30 C
Panjim
Tuesday, June 22, 2021

आनंदाचे झाड

  • सौ. नीता महाजन

ही फुले झाडावर जशी सुंदर दिसतात तशीच जमिनीवर पडलेला त्यांचा सडाही फार सुंदर दिसतो. जणू जमिनीवर पिवळ्या रंगाची मखमली चादर पसरली आहे. परंतु काही दिवसांनी ही फुले कोमेजून मातीत मिसळून मातीचाच एक भाग बनून जातात. तेव्हा वाटतं की माणसाचंही असंच आहे ना.

मला माझ्या घराच्या खिडकीतून अनेक गोष्टी दिसतात. खिडकी मला खूप प्रिय. मी खिडकीत किंवा माझ्या घराच्या गॅलरीमध्ये बसून बाहेरचं जग न्याहाळते तेव्हा अनेक गोष्टी दिसतात. हाउसिंग सोसायटीत राहात असल्यामुळे आजूबाजूला असलेल्या इमारती दिसतात. तसेच माझ्यासारखे कितीतरी जण आपल्या गॅलरीत बसून गप्पागोष्टी करताना दिसतात किंवा संध्याकाळच्या वेळी चहाचा आस्वाद घेताना दिसतात. पावसाच्या दिवसात तर असं गॅलरीत बसणं ही जणू आनंदाची पर्वणीच. आकाशात चमकणारी वीज, ढगांचा गडगडाट अगदी अंगावर शहारे आणतो जणू. कधी टपटप तर कधी धो-धो पडणारा पाऊस दिसतो. पहिल्या पावसात तर छान मातीचा मृद्गंध मनात साठवायचा आनंद काही औरच. उन्हामुळे तप्त झालेली धरणी पावसाच्या शिडकाव्याने मोहरून जाते अगदी. त्या एका थेंबाने सुगंधित होऊन जाते. पावसासाठी आसुसलेली ही धरती तृप्त होते.

गॅलरीत बसून मी जेव्हा बाहेर बघते तेव्हा मला समोर एक सुंदर हिरवंगार असं झाड दिसतं. ते इतकं सुंदर आहे की संपूर्ण झाड हिरव्यागार पानांनी भरलेलं आहे आणि या झाडाला पिवळ्या रंगाची फुले फुललेली आहेत. हेच झाड पाहून माझं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. माझ्या मनाला एक नवीनच टवटवी येते. मनाला आलेली मरगळ दूर सारायला हे झाड खरंच खूप मदत करतं. मी म्हणेन की हे झाड माझ्यासाठी ‘आनंदाचे झाड’ आहे. कारण झाडे ही नेहमी देतच असतात. कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त देणं हे त्यांना माहीत आहे. दातृत्वाचा गुण या झाडांकडून आपण शिकावा.

निसर्गनियमाप्रमाणे या झाडांमध्ये अनेक बदल घडत असतात. कधी एकदम पर्णहीन ओकंबोकं हे झाड वाटतं तर कधी संपूर्ण पानांनी ते डवरलेलं असतं. पण हे झाड एका स्थितप्रज्ञासारखं खंबीर उभं असतं. जेव्हा या झाडाला एकही पान नसतं किंवा पानगळ झालेली असते तेव्हा अनेकदा माझ्या मनात विचार येतो की या झाडाला त्यावेळेला काय वाटत असेल बरं! कुणीही पक्षी या झाडाकडे ढुंकूनदेखील बघत नाही. पण मला असं दिसलं की या झाडावर एक घरटं होतं एका कावळ्याचं. पण आज जेव्हा मी त्या झाडाकडे बघते तेव्हा या झाडावर अनेक पक्षी मला विसावताना दिसतात. एक वेळ अशी होती की या झाडावर एक कावळा सोडला तर कोणीही पक्षी दिसत नव्हते. आज तिथे चिमणी, कबुतर त्यानंतर पोपट, कावळा तर आहेतच, असे अनेक पक्षी या झाडावर विसावताना दिसतात. माणसाच्या जीवनाचं गणितही असंच आहे ना… सुखाच्या वेळी सगळेच असतात. दुःखाच्या वेळी सगळे साथ सोडतात. पण एखादाच असतो तो तुमचा हात कुठल्याही क्षणी सोडत नाही, ज्याप्रमाणे निष्पर्ण वृक्षाची साथ त्या कावळ्याने सोडली नव्हती. आता बहरलेल्या त्याच झाडावर तो आनंदाने आपला संसार करतोय. इथे बसून या झाडाची अनेक रूपे मी पाहिली. या अनेक रूपांचा अनुभव घेत असताना ते झाड काय विचार करत असेल असा नेहमीच मला प्रश्‍न पडत राहिला.

आज ते झाड इतकं सुंदर दिसतंय की त्याच्यावरची माझी नजरच हटत नाही. हिरव्यागार पानांमध्ये पिवळीजर्द अशी नाजूक फुले… किती लोभस दिसतं त्याचं हे रूप. अनेक पक्षी या झाडावर येऊन विसावतात. वार्‍याने हलताच त्या झाडाची ती नाजूक फुले हळुवार खाली ओघळतात. वाटतं ओघळणारी फुलं पाहून त्या झाडाला काय बरं वाटत असेल? किंवा त्या फुलांना झाडापासून दूर जाताना काय वाटत असेल? पण ही फुले झाडावर जशी सुंदर दिसतात तशीच जमिनीवर पडलेला त्यांचा सडाही फार सुंदर दिसतो. जणू जमिनीवर पिवळ्या रंगाची मखमली चादर पसरली आहे. परंतु काही दिवसांनी ही फुले कोमेजून मातीत मिसळून मातीचाच एक भाग बनून जातात. तेव्हा वाटतं की माणसाचंही असंच आहे ना. आपण किती मी, मी माझं, माझं करत जगत असतो. पैशांच्या, प्रतिष्ठेच्या मागे धावत असतो. या धावपळीत आपण किती जणांची मने दुखावली याचा थोडाच विचार करतो. जसे आपण येताना काहीच घेऊन येत नाही तसंच म्हटलं जातं की आपण जातानाही रिकामंच जायचं असतं. मग हे माझं, मी, माझ्यासाठी… माझं हे जगणं कशासाठी? पण मला वाटतं आपण या जगाचा निरोप घेताना सुखद आणि दुःखद अशा अनेक आठवणींचं गाठोडं सोबत घेऊन जातो. काही व्यक्त तर काही अव्यक्त अशा उरतात गाठीशी फक्त आठवणी, आठवणी आणि आठवणी. बाकी काहीच नाही.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

उत्तम आरोग्यासाठी योगासने

डॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...

व्हिटिलिगो किंवा कोड

डॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...

इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

प्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३...

ALSO IN THIS SECTION

रक्त द्या, आयुष्य वाचवा

डॉ. सुषमा किर्तनीपणजी रक्तदानाने आपण दुसर्‍याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण...

आठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर

गौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...

आठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर

गौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...

गप्पा (घरकुल)

प्रा. रमेश सप्रे गप्पांमुळे मनावरचं मळभ, बुद्धीवरचा काळोख वितळायला मदत होते. ज्याला मनाचं व्हेंटिलेशन म्हणतात किंवा गच्च मनाच्या...

दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्यच

अनिल पै सध्या राज्य दुसर्‍या लाटेचा सामना करत असून, त्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी...