31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

  • डॉ. विठ्ठल ठाकूर

त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक येऊन घेत असत. निकालही चांगला लागत असे. या काळात गोव्याच्या अन्य ठिकाणीही अशाच मराठी शाळा खाजगी स्वरूपात चालू करण्यात आल्या होत्या. शिवाय पोर्तुगीज सरकारच्या मोफत शिक्षण देणार्‍या शाळा होत्याच. आमोण्यात आलेल्या शिक्षकांची निवास व भोजनादीची व्यवस्था श्री. विष्णू ठाकूर मोफत करत. शिक्षकांना दरमहा पगार म्हणून रुपये १५ देण्यात येत असत. या शिक्षकांनी खूप वर्षे उत्तम प्रकारे विद्यादान केले… डॉ. विठ्ठल ठाकूर यांच्या ९० वर्षीय काकांनी रामदास विद्यालयाच्या काही आठवणी लिहून काढल्या. त्यातूनच हा लेखनप्रपंच…

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याची शैक्षणिक स्थिती अत्यंत नाजूक होती. वसाहतवादी पोर्तुगिजांच्या जुलमी सत्तेमुळे कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. लोक थोडीबहुत शेती व छोट्या प्रमाणावर व्यापार-व्यवसाय करीत. बहुजन समाजाला शिक्षणाचे तसे महत्त्व कळलेच नव्हते. शिक्षणाच्या तशा पुरेशा सोयीही उपलब्ध नव्हत्या. पोर्तुगीज प्रशासनाने तर दडपशाहीचे धोरण स्वीकारले होते. देश, धर्म, संस्कृती, शिक्षण आदी गोष्टींना त्यांचा प्रखर विरोध होता. मात्र पोर्तुगीज प्रशासनात आपली वट लागावी यासाठी काही उच्चभ्रू हिंदू समाज आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला हिंदू समाज यांनी तत्कालीन पोर्तुगीज भाषेतून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे उच्चभ्रू हिंदू समाज आणि नवख्रिस्ती समाज यांना नोकर्‍या मिळू लागल्या, तर हिंदू बहुजन समाज शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहिला. या निद्रिस्त हिंदू समाजाला जागं करण्यासाठी या समाजातील काही अस्वस्थ विचारवंत पुढे सरसावले. त्यांनी एकत्रितपणे आणि एकनिष्ठेने विचारविनिमय केला. विचारांती त्यांच्या लक्षात आले की शिक्षणाअभावी हिंदू समाजाला ग्लानी आली आहे. या ग्लानीतून त्याना जागं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, समाज सुशिक्षित बनला पाहिजे; आणि यासाठी ज्ञान देणार्‍या शिक्षणासारख्या सोयी समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत
या हेतूनेच आमोणा, ता. डिचोली येथे गावातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने अथक परिश्रम घेऊन एक प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. यात शांबा र. शे. आमोणकर, गुणबा तेलंग, जगन्नाथ तेलंग, पांडुरंग रायकर, विष्णू ठाकूर यांचा प्रामुख्याने सहभाग होता. या शाळेत शिक्षक म्हणून प्रथमतः (एक शिक्षकी शाळा) पाट-परुळा (महाराष्ट्र) येथील नारायण रा. देसाई यांची योजना करण्यात आली होती. शाळेत सुमारे ७०-८० मुलांची हजेरी होती. शाळा मराठी पहिली ते चौथीपर्यंत होती. वर्ग फी म्हणून त्या काळात अनुक्रमे पहिली ते पाचवी आठ आणे, दहा आणे, बारा आणे व एक रुपया घेतला जात असे. तसेच गोमंतक मराठा समाज, मुंबई या संस्थेकडून नादार, अर्धनादार अशी सवलत मिळत असे.

त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक येऊन घेत असत. निकालही चांगला लागत असे. याच काळात जवळच्या माशेल, कुंभारजुवे तसेच अन्य ठिकाणीही अशाच मराठी शाळा खाजगी स्वरूपात चालू करण्यात आल्या होत्या. शिवाय पोर्तुगीज सरकारच्या मोफत शिक्षण देणार्‍या शाळा होत्याच. आमोण्यात आलेल्या शिक्षकांची निवास व भोजनादीची व्यवस्था श्री. विष्णू ठाकूर मोफत करत. शिक्षकांना दरमहा पगार म्हणून रुपये १५ देण्यात येत असत. पुढे महागाई म्हणून त्यांना ४० रुपयांपर्यंत पगार वाढवण्यात आला.

