– डॉ. सोमनाथ कोमरपंत
दरवर्षी आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढी उभारतो. गुढी हे आनंदाचे प्रतीक… माणसाच्या विजिगीषू भावनांचे प्रतीक… नव्या आशा-आकांक्षांच्या नव्या पालवीचे प्रतीक…. सण तोच.. प्रतीक तेच… पण संकल्प मात्र नवे… नवसंवत्सराला नवे संकल्प करून आपण मनाने नवनवोन्मेष धारण करीत असतो… आपल्या परीने. तेही कुठल्या शुभमुहूर्तावर… शिशिराची पानगळ संपते आणि सृष्टी नवी चैत्रपालवी धारण करते तेव्हा!
माणसाच्या धारणाशक्तीला काहीतरी निमित्त हवे असते… सुखसंवर्धनासाठी प्रेरणादायी घटक हवा असतो… निसर्ग आणि आपण स्वतः यांमधील जैविक नाते ओळखणार्या आणि निसर्गालाच देव मानणार्या माणसाने हा पर्वणीचा संधिकाल शोधून काढला. उत्पत्ती-स्थिती-लय या निसर्गचक्राच्या तीन अवस्था. अविरत, निरंतर चालणार्या. मराठी संस्कृतीच्या भरण-पोषण प्रक्रियेला गतिमान करणार्या. निसर्ग हा स्वयंभू. त्याची फुलण्याची प्रक्रिया स्वाभाविक. पण स्वयमेव बहरत असताना अनुषंगाने इतरांना बहरू देणे हा त्याचा स्थायी भाव… ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्याचे रंगविभ्रम मनुष्यमात्रांना असीम सुख देतात… नेत्रांना आल्हाद देतात… अन्य प्राणिमात्रांना हा आनंद होत असेलच… पण तो व्यक्त करण्याच्या त्यांच्या तर्हा निराळ्या… माणसाची अभिव्यक्ती निराळी… ती शब्द, सूर, लय, ताल, रंग, रेषा इत्यादींच्या माध्यमातून प्रकट झाली…. त्याने निसर्गाची प्रतिकृती आपल्या सृजनशील प्रतिभेतून निर्माण करण्याचा आजमितीला प्रयत्न केला… आसमंताची प्रसन्नता पाहून झालेला आनंद आपल्या छोट्या-मोठ्या कृतींतून व्यक्त केला… गुढी उभारणे ही संकल्पना त्याच प्रेरणेतून आली… अशी ही आनंदाची गुढी… चैत्रपालवीच्या शुभप्रसंगी मनात नवपल्लव धारण करणारी… धारिणी धरित्रीमातेचा अंतरंगातील आनंद सृष्टीच्या अंगप्रत्यंगांतून निथळत असताना हा साक्षीभाव जागवत माणूसही उत्फुल्ल मनाने हा सण साजरा करतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू शकगणनेनुसार संवत्सराचा शुभारंभ. याला वर्षप्रतिपदा किंवा गुढीपाडवा असे आपण संबोधतो. वर्षाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवशी. दक्षिण भारतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात, गोमंतकात नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ हा ‘सातवाहन’चा अपभ्रंश असावा. सातवाहन राजांपैकी कोणी आणि कोणत्या प्रसंगी हा नवीन शक सुरू केला याविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून या शकाची सुरुवात झाली असावी असे मानायला वाव आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाला आपल्या राष्ट्रीय जीवनात अतिशय महत्त्व आहे. याचवेळी वसंत ऋतूला प्रारंभ होत असतो. वसंत ऋतू हा उत्सवाचा, उत्फुल्लतेचा आणि आनंदाचा ऋतू. शिशिरात आपल्याकडील भूप्रदेशात सर्वत्र पानगळ असते हे सर्वस्वी खरे नव्हे. पांगारा, सावर, अर्जुन हे वृक्ष वगळता सरत्या शिशिरातही पालवी धरणारे काही वृक्ष असतात. पण चैत्रपालवीचे चैतन्य आगळे-वेगळे असते. रंग-गंधाने न्हाऊन निघालेली सृष्टी गोमंतकात पाहावी ती या दिवसांत. जरठ फणसाचे वृक्षही फलभार सांभाळताना दिसतात. काजूच्या झाडांना सर्वत्र बहर असतो. आम्रवृक्षांचे तर वैभवच निराळे. कोकमची झाडे फळांनी लगडलेली असतात. वनवृक्षांनी कोवळी पोपटी लालस पावली धारण केलेली असते. पक्ष्यांनी गजबजलेली ही सृष्टी चैतन्यमय झालेली असते. तिने नवी कांती धारण केलेली असते. पानगळीच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनाला मिळालेले हे हिरवे आश्वासन असते. त्यामुळे आसमंतात प्रसन्नता पसरलेली असते. रूपगंधाच्या स्पर्शाने सृष्टी न्हालेली असते. ती जणू नवी-नवेली झालेली असते. हे सारे रंग निरखत असताना माणसांच्या तनामनांत चैतन्य निर्माण झालेले असते. उन्मखून आलेल्या सृष्टीचे कौतुक करायला माणसे आतुर झालेली असतात. रानफुलांना आलेला बहरही न्याहाळण्यासारखा असतो. उक्शीची पांढरी-पिवळसर फुले पाहताना मनाला आल्हाद तर होतोच. जणू वसंतागमनाचे ते प्रतीकात्म रूप सार्या सृष्टीत साकार झाल्यासारखे वाटते. चार, चूर्ण, करवंदी इत्यादी झुडपांचा बहर पाहण्यासारखा असतो. अनुभवण्याची ती चीज असते.
