Home बातम्या आमदार फळदेसाईंच्या पाठिंब्यावरील पॅनल सहकारी बँकेच्या निवडणुकीत

आमदार फळदेसाईंच्या पाठिंब्यावरील पॅनल सहकारी बँकेच्या निवडणुकीत

0

गोवा राज्य सहकारी बँकेने दि. १९ रोजीच्या निवडणुकीसाठी सुरू केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करणे सरकारला शक्य न झाल्याने आमदार सुभाष फळदेसाई यांचा पाठिंबा असलेल्या गोवा राज्य सहकारी बँक बचाव समितीने आपले पॅनल निवडणूक रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. वरील पॅनल निवडून आल्यानंतर बँकेचा कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळेल, असे आमदार फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

सहकार क्षेत्रात हस्तक्षेप करीत असल्याचे आरोप होईल यासाठीच सरकारने हस्तक्षेप करण्याचे टाळल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. या पॅनलमध्ये व्हीकेएस सोसायटीच्यावतीने आवेलिन मार्कुस डिसिल्वा, डॉ. दत्ताराम देसाई, कृष्णा कुडणेकर व प्रदीप नाईक निवडणूक लढवतील. पगारदारांसाठी असलेल्या ३ पदांसाठी विठ्ठल वेर्णेकर, दत्तात्रय नाईक व संजय सावंत देसाई, अर्बन सोसायटीच्या एका पदासाठी उल्हास फळदेसाई, ग्राहक सोसायटच्या दोन पदांसाठी नारायण मांद्रेकर, पांडुरंग गावडे, वैयक्तिक एका पदासाठी सुभाष हळर्णकर तर डेअरीच्यावतीने श्रीकांत नाईक निवडणूक लढवतील. आपला संबंध सहकार क्षेत्राकडे जवळ-जवळ वीस वर्षांचा असून बँकेवर असलेली एकाधिकारशाही नष्ट केल्याशिवाय बँकेला गतवैभव प्राप्त होणे शक्य नाही, असे सांगून या निवडणुकीत गोवा राज्य सहकारी बँक बचाव समितीचा गटच निवडून येतील, असा विश्‍वास फळदेसाई यांनी व्यक्त केला. दोन वर्षांच्या काळात बँकेला नफा मिळवून देणे शक्य होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. बँकेचे आरोग्य सुधारण्यासाठीच आपण निवडणूक लढवित असल्याचे डॉ. दत्ताराम देसाई यांनी सांगितले.