केंद्रीय गृहसचिवांकडून इन्कार
आपले व आपल्या कुटुंबियांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला असून सरकारने मात्र काल त्याचा इन्कार केला. सरकारने सिन्हा यांचे फोन कधीही टॅप केलेले नाहीत, असे सरकारतर्फे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी काल सांगितले. सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबियांचे फोन टॅप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याकडे कधीही आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारला कोणाचेही फोन टॅप करायचे असल्यास त्यासाठी केंद्रीय गृह सचिवांची परवानगी घ्यावी लागते. सुरक्षा दलांना आवश्यक असल्यास केंद्रीय गृह सचिव अशा प्रकारची परवानगी देत असतात. आपण एअरसेल – मॅक्सीस प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आरोप केल्याने आपले फोन टॅप केले जात असत असा आरोप सिन्हा यांनी रांची येथे केला होता.