आमदार वीरेश बोरकरांकडून पक्षाच्याडिजिटल मालमत्तेचा अनधिकृत ताबा

0
11

आरजीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप, तक्रार दाखल

रिव्होल्युशनरी गोअन्स पक्ष (आरजीपी) या प्रादेशिक पक्षातील नेत्यामधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. आता, आरजीपीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गटाने पक्षाचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

आमदार बोरकर यांनी पक्षाचे फेसबुक पेज, ईमेल खाते आणि यूट्यूब चॅनल या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी ही तक्रार केली आहे. आमदार बोरकर यांनी पक्षाच्या अधिकृत डिजिटल मालमत्तेचा ताबा अनधिकृतपणे घेतल्यामुळे, नियुक्त पदाधिकाऱ्यांपैकी काहींना या प्लॅटफॉर्म्सचे कामकाज पाहण्यापासून रोखले गेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि संबंधित खात्यांचा ताबा पुन्हा पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींकडे सोपवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांना या प्लॅटफॉर्मवरून प्रशासक पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना अधिकृत डिजिटल खात्यांमध्ये प्रवेश करण्यापासून किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यापासून रोखण्यात आले आहे.

पक्षाच्या नेतृत्वाच्या मंजुरीशिवाय अधिकृत ईमेल खात्याचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, रिकव्हरी सेटिंग्ज आणि इतर सुरक्षा तपशील कथितरित्या बदलण्यात आले. अधिकृत ईमेल खाते पक्षाच्या बँक खात्याशी आणि अनेक अधिकृत कामांशी जोडलेले आहे, ज्यामुळे या खात्याचा अनधिकृत किंवा बेकायदेशीर कामांसाठी गैरवापर होण्याची शक्यता आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरजीपीतील काही नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत आमदार बोरकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. आमदार बोरकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधल्यास त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. आरजीपी या प्रादेशिक पक्षातील नेत्यामधील अंतर्गत मतभेद मिटण्याची चिन्हे दिसत नाही. हा अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.