आध्यात्मिक पर्यटन विकासावर भर द्या

0
6

>> पंतप्रधानांचा सल्ला; जी-20 बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोव्यात सुरू असलेल्या जी-20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहेत. भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो हे लक्षात घेऊन आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर भर द्यावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
वाराणशी हे प्राचीन काळापासून असलेले शहर प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली असून, आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. भारत पर्यटनासाठी नवीन आकर्षणे निर्माण करत आहे, हे पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उदाहरण देऊन सांगितले. दहशतवाद लोकांना विभाजित करण्याचे काम करतो, तर पर्यटन त्यांना एकत्र आणण्याचे काम करतो, असेही ते म्हणाले.

आदरातिथ्य क्षेत्रात रोजगार निर्मिती, सामाजिक समावेशकता आणि आर्थिक प्रगतीला मोठा वाव आहे आणि इतर क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रात महिला आणि तरुणांना अधिक रोजगार मिळतो, असेही मोदी म्हणाले.
हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटन क्षेत्रातील एमएसएमई आणि पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन ही एकमेकांशी जोडलेली पाच प्राधान्य क्षेत्रे भारताच्या प्राधान्यक्रमांना प्रतिबिंबित करत आहेत. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांचे त्वरित (रिअल टाईम) भाषांतर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराच्या दिशेने भारत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या भागीदारीतून जी-20 पर्यटन डॅश बोर्ड विकसित केला जात असून, विविध देशांमधील उत्तम पद्धती, पर्यटनाशी संबंधित अध्ययन, अहवाल आणि प्रेरणादायक कथा एकत्रित आणणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म ठरेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्र सुधारणांचा केंद्रबिंदू
गेल्या नऊ वर्षांत देशातील पर्यटनाची संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यावर केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे. परिवहन, पायाभूत सुविधांपासून ते आदरातिथ्य क्षेत्र ते कौशल्य विकासापर्यंत आणि व्हिसा प्रणालींमध्ये सुधारणांचा केंद्रबिंदू म्हणजे पर्यटन क्षेत्र होय, असे पंतप्रधान म्हणाले.