तुयेत इलेक्ट्रॉनिक नगरीचा प्रस्ताव : मुख्यमंत्री
दोनापावल येथील वादग्रस्त आयटी हॅबिटॅट चिंबल कदंब पठारावर नेण्याचा सरकारने निर्णय घेतला असून तेथे सरकारची दोन लाख चौरस मीटर जमीन असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.आयटी क्षेत्रातील युवकांना नोकर्यांच्या संधी निर्माण करणे हा या प्रकल्पामागचा प्रमुख हेतू आहे. त्यासाठी सल्लागार विकासक शोधण्याचे काम चालू आहे, वरील जागा विकसित करून तेथे वेगवेगळे आयटी प्रकल्प उभारले जातील. या प्रकल्पांना वाव असल्याचे पार्सेकर म्हणाले.
तुयेत इलेक्ट्रॉनिक नगरीचा प्रस्ताव
तुये येथील सहा लाख चौ. मी. जागेत इलेक्ट्रॉनिक नगरी उभारण्याचा प्रस्ताव असून पुढील पंधरा दिवसात आढावा बैठक घेऊन हा विषय निकालात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील फार्मा उद्योगाचा विस्तार करण्यास प्रोत्साहन देण्याचे सरकारने ठरविले आहे. संबंधित कंपन्यांकडून प्रकल्पाच्या विस्तारासाठी प्रस्ताव मागविणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
या उद्योगात तरुणींना अधिक नोकर्यांच्या संधी मिळतात, असेही पार्सेकर म्हणाले. आयटी हॅबीटॅटमध्ये पुढील दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकर्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले.
दोनापावल येथील जागेचे काय करणार याबाबतीत सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही.

