Home बातम्या आदर्श शिक्षकांचा सहवास संतांच्या सहवासासारखा : डॉ. काळे

आदर्श शिक्षकांचा सहवास संतांच्या सहवासासारखा : डॉ. काळे

0

कांदोळकर, सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

महर्षी व्यासांपासून जी आदर्श शिक्षकांची परंपरा आहे ती आज देवेंद्र कांदोळकर व पी. ए. सूर्यवंशी या शिक्षकांपर्यंत येऊन पोचली आहे. शिक्षक हे जगाच्या परिवर्तनासाठी कार्यरत असतात. ते फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांत आत्मविश्‍वास निर्माण करतात. मानवतेच्या बिजांचे रोपण करतात. आदर्श शिक्षकांचा सहवास हा साधुसंतांच्या सहवासासारखा असतो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांनी येथे केले.

येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात काल आयोजित कोकणी मराठी परिषद गोवाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. काळे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्यांच्या हस्ते कांदोळकर व सूर्यवंशी या शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि समई असे त्याचे स्वरूप आहे. शास्त्रज्ञांना देवकण आता सापडला पण देवकणांपेक्षा प्रेमकण जास्त महत्त्वाचे असतात. कारण त्या माध्यमातून जग जवळ येते, असे सांगून डॉ. काळे म्हणाले, संतांना प्रेमकण शेकडो वर्षांपूर्वी सापडला आहे. तेच प्रेमकण शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. यावेळी व्यासपीठावर आदर्श शिक्षक पुरस्काराचे दोन्ही मानकरी, संस्थेचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, कार्याध्यक्ष सागर जावडेकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, कार्यवाह मंगेश काळे उपस्थित होते. पुरस्काराची रक्कम, आपण कार्य करीत असलेल्या लोकविश्‍वास प्रतिष्ठानला अर्पण करण्याचे जाहीर करून सूर्यवंशी आपल्या मनोगतात म्हणाले, की हा सत्कार माझ्यासाठी सुखद धक्का आहे. यातून मला अधिक कार्य करण्यासाठी चेतना आणि प्रेरणा मिळेल. देवेंद्र कांदोळकर यांनी पुरस्काराची रक्कम ते १२ वर्षे कार्य करीत असलेल्या कच्छ (गुजरात) मधील शाळेसाठी गोमंतकीयांची भेट म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, आज शिक्षकांविषयी चांगले बोललेले ऐकायला मिळत नाही. या सोहळ्यात मयुरेश वाटवे यांच्या ‘बेटींग’ या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.