऋतूनुसार जीवनशैली, मानसिक संतुलन, वैयक्तिक स्वच्छता, योग्य वेळी आरोग्य तपासणी या गोष्टींना महत्त्व देणे आवश्यक आहे.

मिथक 13 : महागडे आयुर्वेदिक उत्पादन म्हणजे अधिक चांगले.
तथ्य : औषधाची किंमत ही त्याच्या परिणामकारकतेचा पुरावा नाही.
आज बाजारात अनेक प्रकारची हार्बल उत्पादने, सप्लिमेन्ट्स, ऑईल्स, पावडर आणि फॉम्युलेशन्स उपलब्ध आहेत. आकर्षक जाहिरात, प्रसिद्ध व्यक्तींचे समर्थन किंवा रिव्ह्यूव्स यावरून औषधाची गुणवत्ता किंवा योग्यता ठरवता येत नाही.
औषध घेताना घटक, निर्माता, उत्पादनाची माहिती, एक्सपायरी डेट, योग्य वापर आणि चिकित्सकांचा सल्ला यांचा विचार करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदिक औषधांनाही एक्सपायरी डेट असते आणि ती तपासणे आवश्यक असल्याचे अधिकृत आयुष माहितीत स्पष्ट केले आहे.

मिथक 14 : ऑनलाइन पाहिलेली आयुर्वेदिक रेसिपी म्हणजे डॉक्टरांचा सल्ला.
तथ्य : इंटरनेट आणि सोशल मीडिया हे माहितीचे साधन आहेत; निदान आणि वैयक्तिक उपचाराचे पर्याय नाहीत. हे चूर्ण सकाळी घ्या, हा काढा सात दिवस घ्या, ही वनस्पती सर्व रोग बरे करते अशा पोस्ट्समध्ये व्यक्तीनुसार बदलणारे महत्त्वाचे घटक अनेकदा विचारात घेतलेले नसतात. त्यामुळे सोशल मीडिया माहितीचा उपयोग जागरूकतेसाठी करावा; वैयक्तिक उपचारासाठी पात्र चिकित्सकांचा सल्ला घ्यावा.

मिथक 15 : आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्यात नेहमी संघर्षच असतो.
तथ्य : रुग्णासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित आणि योग्य आरोग्यसेवा. आवश्यकतेनुसार विविध वैद्यकीय प्रणालींमध्ये योग्य संदर्भ आणि संवाद महत्त्वाचे ठरतात.
एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार, आयसीयू केअर किंवा तातडीची तपासणी आवश्यक असेल तर विलंब करणे योग्य नाही.
त्याचप्रमाणे रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेत असेल तर त्याची माहिती इतर डॉक्टरांपासून लपवणेही योग्य नाही. रुग्णाच्या हितासाठी संवाद आणि परस्पर समन्वय आवश्यक आहे.

मग खरा आयुर्वेद कोणता?
आयुर्वेदाकडे दोन टोकांच्या दृष्टिकोनातून पाहणे टाळले पाहिजे.
एक टोक म्हणजे- आयुर्वेदात काहीच वैज्ञानिक नाही आणि दुसरे टोक म्हणजे- आयुर्वेदातील प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली आहे आणि कोणतेही आयुर्वेदिक औषध पूर्णपणे सुरक्षित आहे. दोन्ही भूमिका अतिरेकी आहेत.
आयुर्वेदाच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करताना आधुनिक संशोधन, वैद्यकीय पुरावा, औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि फार्माकोव्हिजिलन्स यांनाही समान महत्त्व देणे आवश्यक आहे.
आज सीसीआरएएस, मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि इतर संस्थांकडून पुराव्याचा आधार मजबूत करण्यासाठी संशोधन केले जात आहे. आयुष रिसर्च पोर्टलवर हजारो संशोधन नोंदी उपलब्ध आहेत.

रुग्णांनी आयुर्वेदिक उपचार घेताना काय काळजी घ्यावी?

  1. पात्र आयुर्वेद चिकित्सकांचा सल्ला घ्या.
  • फक्त सोशल मीडिया किंवा मित्रांच्या अनुभवावर औषध सुरू करू नका.
  1. आपली सर्व औषधे डॉक्टरांना सांगा.
  • ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, सप्लिमेंट्स किंवा इतर कोणतीही औषधे घेत असल्यास माहिती द्या.
  1. स्वतःहून औषधांची मात्रा वाढवू नका.
  • जास्त घेतले तर लवकर फायदा होईल हा समज चुकीचा असू शकतो.
  1. औषधाची एक्सपायरी डेट तपासा.
  • जुनी किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेली औषधे वापरू नका.
  1. अनधिकृत आणि अतिशयोक्त जाहिरातींपासून सावध राहा.
  • 100 % क्युअर, सर्व रोगांवर रामबाण, आजीवन उपचार, डॉक्टरची गरज नाही अशा दाव्यांकडे विशेष सावधपणे पाहावे.
  1. उपचारादरम्यान त्रास झाल्यास डॉक्टरांना कळवा.
  • औषधामुळे कोणताही अनपेक्षित त्रास झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. भारतात आयुष फार्माकोव्हिजिलन्स यंत्रणा प्रतिकूल औषध प्रतिक्रियांचे दस्तऐवजीकरण आणि निरीक्षण करते.

आयुर्वेदाची खरी ताकद कुठे आहे?
आयुर्वेदाची खरी ओळख केवळ हर्बल औषध या शब्दात नाही. व्यक्तीचा संपूर्ण विचार, आहार-विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, रोगप्रतिबंध, जीवनशैली आणि चिकित्सकाचा वैयक्तिक दृष्टिकोन ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. मात्र या परंपरेला आधुनिक काळात अधिक सक्षम बनवायचे असेल तर वैज्ञानिक संशोधन, दर्जेदार वैद्यकीय चाचण्या, औषधांची गुणवत्ता, मानकीकरण, प्रमाणीकरण आणि योग्य प्रशिक्षण यांना अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.
थकज देखील ट्रेडिशनल मेडिसिनच्या आरोग्यव्यवस्थेतील वापराबाबत सुरक्षितता, गुणवत्ता आणि वैज्ञानिक पुरावा यांवर भर देते.
शेवटी एवढेच… आयुर्वेदाबद्दल अंधश्रद्धा नको आणि अंधनकारात्मकताही नको. परंपरेचा आदर + आधुनिक विज्ञानाची कसोटी + रुग्णाची सुरक्षितता = जबाबदार आयुर्वेद.
नैसर्गिक आहे म्हणून सुरक्षित हा गैरसमज जितका टाळायला हवा, तितकाच पारंपरिक आहे म्हणून वैज्ञानिक नाही हा निष्कर्षही टाळायला हवा.
प्रत्येक उपचाराकडे प्रश्न विचारून, पुरावे समजून, योग्य चिकित्सकाचा सल्ला घेऊन आणि स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारून पाहिले पाहिजे.
आयुर्वेदाचे भविष्य केवळ त्याच्या प्राचीनतेत नाही; तर ज्ञान, संशोधन, चिकित्सकीय कौशल्य, सुरक्षितता आणि आधुनिक काळाशी सुसंगत वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये आहे.
आयुर्वेदाविषयी योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवणे ही केवळ चिकित्सकांची जबाबदारी नाही- तर आरोग्याविषयी जागरूक नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे.