गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी पितृपक्ष संपताच काँग्रेस पक्षाबरोबर युतीसाठी चर्चेची तयारी चालवली असतानाच, गोवा फॉरवर्डबरोबर यापूर्वीच युती केलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबरच्या आघाडीत आपण सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतल्याने गोवा फॉरवर्ड व आप यांच्या ‘गोवा फर्स्ट’ या आघाडीत वितुष्ट निर्माण झाले आहे. आता ही युती कोणत्याही क्षणी तुटेल, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती काल सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.
आमच्या प्रतिनिधीने काल यासंंबंधी गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांना छेडले असता ते म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधारी भाजपविरोधात लढा द्यावा, अशी राज्यातील लोकांची मागणी आहे. आणि या लोकभावनेची सर्व विरोधी पक्षांनी कदर करायला हवी, असे आपले प्रामाणिक मत आहे. मात्र, काँग्रेस पक्षाकडून दोन हात दूरच रहायचे, अशी भूमिका आपने घेतली असून, ती गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी पोषक नसल्याचे मत सरदेसाईंनी व्यक्त केले.
गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसबरोबर युती करण्याच्या बाजूने असल्याचे सांगून आम आदमी पक्षाला या आघाडीत सहभागी व्हायचे आहे की नाही याचा त्यांना विनाविलंब निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाचे नेते संदेश तेलेकर देसाई यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, आम्ही जी युती केली हाती ती गोवा फॉरवर्डबरोबर केली होती. आता गोवा फॉरवर्ड आम्हाला काँग्रेसबरोबरच्या आघाडीत सहभागी व्हावे यासाठी आमच्यावर दबाव आणू शकत नाही. आम्हाला काँग्रेसबरोबरच्या आघाडीत सहभागी व्हायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

