आत्मा-परमात्मा

0
14

योगसाधना- 644, अंतरंगयोग- 230

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आत्मा परमात्म्याचे संतान आहे. त्याचे काही मूळ गुण आहेत- आत्मा पवित्र, ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप व शक्तीस्वरूप आहे. पण या सृष्टीत जन्मल्यानंतर त्याला विविध डाग पडतात- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व नंतर अहंकाराचे. त्यामुळे त्याच्या स्वभावावर यांचा परिणाम होतो.

मानवी जीवनाचे विविध पैलू आहेत- शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक… हे सर्व पैलू अत्यंत आवश्यक आहेत. या सर्व पैलूंचा समग्र विकास गरजेचा व महत्त्वाचा आहे; आणि तरच मानवाचे जीवन सुखी, समाधानी, समृद्ध, संतुष्ट होईल. यातील मुख्य मुद्दा म्हणजे- या सर्वांचा पाया आध्यात्मिक पैलू आहे. या पैलूचा शास्त्रशुद्धरीत्या योग्य तऱ्हेने, रीतीने विकास झाला तर इतर सर्व पैलू आपोआप विकसित होतात.
भारतीय संस्कृतीने पार पुरातन काळापासून आध्यात्मिक पैलूला अत्यंत उच्च स्थान दिलेले आहे. कारण संपूर्ण मानवी जीवनविकास हेच आपल्या संस्कृतीचे ध्येय अनादिकालापासून राहिले आहे. अध्यात्माची साधी-सोपी-सरळ व्याख्या म्हणजे ‘आत्मानि अधि इति अध्यात्मः।’ -आत्म्याचे विज्ञानशास्त्र म्हणजे अध्यात्म.

योगमार्गामधील सर्व मार्ग पंचकोश मानतात- अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. हा आनंदमय कोश म्हणजेच आत्म्याचा कोश. ‘आत्मा’ या शब्दावरून कितीतरी शब्द आहेत- आत्मिक, आत्मचिंतन, आत्मशासन, आत्मबोध, आत्मीय, आत्मशोध, आत्मशक्ती, आत्मबंधू वगैरे…
आत्म्याच्या शक्तीवर आपण लक्षच देत नाही. हल्ली तर नाहीच नाही. काय ते शरीर व त्याचे चोचले पुरवणे! तद्नंतर मन- त्याचे शौक सांभाळणे. आपण बुद्धीला तेवढे महत्त्व देत नाही म्हणून सद्सद्विवेकबुद्धी विकसित होत नाही. त्यामुळे हल्ली विविध तऱ्हेचे भयानक मनोदैहिक रोग वाढले आहेत व वाढताहेत आणि तेसुद्धा अगदी तरुणवयात.

आत्म्याची शक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने बघता येते. एक साधे-सोपे उदाहरण म्हणजे- सहा फूट माणूस सहा मजले चढत सहज जाऊ शकतो. पण आत्मा शरीरातून निघून गेल्यावर त्याला उचलून खाली आणायला सहा शक्तिशाली व्यक्तींची गरज पडते.
भारतीय शास्त्रज्ञांनी म्हणे आत्म्याचे वजन काढले होते. हल्ली काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीदेखील या विषयावर अभ्यास केलेला आहे व करताहेत. मृत्यूच्या वेळी पंचप्राणांतील ‘उदान’ हा प्राण आत्म्याच्या डोक्याच्या कवटीतून बाहेर निघून त्याला आपल्या गतीकडे जायला सहाय्य करतो.

एकेकाळी महाबलाढ्य, महाशक्ती असलेली रशिया नास्तिक होती. त्यांचा फक्त विज्ञानावर विश्वास होता. देव, आत्मा वगैरे गोष्टी त्यांना थोतांड वाटत होते. त्यांचा वरील सिद्धांतावर विश्वास नव्हता. त्यांच्या वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला तो असा- काही रोगी जे बेशुद्ध होते व मरणोन्मुख होते, त्यांना त्यांनी जाड काचेच्या पेटीत ठेवले. त्यांना नळीतून पातळ जिन्नस व प्राणवायू दिला जात होता. बाहेरून त्यांचा श्वास चालू आहे हे दिसत होते. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे वजन बघायला मशीन लावले होते. ज्यावेळी त्यांचा श्वास बंद झाला, म्हणजे त्या व्यक्ती मरण पावल्या, त्यावेळी म्हणे त्या जाड काचीला तडा पडला. तेव्हा आवाजदेखील आला व वजन काही मायक्रो ग्रामनी कमी झाले. आता तर नवनवीन आधुनिक उपकरणे आहेत- सूक्ष्मतम मोजमापे आपण करू शकतो.
आत्म्याचे स्थान भूमध्य म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये आहे. तिथे पाश्चात्त्य शास्त्राप्रमाणे ‘पिनीयल ग्रंथी’ आहे. योगशास्त्राप्रमाणे आत्मचक्र आहे. तसाच भगवान शंकराचा तिसरा डोळा आहे असे मानतात.

आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल हल्ली जिज्ञासा वाढत आहे व अनेक विद्वान व्यक्ती त्याबद्दल नक्की पुरावा मागतात. त्यामुळे आत्मा व त्याच्या पुनर्जन्मासंबंधी विविध संशोधक वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पुरावे गोळा करत आहेत.

