गोव्याचे सुपुत्र व काश्मीरवर आधारित असलेल्या ‘आर्टिकल 360′ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा घातला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले हिंदी चित्रपट दिग्दर्शक ठरले आहेत. वरील चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा पुरस्कार लाभला असून सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
आदित्य जांभळे यांना त्यांच्या ‘आर्टिकल 360′ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले गोमंतकीय ठरले असून त्यामुळे ते अभिनंदनास पात्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हे यश आमच्या राज्यातून उदयास येत असलेल्या सर्जनशीलतेचे आणि प्रतिमेचे दर्शन घडवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदनाच्या संदेशातून म्हटले आहे.