गुढीपाडव्याच्या दिवशी सारी माणसे आनंदनिर्भर असतात. स्नान करून ती कडुनिंबाच्या पानांचे सेवन करतात. कडुनिंबाची पाने, मिरे, हिंग, मीठ, जिरे आणि ओवा यांचे चूर्ण करून ते खाल्ले असता निरामय जीवन, बल, बुद्धी आणि तेज प्राप्त होते असे मानले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे परंपरेनुसार मानले जाते. म्हणून ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते. उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग म्हणजे वर्षफल श्रवण करण्याची प्रथा आजही टिकून राहिलेली आहे. या दिवसाला ‘युगादितिथी’ असेही म्हणतात. याच शुभमुहूर्तावर लंकाविजयानंतर श्रीरामाने अयोध्येत प्रवेश केला असे मानले जाते. या दिवशी बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र गुंडाळून चांदीचे किंवा पितळीचे भांडे त्यावर पालथे घालून त्याला कडुनिंबाची डहाळी व फुलमाळा गुंफतात. पूजाअर्चा करून ती सजविलेली गुढी घरादारांवर उंच ठिकाणी उभारतात. ते दृष्य नेत्रसुखद असते. घरादारांवर गुढी असते आणि आसमंतातही वृक्षवल्लरींची गुढी उभारलेली असते.
निसर्गरंगाचे विभ्रम आणि माणसांनी निर्माण केलेली परंपरा यांचे अतूट नाते असते. हा उत्कट अनुबंध असतो. माणसांच्या अंगी उपजत असलेली प्रतिभा खुलवण्यास निसर्ग प्रेरणा देत असतो. गुढीपाडव्याचा सण आनंदमय वातावरणात साजरा करताना आणि ऋतुराज वसंताची विलसिते न्याहाळताना निसर्गाच्या आणि माणसांच्या भावबंधांची उजळणी करावीशी वाटते. ही उजळणीदेखील तनामनाला ऊर्जा पुरविणारी, चैतन्याचा झरा अंतरंगात फुलवणारी शक्ती होऊन येते. मरगळलेल्या जीवनात पालवी निर्माण करते.
चैत्र म्हणताच गुढीपाडवा आठवतो. चैत्रगौर आठवते… आपल्या जीवनातून काही परंपरा हळूहळू नाहीशा व्हायला लागलेल्या आहेत. पण प्रतीकरूपाने त्यात किती अर्थ साठविलेला असतो हे सहजतेने आपल्या लक्षात येते. चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी स्त्रिया गौरीला देव्हार्यात बसवून महिनाभर तिची पूजा करतात. या चैत्रगौरीला माहेरवाशीण मानतात. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. तिला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, फळफळावळ व खाद्यपदार्थ मांडतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ते नारळ बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. गौरीची आरास करतात. पूर्वी या प्रसंगी सुवासिनी व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांना गंध लावण्याची प्रथा होती. कलेच्या उपासनेचा हा एक पारंपरिक मार्ग आहे. पूर्वी हा एक मोठा उत्सवच मानला जात असे. निसर्गाच्या चित्रलिपीचे कौतुक करण्याचा हा सोहळा. त्या चित्रलिपीची ही छोटी प्रतिकृती. तिचेच हे मनमोहक रूप.
बदलत्या युगमानानुसार नववर्षादिनी नवे संकल्प मनात बाळगत असताना आपण आपल्या संकेतांमागचा, परंपरांमागचा डोळस वृत्तीने अर्थ समजून घ्यायला हवा असे वाटते. निसर्गाच्या शक्तिस्रोतांचा हा एका परीने शोध होय. निसर्गाबरोबर रहा, निसर्गासारखे व्हा व ताजेतवाने रहा असा नकळत संदेश या प्रथा-परंपरा देत तर नसतील ना? आपण उभारलेली गुढी ही स्वानंदाची असावी; इतरांच्या आनंदास ती कारणीभूत व्हावी. ती समाजातील सृजनात्मकतेला प्रेरणा देणारी असावी. शुभंकर शक्तीला आवाहन करणारी असावी. गुढीपाडवा हा नववर्षप्रारंभ आहे; तसाच तो राष्ट्रजीवनातील निर्मितिशील हातांना प्रेरणा देणारा आहे. ज्ञानात्मक अनुभूतीला नवे पल्लव फुटावेत म्हणून आत्मतेजाने पुढे सरसावण्याची ही शुभघटिका आहे. व्यापक समाजजीवनात नवे आणि प्रखर वास्तव आपल्या अंगावर येत आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपला मूल्यविवेक टाकून जीवनाच्या सर्व पातळ्यांवर पश्चिमाभिमुख होण्याचा विडाच आपण उचललेला आहे. यासाठी आपल्या राष्ट्रीय परंपरेशी सुसंगत आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचा मंत्र जपणारी, वसुंधरेचा विनाश टाळणारी आनंदाची गुढी आपल्याला उभारायची आहे. आपल्या छोट्या-मोठ्या प्रयत्नांतूनच अभ्युदयाची नवी पहाट आता फुटणार आहे. सकारात्मक अनुभूतीचे नवे पर्व त्यातून निर्माण होणार आहे.