या शिक्षकांनी खूप वर्षे उत्तम प्रकारे काम केले. याच काळात माशेल येथे देसाई गुरुजी व कुंभारजुवे येथे सामंत गुरुजी हेसुद्धा बरीच वर्षे काम करत होते. त्यावेळी गोव्यातील शाळांत महाराष्ट्रातूनच शिक्षक आणावे लागत. पण पुढे पोर्तुगीज व शेजारील सरकारांचे संबंध बिघडत गेले. पुढे मग महागाईही वाढत गेली. आमच्या येथील शिक्षकांची लग्ने झाली, त्यांना मुले-बाळे झाली आणि ते आपल्या गावी निघून गेले.
पोर्तुगीज काळात फार प्रयत्नाने आमोण्याची शाळा चालू झाली होती. या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने मराठी प्राथमिक शाळा महागाई असूनही चालू ठेवली होती. ज्यांना शक्य होते ते आपल्या पाल्यांना पुढील शिक्षण म्हापशात ठेवून देत असत. कारण शिक्षण नाही तर नोकरी-व्यवसाय नाही. तेव्हा पुढील शिक्षणाची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक होते. बाहेर शहरात जाऊन शिक्षण घेणे किती कठीण आहे हे या लोकांना पटू लागले होते. याच काळात गावातील एक गृहस्थ गोविंद सु. आमोणकर यांनी आपण गावात शिकवलेल्यांना प्रोत्साहन देऊ, असा विचार मनात आणला. गावातल्याच काही मुलांच्या मनात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले व ते लवकरच फलद्रूप झाले. त्यांनी त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या. जिकडे-तिकडे बैठका घेतल्या व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. अथक प्रयत्नांती संस्थेच्या रजिस्टरमध्ये सभासदांची नोंदणी सुरू झाली आणि पुढे गावातील नागरिकांतून कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. या मंडळात शांबा आमोणकर, रोहिदास आमोणकर, महादेव शिनारी, विष्णू भगत, रावजी सावंत, लक्ष्मण आमोणकर, मनोहर नाईक, नारायण घाडी, गणेश ठाकूर, गुरुदास नाईक व इतर, तसेच आयोजक गोविंद सु. आमोणकर यांचा समावेश होता. शिक्षक म्हणून सतीश सातार्डेकर (मुख्याध्यापक), शालिनी मणेरीकर (वाचनालय), गजानन पेडणेकर व इतर कर्मचारी म्हणून देऊ भगत व तुलसीदास घाडी यांची नेमणूक करण्यात आली.

आमोणा येथील शाळेची काही वैशिष्ट्ये
श्री. गोविंद आमोणकर हे आमोणा येथील निवासी. त्यांचे डिचोली येथे लहानसे छपाई यंत्र होते. श्री. शांबा आमोणकर हे पोर्तुगीज काळात रेजिदोर (सरकारमान्य स्थानिक अधिकारी) होते. श्री. नारायण देसाई यांच्या सासूबाई या महाराष्ट्रातील एक अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांची आजी होत. या शाळेला पुढील परीक्षा घेण्याची परवानगी नसल्याने श्री. देसाई यांनी उभादांडा येथील हायस्कूलमध्ये या शाळेमधील बर्‍याच विद्यार्थ्यांची नोंद करून त्यांचा परीक्षेचा प्रश्‍न सोडवला (कारण, दोन्हीकडचा अभ्यासक्रम एकच होता). हे विद्यार्थी उत्तम गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांतील कित्येकांनी छोटी-मोठी नोकरी स्वीकारली, तर काही व्यवसायात स्थिरावले. पुढे गोवा सरकारचे अनुदान सुरू झाले. सुरुवातीला ही शाळा मराठी माध्यमातून शिक्षण देत होती. नंतर पालकांच्या मागणीवरून इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. पुढे कालपरत्वे या शाळेत सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे या शाळेची नवी इमारत उभी होऊ शकत नव्हती. नंतर शासनाची मान्यता घेऊन ही शाळा सरकारच्या स्वाधीन करण्यात आली. पुढे गोवा सरकारने नवी इमारत व सर्व सोयी-सुविधा या शाळेला उपलब्ध करून दिल्या. ही शाळा आज उत्तम प्रकारे चालू आहे.

