आपच्या प्रदेशाध्यक्षपदी ऍड. अमित पालेकर

0
16

>> पक्षाकडून नव्या पदाधिकार्‍यांची घोषणा; कार्याध्यक्षपदी व्हिएगस व सिल्वा

आम आदमी पक्षाने आपली गोवा कार्यकारिणी समिती सोमवारी बरखास्त केल्यानंतर काल पक्षाची नवी समिती जाहीर केली. आपने गोवा प्रदेशाध्यक्षपदी ऍड. अमित पालेकर यांची, तर कार्याध्यक्षपदी पक्षाचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस व वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांची नियुक्ती केली असल्याची माहिती आपच्या दिल्लीतील आमदार व गोवा प्रभारी आतिशी सिंग यांनी काल दिली. महिला अध्यक्षपदी प्रतिमा कुतिन्हो आणि युवा अध्यक्षपदी अनुप कुडतरकर यांची निवड केली आहे.

पक्षाच्या पणजी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणा केली.
गोव्यातील जनतेने नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षावर विश्‍वास दाखवला. त्यामुळे पक्षाचे दोघे उमेदवार बाणावली व वेळ्ळी मतदारसंघातून विजयी झाले. २०२७ साली होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत आप सत्तेवर येईल, असा विश्‍वास सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार महादेव नाईक यांची, तर उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार एलिना साल्ढाणा यांची निवड करण्यात आली आहे, असे सिंग यांनी जाहीर केले.
पक्षाच्या उपाध्यक्षपदी वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, प्रा. रामराव वाघ, सिसिल रॉड्रिग्स, संदेश तेलेकर व पॅट्रिशिया फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. संघटन सचिवपदी राजेश कळंगुटकर, रितेश चोडणकर, गेर्सन गोम्स व प्रेमानंद नानोस्कर यांची निवड झाली आहे.

प्रमुख प्रवक्ते म्हणून राजदीप नाईक, तर प्रवक्ते म्हणून महादेव नाईक, वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, प्रतिमा कुतिन्हो, एलिना साल्ढाणा, रामराव वाघ, सिसिल रॉड्रिग्ज व सिद्धेश भगत यांची निवड केली आहे. माध्यम प्रभारी म्हणून सुचिता नार्वेकर यांना निवडले आहे.