मणिपाल इस्पितळात सुरू होते उपचार
आज अंत्यसंस्कार, राज्यात दोन दिवस दुखवटा
ताळगाव मतदारसंघाच्या भाजप आमदार व माजी मंत्री जेनिफर मोन्सेर्रात (56) यांचे काल रविवारी 19 जुलै रोजी अल्पकाळाच्या आजारानंतर निधन झाले. मुंबईतील खासगी इस्पितळात उपचार घेऊन त्या परतल्या होत्या. काल दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात उपचार चालू असताना दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कार आज सोमवारी होणार असून पार्थिव शवागरात ठेवले आहे.
जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनाचे वृत्त समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या ताळगाव मतदारसंघातील लोकांबरोबरच पणजी व आसपासच्या लोकांनी तसेच राजकीय नेते, पणजी महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच मोन्सेर्रात कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या अन्य विविध क्षेत्रांतील लोकांनी मणिपाल इस्पितळात धाव घेतली. तिथे जेनिफर यांचे पती मंत्री बाबुश मोन्सेर्रात व पुत्र महापौर रोहित मोन्सेर्रात व कुटुंबीयांचे सांत्वन केले. संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, तसेच अन्य मंत्री व आमदार यानी जेनिफर मोन्सेर्रात यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच ताळगाव, पणजी तसेच अन्य विविध भागांतील लोकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पार्थिवाचे दर्शन घेतले.
2012मध्ये आमदार
2012 साली जेनिफर या पहिल्यांदा ताळगाव विधानसभेत ताळगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाल्या होत्या. 2017 साली त्या पुन्हा ताळगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. जुलै 2019 मध्ये काँग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 आमदारांमध्ये त्या होत्या. त्यावेळी त्यांना डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात महसूल, माहिती तंत्रज्ञान, कामगार व रोजगार मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला सदस्य होत्या. आपली पत्नी जेनिफर यांना राजकारणात आणण्यासाठी ताळगाव मतदारसंघाचे आमदार बाबुश यांनी 2012 साली आपल्या ताळगाव मतदारसंघाचा त्याग केला होता आणि स्वत: सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी बाबुश यांना पराभवचा सामना करावा लागला होता. गेल्या 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतून जेनिफर ह्या तिसऱ्यांदा ताळगाव मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. भाजपच्या उमेदवारीवर त्या विजयी झाल्या होत्या. जेनिफर यांचे पार्थिव आज जनतेला अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे मोन्सेर्रात कुटुंबीयांनी कळवले आहे.
राज्यात दोन दिवसांचा दुखवटा
ताळगावच्या आमदार व माजी मंत्री जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर गोवा सरकारने दु:ख व्यक्त केले असून काल 19 जुलै व आज 20 जुलै असे दोन दिवस राज्यभर दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 20 जुलैपर्यंत तिरंगा अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच राज्य सरकारच्यावतीने आज 20 जुलैपर्यंत कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
विधानसभेच्या दोन जागा रिक्त
आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्या जाण्याने गोवा विधानसभेतील दोन जागा रिक्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फोंडा मतदारसंघाचे आमदार व कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन झाले होते. त्यामुळे विधानसभेतील एक जागा रिक्त झाली होती. आता जेनिफर यांच्या मृत्यूमुळे आणखी एक जागा रिक्त झाली असून विधानसभेतील आमदारांची संख्या 38 वर आली आहे.
हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार
जेनिफर मोन्सेर्रात यांच्यावर आज सोमवारी त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सांतइनेज येथील स्मशानभूमीत मंंत्राग्नी देण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी दुपारी 3.30 वा. ख्रिस्ती धर्मानुसार ताळगाव येथील चर्चमध्ये प्रार्थना होईल, अशी माहिती मोन्सेर्रात कुटुंबातील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना शोक
आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने आपणाला अतिव दु:ख झाल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत यानी मोन्सेर्रात कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. जेनिफर यांनी आमदार व मंत्री म्हणून काम करताना आपल्या ताळगाव मतदारसंघातील जनता तसेच गोमंतकीयांची समर्पित भावनेने सेवा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
धक्कादायक वृत्त ः दामू नाईक
गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले असून त्यांचे जाणे हे जेवढे धक्कादायक तेवढेच दु:खदही असल्याचे म्हटले आहे.
दुःखद वार्ता ः चोडणकर
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांचे जाणे हे दु:खद असल्याचे म्हटले आहे.
अतिव दुःख ः मंत्री कामत
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राज्याच्या माजी महसूलमंत्री व विद्यमान आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनाने आपणाला दु:ख झाले असून त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण शोक संवेदना व्यक्त करीत असल्याचे कामत यानी म्हटले आहे.
युरी आलेमांवकडून शोक
विरोधी पक्षनेेते युरी आलेमाव यांनी ताळगावच्या आमदार व माजी मंत्री जेनिफर मोन्सेर्रात यांच्या निधनावर शोक व्यकनत केला असून त्यांच्या अकाली जाण्याने आपणाला तीव्र दु:ख झाले असल्याचे म्हटले आहे. त्यांचे पती मंत्री बाबुश मोन्सेर्रात व कुटुंबियांना त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

