आदर्श कर्मयोगी ः बाबा आमटे

0
201
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

अहर्निश कृतिशीलतेचा मंत्र जपून सर्वंकष रचनात्मक कार्याचा महान प्रयोग भारतवर्षात केला. राष्ट्राच्या सीमा उल्लंघून मानवतावादाकडे त्यांनी आपल्या आचार-विचारांची वाटचाल केली. या दृष्टीने ते आधुनिक कालखंडातील ऋषी होते.

 

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा, सेवाभावी वृत्ती आणि समाजमनस्कता स्वातंत्र्योत्तर काळात समाजमानसात रुजविण्याचे महान कार्य बाबा आमटे यांनी समर्पित भावनेने केले. कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्यातील आत्मविश्‍वास त्यांनी जागविला. संतप्रवृत्तीला आवश्यक असे सर्व गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. ‘बोले तैसा चाले| त्याचीं वंदावीं पाऊलें’, ‘चंदनाचे हात| पायही चंदन|’ आणि ‘जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले| तोची साधु ओळखावा| देव तेथेंचि जाणावा|’ या तुकारामांच्या अभंगवाणीत वर्णन केलेली लक्षणे बाबा आमटे यांच्यामध्ये समूर्त झाली होती. त्यांचा जीवनादर्श अनन्यसाधारण स्वरूपाचा मानावा लागेल. भारतीय स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना कळलेला होता. सर्वसामान्य माणसांना आपल्या भवितव्याची सनद प्राप्त होणे हे त्यांच्या दृष्टीने खरे स्वातंत्र्य होते. हे ज्या अभाग्यांना प्राप्त झाले नव्हते अशा लोकांविषयी त्यांना करुणा वाटायला लागली. पण या परमकारुणिकाने वृथा अश्रू ढाळण्यापुरते ते मर्यादित ठेवले नाही. अहर्निश कृतिशीलतेचा मंत्र जपून सर्वंकष रचनात्मक कार्याचा महान प्रयोग भारतवर्षात केला. राष्ट्राच्या सीमा उल्लंघून मानवतावादाकडे त्यांनी आपल्या आचार-विचारांची वाटचाल केली. या दृष्टीने ते आधुनिक कालखंडातील ऋषी होते.

अव्वल दर्जाची प्रतिभा असलेले कवी, समाजसुधारक, विचारवंत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू. पण आचारवंत ही त्यांची सच्ची रूपकळा. त्यांचे वक्तृत्व अमोघ होते. ते त्यांच्या अंतरातील आचारधर्मामुळे निर्झरासारखे स्रवत असे. ऐन तारुण्यात त्यांना गांधीजींचा सहवास लाभला. रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’ या कवितासंग्रहाचे संस्कार त्यांच्यावर याच वयात झाले. ‘शांतिनिकेतन’मध्ये जाऊन ते रवींद्रनाथांना भेटले. दोन महामानवांच्या संपर्कामुळे त्यांच्या जीवनाची दिशा बदलली यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

वरोड्याला मुरलीधर देविदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचे शालेय शिक्षण झाले. अकराव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा आत्मसात केली. उच्च शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. एम.ए., एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. शारीरिक आणि बौद्धिक विकासाला त्यांनी पूर्ण वाव दिला. मनाचे पोषण करण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे परिशीलन केले. चांगल्या ग्रंथांबरोबर चांगल्या माणसांचा सहवास आपल्या जीवनाला नवी दिशा देत असतो याचे सदैव भान त्यांनी ठेवले. विनोबा भावे यांच्या सान्निध्यामुळे त्यांना जीवनाची संथा मिळाली. भगवद्गीतेतील संन्यासयोग त्यांना विशेष भावला.

प्रत्येक महापुरुषाच्या जीवनाला कलाटणी देणारा एक संजीवक क्षण असतो. बाबा आमटे यांच्या जीवनात अशीच एक घटना घडली. ते वरोडा नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. वरोड्यातील भंग्यांनी संप पुकारला होता. बाबा आमटे यांनी याबाबत केलेल्या शिष्टाईला त्यांनी जुमानले नाही. बाबांनी संडाससफाईचे काम स्वतःकडे घेतले. डोक्यावरून मैल्याची टोपली वाहत असताना तुळशीराम नावाचा महारोगी त्यांच्या दृष्टीस पडला. त्याच्या डोळ्यांत अळ्या पडल्या होत्या. बाबांचे मन दचकले. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांच्या भावी जीवनाच्या धारणा निश्‍चित झाल्या. आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. तो होता कर्मयोगाचा. ते उद्गारतात, ‘‘त्या कुष्ठपीडिताच्या वाहत्या शरीरावर कोसळणार्‍या पावसापासून संरक्षण देण्यासाठी ज्या क्षणी एक तरट मी झाकले, त्या क्षणापासून माझी खरी अभयसाधना सुरू झाली.’’