  1. व्हर्जिनिया येथील मानसशास्त्रज्ञ प्रो. इयन स्टिव्हनसन यांनी काही मुलांच्या जन्मचिन्हांचा अभ्यास केला. त्यांच्यावर मागील जन्म प्रतिगमनाचा प्रयोग केला व त्यांना कळले की मागच्या जन्मी त्या जागेवर काही कारणामुळे जखम होती.
  2. काही मुलांना जन्मतःच पाण्याची भीती वाटते. अगदी जुळ्या मुलांमध्येदेखील पाहण्यात येते की, एक मूल पाण्यात जायला भीत असते. त्यांचादेखील अभ्यास केला तर आढळून आले की त्यांना पूर आलेल्या नदीत जलसमाधी मिळाली होती.
  3. हल्ली अनेक मुले- अगदी दोनचार वर्षांची- छान गाणे गातात, तबला वाजवतात. काही खेळामध्ये प्रवीण असतात. जगाचा इतिहास, स्थळांची नावे त्यांना तोंडपाठ असतात. शास्त्रज्ञ म्हणतात की हे त्यांचे पूर्वजन्मातील संस्कारांमुळे घडते.
  4. एका मुलाची घटना बोधदायक वाटते. तो लहान असताना त्याची आई त्याचे कपडे बदलत होती. त्यावेळी तो सहज म्हणाला की, तू लहान असताना मी तुझे कपडे बदलत होतो. सर्वांना आश्चर्य वाटले. अधिक अभ्यासांती कळले की तो मुलगा त्याच्या आजोबांच्या सर्व वस्तू तंतोतंत ओळखत होता. तसेच आजोबांच्या जीवनातील काही घटनांचे वर्णन करीत होता. येथे एक मुद्दा म्हणजे, त्यांच्या अशा आठवणी जन्मभर राहत नाहीत. आत्म्यावर नवीन संस्कार झाले की त्या भूतकाळातील घटना ते विसरतात.
  5. काही घटना, जीवनांती शरीराबाहेरील अनुभवदेखील बोलके आहेत. हार्वर्डमधील न्यूरोजर्सन डॉ. अलेक्झांडर हे आत्मा, स्वर्ग अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नसत. एक दिवस त्यांना ‘मेनिंजाइटिस’ हा रोग झाला व ते बेशुद्ध झाले. त्यातच त्यांना मृत्यू आला. पण त्यांना काही दृश्ये दिसली तिथे फक्त प्रचंड शांतता होती. त्यांना शुद्ध प्रेमाचा अनुभव आला. त्यांचा मेंदू जवळजवळ मेलेला होता, पण डॉक्टर त्यांना परत जिवंत करायचा प्रयत्न करीत होते याचाही त्यांना अनुभव आला. त्यांना काही इंजेक्शने दिली तेही त्यांना कळले. ते परत जिवंत झाले- आत्म्याचा, स्वर्गाचा अनुभव घेऊन आले. त्यानंतर ते म्हणाले, ‘विज्ञानाला मर्यादा आहेत.’ तसेच त्यांनी एक पुस्तक लिहिले- ‘हॅवन इज रियल’- स्वर्ग सत्य आहे.
    संशोधन केले तर अशा कितीतरी घटना पृथ्वीवर घडताहेत.

6) हल्ली काही वैज्ञानिक ‘एम.आर.आय.’सारख्या चाचण्यांमधून या विषयाचा सखोल अभ्यास करताहेत. त्याला ‘गॉडस्पॉट’ – ‘देवस्थान’ असे म्हणतात. त्याची जागा आज्ञाचक्राबरोबर जुळते (भूमध्य).
भगवद्गीतेत श्रीकृष्णदेखील ध्यान करतात. याच बिंदूवर चित्त एकाग्र करायला सांगतात. आत्मशक्ती वाढवण्यासाठी आधी आत्म्याच्या काही मूळ गोष्टींचा अभ्यास हवा. भगवद्गीता हे तर एक श्रेष्ठ अध्यात्मशास्त्रच आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले ते तत्त्वज्ञान आहे. सांख्ययोगमध्ये (दुसरा अध्याय) आत्म्याबद्दल ज्ञान देताना भगवान म्हणतात- ‘आत्मा अमर, अजर, अविनाशी, निराकारी, निर्विकारी, निरहंकारी आहे. तसेच त्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळवू शकत नाही. तसाच तो नित्य सर्वव्यापी, अचल, स्थिर व सनातन आहे.’ प्रत्येकाने गीतेचा सखोल अभ्यास नियमित, निरंतर केला तर हे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ज्ञान मिळेल.

तसेच आत्मा परमात्म्याचे संतान आहे. त्याचे काही मूळ गुण आहेत- आत्मा पवित्र, ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप व शक्तीस्वरूप आहे. या सर्व सद्गुणांमुळे तो शुभ्र कपड्यासारखा आहे. पण या सृष्टीत जन्मल्यानंतर त्याला विविध डाग पडतात- आधी षड्रिपूंचे- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व नंतर अहंकाराचे. त्यामुळे त्याच्या स्वभावावर यांचा परिणाम होतो. शास्त्रशुद्ध ध्यान करून परमात्म्याकडून शक्ती मिळवून आत्मा परत सात्त्विक, शुद्ध होऊ शकतो.