आमदारकी अन्‌‍ भाजप सोडणार नाही : गोविंद गावडे

0
2

अफवांच्या पार्श्वभूमीवर माशेलातील जाहीर सभेत केले स्पष्ट; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर नाव न घेता टीका

आपणाविरोधात अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. त्या अफवा आणि भूलथापाना हिंतचितकांनी बळी पडू नये. आपण आमदारकी आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार, अशी अफवा देखील पसरविण्यात येत आहे; मात्र आपण आमदारकी आणि भाजपचा राजीनामा देणार नाही. आपणाला राजीनामा द्यायला सांगण्याचा अधिकार केवळ प्रियोळकरांना आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री गोविंद गावडे यांनी प्रियोळ प्रगती मंचने माशेल येथे आयोजित एका जाहीर सभेत काल केले. कामगिरीच्या आधारावर नव्हे, तर आदिवासी कल्याण खात्याच्या कारभाराबाबत सत्य बोललो, त्यामुळे आपल्याला मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, असेही गावडे म्हणाले.

गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानंतर ते पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्या पार्श्वभूमीवर कालच्या सभेत त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर गोविंद गावडे यांनी पहिल्यांदाच राजीनामानाट्याच्या संपूर्ण घटनाक्रमावर भाष्य केले. तसेच पक्षासाठी आपण काय काय काम केले, त्याची माहिती देखील दिली. तसेच गोविंद गावडेंनी यावेळी जनता आणि कार्यकर्त्यांना साष्टांग दंडवतही घातला.

18 जून रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचा आपणाला फोन आला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपणाला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. मी त्यांना सांगितले की, मला थोडा वेळ द्या जेणेकरून मी त्यांच्यावर दबाव आणणाऱ्यांशी बोलू शकेन. मी हे देखील स्पष्ट केले की मी राजीनामा देणार नाही, कारण माझा लढा नेहमीच जनतेसाठी आहे, असे गावडे म्हणाले.

गोवा विधानसभेच्या 2019 च्या पोटनिवडणुकीत शिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांना विजयी करण्यासाठी आपण सिंहाचा वाटा उचलला. त्यावेळी आपण भाजपचा प्राथमिक सदस्य सुध्दा नव्हतो, असे गावडे यांनी नमूद केले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणात मंत्री सुदिन ढवळीकर यांना सरकारचा समन्वयक नेण्याचे ठरवले, तेव्हा त्याला विरोध केला. नंतरच्या काळात भाजपचा आमदार मुख्यमंत्री व्हावा आणि त्यात आपले वर्गमित्र डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री व्हावे असे आपणच सुचविले होते, असा दावाही गावडे यांनी केला.
सभापती रमेश तवडकर यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपणावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण दिले होते. तसेच मुख्यमंत्री आणि पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आपले मंत्रिपद काढून ते त्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला देण्याची विनंती केली होती. आपण दोन वेळा मंत्रिपद परत घेण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर आपले मंत्रिपद काढून घेतल्यास आपल्या मतदारसंघातील विकासकामांवर परिणाम होऊ नये, अशी विनंती केली होती, असेही गावडे यांनी सांगितले.

भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट न घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास ठेवून 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. वर्ष 2022 च्या निवडणुकीत प्रियोळमधून निवडून आल्यानंतर मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली. त्यानंतर आपण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घडवून आणण्याची विनंती केली. तथापि, गेली साडेतीन वर्षे केंद्रीय नेत्यांची भेट घडवून आणली जात नाही. ह्यामागचे कारण समजत नाही, असेही गावडे म्हणाले.
वापरा आणि फेका या नीतीचा वापर करणाऱ्यांना बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. आपण गद्दार नाही आणि गद्दारीची भाषा करणार नाही. आपणाला खुर्चीची आशा नाही. माजी आमदार दिवंगत विष्णू वाघ यांनी आपणाला राजकारणात आणले. आपल्या कठीण काळात मंत्री रवी नाईक यांनी आधार दिला, असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या 25 मे रोजी आपण जे बोललो ते सर्वश्रुत आहे. काही माध्यमांनी शब्दांच्या गफलती करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. आपण एका मित्राला भेटण्यासाठी कुटुंबासह दुबईला गेलो होतो. आपल्या भाषणावरून गदारोळ झाल्याची माहिती मिळताच तातडीने गोव्यात दाखल झालो. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सव्वा तास चर्चा केली. त्यांनी वक्तव्य करताना घाई केली नाही. मात्र, कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वक्तव्य करून आपणावर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा देण्यात आला, असेही गावडे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की, त्यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा माझा राजीनामा मागण्यासाठी दबाव आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. मला सत्य बोलल्याबद्दल मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे. एखाद्या मंत्र्याने एखाद्या विभागाकडून कामगिरीची माहिती मागितली तर ते चुकीचे आहे का?, असा प्रश्नही गोविंद गावडे यांनी उपस्थित केला.

‘त्यांच्या’वर कारवाई कोण करणार?
आपल्या पदाची किंमत माहीत नसलेल्या आणि कुठलीही चौकशी न करता शिस्तभंगाची कारवाई होणारच, अशी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे वक्तव्य करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करणार त्याचे उत्तर द्या, अशी टीका गोविंद गावडे यांनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर केली.

केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी पत्र पाठवणार
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीसाठी पत्र पाठविणार आहे. आपण 25 मे 2025 रोजी केलेल्या भाषणाचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रपती यांना पाठवून गोव्यात सुरू असलेल्या कारभाराची माहिती देणार आहे, असेही गोविंद गावडे यांनी सांगितले.