रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर हे गद्दार असल्याचा गंभीर आरोप पत्रकारांशी बोलताना काल केला.
आमदार वीरेश बोरकर आणि आरजीपी कार्यकारी समितीतील (सीईसी) काही पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वाद कायम आहे. दहा जणांना पक्षातून काढून टाकण्याच्या कृतीबाबत आमदार वीरेश बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता, पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर आरोप केले आहेत.
आमदार बोरकर यांनी पक्षाशी प्रतारणा केली आहे. आरजीपीच्या संवाद माध्यमांवर अनधिकृत ताबा मिळवला आहे.गोव्याला विनाशापासून वाचवण्यासाठी पक्षाने एक क्रांती सुरू केली होती. मात्र, आमच्या लोकप्रतिनिधीने पक्षाच्या मूळ मूल्यांशी विसंगत वर्तन केले आहे. आमचा आमदार आता गद्दार बनला आहे. त्यांना आणि इतर सदस्यांना पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आदित्य देसाई याला त्या ग्रुपचे प्रमुख बनवण्यात आले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

