आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ताधारी भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नुकतेच गोव्यात येऊन गेले. परंतु पणजीतील आझाद मैदानावर ह्या सभेसाठी जागा न मिळाल्याने वेर्ण्यासारख्या आडबाजूच्या ठिकाणी ही सभा आयोजित केली गेली. त्यामुळे वृत्तपत्रीय बातम्यांखेरीज त्यातून फारसे हाती काही लागलेले दिसले नाही. सभेला प्रतिसादही यथातथाच होता. शिवाय खर्गे यांच्या गोव्यातील आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसच्या 108 बूथ प्रमुखांनी आपले राजीनामे सादर करण्याचे वेगळेच नाट्य रंगले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या गोव्यातील ह्या कार्यक्रमाबाबत आपल्याला विश्वासात घेतले नव्हते, सभेचे निमंत्रण नव्हते वगैरे करणे ह्या असंतुष्टांनी पुढे केली आहेत. म्हणजेच आगामी निवडणुकीसाठी पक्षाची एकजूट दिसण्याऐवजी किंवा खर्गे यांच्या आगमनातून प्रेरणा मिळून ती नव्याने निर्माण होण्याऐवजी पक्षांतर्गत दुफळीचे ठसठशीत दर्शन मात्र ह्या सभेच्या निमित्ताने घडले असेच म्हणावे लागेल. खर्गेंच्या उपस्थितीत ‘एकवट’चा नारा देण्यात आला खरा, परंतु प्रत्यक्षात पक्षसंघटनेतील दुफळीच ही सभा अधोरेखित करून गेली आहे. खर्गेंनी आपल्या भाषणात गोव्याचे सरकार हे देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असून एवढे भ्रष्ट सरकार आपण आपल्या 56 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पाहिले नसल्याचे प्रतिपादन केले. भाजपाला परत गोव्यात जिंकू देणार नसल्याची गर्जनाही त्यांनी केली. काँग्रेसमधून फुटून भाजपात गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहनही खर्गे यांनी मतदारांना केले आहे. अर्थात दुसऱ्या पक्षात फूट पाडण्याची ही परंपरा काँग्रेसनेच देशात निर्माण केली ह्याला इतिहास साक्षी आहे. मगो पक्षाची जी गत काँग्रेसने ह्या गोव्यात एकेकाळी केली होती, तीच गत आज भाजपाने गोव्यात काँग्रेसची केली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून यायचे आणि भाजपात प्रवेश करून सत्तेत प्रवेश करायचा ही आता परंपरा बनली आहे. एकेकाळी मगोच्या बाबतीत काँग्रेसकडून हेच सुरू नव्हते काय? आगामी निवडणुकीनंतरही ही परंपरा कायम राहणार नाही ह्याची खात्री काय असे मतदार विचारत आहेत. गोव्याशी संबंधित विविध विषय आणि प्रश्न मात्र खर्गेंनी आपल्या भाषणात नेमकेपणाने मांडले. सभेसाठीचा त्यांचा गृहपाठ उत्तम झाला होता असे दिसते. मात्र, एवढ्यातच भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षसंघटनेतील धुसफूस, दुफळी आणि लाथाळ्या याकडे प्राधान्याने लक्ष दिले असते तर ते अधिक चांगले झाले असते. ज्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बळावर कोणताही पक्ष निवडणुकीला सामोरा जात असतो, त्याच बूथप्रमुखांनी एवढ्या मोठ्या संख्येने राजीनामे सादर केले असतील, तर कुठे तरी काही तरी नक्कीच चुकते आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीने दुखावलेली मंडळी पक्षहिताचा आणि पक्षाला राज्यात पुन्हा सत्तेवर आणण्याचा व्यापक विचार करून स्वतःच्या कुरबुरी बाजूला सारण्याएवढी मोठ्या मनाची नाहीत हे तर त्यातून दिसलेच, शिवाय त्यांची निष्ठा विद्यमान प्रदेशाध्यक्षांशी नाही आणि त्यांच्या बंडाळीला कोणाची तरी आतून फूस आहे हेही त्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता नूतन प्रदेशाध्यक्षांना बूथपातळीपासून संघटना नव्याने बांधावी लागेल असाच त्याचा दुसरा अर्थ आहे. गिरीश चोडणकर यांच्या संघटनात्मक कौशल्याचा खरा कस आता लागेल. गोवा राखण यात्रेची घोषणा खर्गेंच्या सभेत करण्यात आली आहे. परंतु ही राखण करण्याची ग्वाही देणारे कथित राखणदारच एकमेकांची तोंडे पाहत नाहीत त्याचे काय? प्रदेशाध्यक्षांचे तोंड एका दिशेला, पक्षाच्या खासदारांचे दुसऱ्या दिशेला, माजी पदाधिकाऱ्यांचे तिसऱ्या दिशेला असा सगळा विस्कळीत कारभार आहे. समजा, जनतेने उद्या खर्गेंच्या आवाहनानुसार काँग्रेसचे आमदार निवडून दिले, तर ते पुन्हा भाजपात जाणार नाहीत ह्याची खात्री खर्गे किंवा चोडणकर देऊ शकतील काय? जनतेने ह्या पक्षावर भरवसा कशासाठी ठेवावा? खर्गे यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपशकून करण्याचा प्रयत्न भाजपने केला. खर्गेंपुढे निदर्शने काय करण्यात आली, ‘वंदेमातरम’च्या कथित अवमानासंदर्भात त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार काय करण्यात आली, परंतु अशा प्रकारांपासून भाजपने दूर राहणेच श्रेयस्कर ठरेल. अशा भलत्या विषयांची भूल गोमंतकीय मतदारांना प्रभावित करू शकणार नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी गोव्यातील सभेत सरकारसंबंधित जे विषय आणि मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यावर भाजप नेत्यांनी बोलावे. भ्रष्टाचारापासून रोजगारापर्यंतचे जे विषय खर्गेंनी सभेत पुढे आणले आहेत, ते खोडून काढण्यावर, त्यांच्या निराकरणावर भर द्यावा. मतदारांमधील संभ्रम दूर सारण्यास ते अधिक उपयुक्त ठरेल.

