सांताक्रुझ परिसरात नाकाबंदी दरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची कारगाडी अडवून तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात बोलावून शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार पोलीस खात्यात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यात चोऱ्या, गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी करण्याचा निर्देश दिलेला आहे. या निर्देशानुसार सांताक्रुझ भागातील नाकाबंदीच्या वेळी पोलीस पथकाने एका कारची तपासणी सुरू केली. त्यावेळी कारमधील व्यक्तीने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. त्या आयएएस अधिकाऱ्याने याबाबत उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयात बोलावून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. आपले काम चोखपणे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ठोठावण्यात आलेल्या उठाबशा काढायला लावल्याच्या प्रकाराबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महासंचालकांकडून गंभीर दखल
दरम्यान, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्याला उठाबशा काढायला लावण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेली शिक्षा पूर्णपणे अयोग्य आणि नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी कर्तव्यावर असताना नियमांचे पालन केले असेल, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