आमोण्याचे रामदास विद्यालय कसे चालायचे?
शाळेची वेळ सकाळी ७ ते १० व सायंकाळी ३ ते ६. शाळेत वेळेवर येणे आवश्यक होते. सकाळी ९ च्या दरम्यान मध्यंतर. सकाळी ज्या विद्यार्थ्यांची न्याहारी झालेली नसेल त्यांना या वेळेत न्याहारी घेणे शक्य होई. सकाळी ७ वा. प्रार्थना होत असे. सायंकाळी सुमारे ४च्या दरम्यान मध्यंतर. प्रत्येक शनिवारी प्रत्येक मुलाने एक पैसा आणायचा. या पैशातून भाजलेले चणे आणून शाळा सुटताना प्रत्येक मुलाला ते चणे देत असत. आज ज्या ठिकाणी घाडी यांचे हॉटेल आहे, त्या जागेवर पूर्वी श्री. केणी यांचे भुसारी दुकान होते. त्यांच्याकडे मुलांना थोड्या सवलतीत उपयुक्त शालोपयोगी साहित्य मिळत असे. प्रत्येक शनिवारी प्रत्येक मुलाने शाळेत येताना मराठी व मोडी बाराखडी, दोन ते तीसपर्यंत पाढे, पावकी ते औटकीपर्यंत पाढे, तसेच एक पैसा ते रुपयापर्यंतचे पाढे लिहून आणायचे. मुलांनी पाट्यांची अदलाबदल करून ते व्यवस्थित तपासायचे. शनिवारी संध्याकाळी सर्व पाढे म्हणायचे. तोंडी हिशेब करायचे (गणित विषय). ज्या मुलांचा हिशेब चुकत असेल त्या मुलाच्या नाकाला उत्तीर्ण मुलाने डावा हात लावायचा, ही त्या मुलाला शिक्षा. तसेच गरज तर उठाबश्या काढायला लावायच्या. अभ्यासक्रमात मोडी विषय असायचा. अंकगणित, तोंडी हिशेबाची पुस्तके असायची (मांडके, वर्तक). तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर व चित्रकला हे विषय असायचे. तसेच पुठ्ठे तयार करायचे. सहामाही व वार्षिक अशा दोन परीक्षा असायच्या. सरकारी मान्यता असलेले चांगले परीक्षक असायचे, त्यामुळे शिक्षक आपली जबाबदारी ओळखून व्यवस्थित विद्यादान करायचे. रामदास विद्यालयात अपरी, पहिली, दुसरी, तिसरी व चौथी असे वर्ग होते.

आमोणा गावातील काही उपक्रम
मुंबईस्थित गोमंतक मराठा समाजाची पणजी येथे एक शाखा आहे. ही संस्था सरकारमान्य आहे. पूर्वी या संस्थेचे ‘समाजसुधारक’ असे एक मासिक होते. त्याचे गावात काही सभासद होते. ते मासिक सभासदांना नियमित येत असे. या संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना नादार, अर्धनादार, पूर्णनादार अशी सवलत देण्यात येत असे. या विद्यालयाची वार्षिक परीक्षा झाल्यावर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि प्रशस्तिपत्रके दिली जात. आमोण्याची मराठी शाळा सुरू होण्यापूर्वी बरीच वर्षे आधी अपरी ते चौथीपर्यंत मोफत पोर्तुगीज शाळा सुरू झाली होती. गावातील काही मुले या शाळेत जात असत. तसेच त्यावेळी गावात अपरी ते दुसरी अशी मराठी शिक्षण देणारी खाजगी शिकवणीही कुणी सुरू केली होती. काही मुले या शिकवणीला जात आणि पुढील शिक्षणासाठी या शाळेत येत. रविवार, गावातील उत्सव आणि सार्वजनिक सुट्‌ट्या शाळा देत असे.
पोर्तुगीज सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नसताना फक्त मराठीच्या प्रेमाखातर गावातील लोक हे विद्यालय स्वखर्चाने चालवत होते आणि गोवा स्वतंत्र होईपर्यंत ते चालू होते. त्याकाळी अशा बर्‍याच शाळा लोकांनी कठीण परिस्थितीत टिकवून ठेवल्या होत्या. आज त्यांची फळं गोव्यात दिसताहेत. गोवा आता शैक्षणिकदृष्ट्या खूपच आघाडीवर आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

पौर्णिमा केरकर ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून...