भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदारांना शिस्त पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने आता पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्न करीत असल्याने काही वेळा आरोप-प्रत्यारोप केले जातात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपच्या गाभा समितीची बैठक प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या विषयावर चर्चा करून रणनीती निश्चित करण्यात आली. या बैठकीत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबरोबरच संघटनात्मक कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. ॲप आधारित टॅक्सीच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अकरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. असे नाईक यांनी सांगितले. भाजपपासून दूर गेलेले जुने कार्यकर्ते पुन्हा पक्षाकडे आकर्षित होत आहे. या जुन्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