१९५१ साली सौ. साधनाताई, प्रकाश व विकास ही मुले यांना घेऊन बाबांनी आनंदवन येथे आपला पहिला प्रकल्प सुरू केला. महारोग्यांवर औषधोपचार करून, त्यांना प्रशिक्षण दिले. ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन केली. या कार्याचा आता भव्य विस्तार झाला आहे. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज या श्रेष्ठ साहित्यिकांनी बाबा आमटे यांच्या या कार्याची प्रशंसा केलेली आहे. पु.लं.नी तर वेळोवेळी त्यांना अर्थसहाय्यही केले आहे. ‘पंगु लंघयति गिरीम’ हे वचन वेगळ्या अर्थाने सोमनाथच्या जंगलात सार्थ ठरलेले आहे. कुष्ठरोग्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. मधुकर केचे यांच्यासारख्या साहित्यिकाने बाबा आमटे यांना उद्देशून ‘अपंगशाहीचे बादशहा’ हा लेख लिहिला आहे. कुसुमाग्रजांनी तर ‘संत’ ही अर्थपूर्ण आशयाची कविता लिहिली आहे.

युवास्पंदन जागविताना बाबा आमटे आपल्या ओजस्वी वाणीत लिहितात ः

‘‘लोळागोळा होणार्‍या शरीराने जगण्यापेक्षा मरणाआधी पुनश्‍च पंखांच्या कवेत वादळ घेण्याची गरुडाची मस्ती आणि ज्वालांचा मखमली सहवास यांनी आपलेच पंख बेचिराख करावेसे वाटतात. इंद्रावती नदी मला खुणावत आहे. भामरागडच्या आदिमानवाच्या प्रदेशात मानवतेची नवी दिशा जागवावी अशी ओढ लागलेली आहे. माझ्या देशातील तरुणांना माझी एकच आर्त साद आहे. तुमच्या होकारापासून मला वंचित करू नका. बिजलीच्या सोनेरी धाग्यांनी तुम्हाला ध्येयाशी करकचून बांधण्यासाठी मी आसुसलो आहे. सुखाची आकांक्षा मला पण आहे. पण त्याला लाथाडण्याची कुवतही माझ्यात आहे. साहसाचे पंख लावून नवी क्षितिजे पेलण्यासाठी आसुसलेल्या माझ्या दोस्तांनो, ‘लोकबिरादरी’ तुम्हाला साद देत आहे.’’

बाबा आमटे यांचे कार्य मागाहून समाजमान्य झाले. पण प्रारंभीच्या काळात आमटे दांपत्याला आपल्या मुलांसह कोणत्या यातनाचक्रातून जावे लागले असेल, कोणते असिधाराव्रत स्वीकारावे लागले असेल याची आपणास कल्पना येणार नाही. हिमनगचा १/१० भाग सकृदर्शनी दिसतो; बाकीचा बुडालेला असतो. सौ. साधनाताईंचे ‘समिधा’ हे आत्मचरित्र वाचल्यानंतर याची थोडीफार कल्पना येते.

बाबा आमटे यांचे कवी या नात्याने प्रकट झालेले रूप विलोभनीय आहे. १९६५ च्या दरम्यान त्यांच्या कविता ‘ज्वाला आणि फुले’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध व्हायच्या. चिंतन बाबांचे असायचे. शब्दांकन रमेश गुप्ता यांचे होते. त्यांना बाबांनी माझ्या स्वप्नांचे सहोदर असे संबोधले आहे. पुढे हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांची रसग्राही आणि मर्मदृष्टी प्रकट करणारी प्रस्तावना लाभली आहे. बाबा आमटे यांची जीवनधारा आणि त्यांची काव्यधारा यांत अद्वैत आहे. हा मंत्रद्रष्टा कवी उद्गारतो ः

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव

दहा दिशांच्या रिंगणातही पुढेच माझी धाव

‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवेल त्याला मत’ आणि ‘करुणेचा कलाम’ या बाबांच्या पुढील कवितासंग्रहांमधून ध्येयनिष्ठेने भारावलेल्या आणि ध्यासाने झपाटलेल्या प्रगल्भ आणि परिणत आत्म्याचे प्रकटीकरण आढळते. ‘गर्भवतीचा मृत्यू’ या कवितेत ते म्हणतात ः

शांतिनिकेतनातील अश्‍वत्थवृक्षांच्या सावल्या

आणि साबरमतीचा किनारा

यांच्या मीलनाचा अपूर्ण गर्भ

त्या मातेच्या पोटात होता

आमच्या सासुरवासाचा जाच असह्य होऊन

एक दिवस भान जागते ठेवून

तिने अंधार्‍या आडात उडी घेतली

संभवाच्या कळा उराशी सोसत

विलयाच्या वाटेने ती एकाएकी निघून गेली.

या संग्रहातील ‘एकलव्य’, ‘या सीमांना मरण नाही’, ‘श्रमसरितेच्या तीरावर क्रांतीची पावले’ आणि ‘विश्‍वमित्र’ या कवितांत प्रचितीचे बोल आहेत. बाबा आमटे यांच्या जीवनप्रवासातील पाऊलखुणांचे येथे दर्शन घडते.