Home बातम्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणार्‍यांचे काय?

आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणार्‍यांचे काय?

0

– दिलीप बोरकर

आत्महत्या हा कुठल्याच समस्येला पर्याय नव्हे! जो कोणी जीवनाला कंटाळून म्हणा अथवा येणार्‍या अडचणींना प्रतिकार करण्याची धमक नसल्याने म्हणा, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो त्या व्यक्तीविषयी समाजात विशेष आपुलकी नसते! आत्महत्येला प्रवृत्त करणार्‍या कितीही वाईट गोष्टी जीवनात घडल्या तरी डगमगून न जाता त्यांचा सामना करत जगणे यालाच जीवन ऐसे नाव वगैरे गोष्टी विचारवंतांच्या भूमिकेतून सांगणे अत्यंत सोपे असते. आम्ही जीवनावर भाष्य करणार्‍यांनी आत्महत्या ही निषिध्द मानलेली आहे म्हणूनच एखाद्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने आम्ही काही क्षण हळहळतो आणि नंतर त्या व्यक्तीला, ती कितीही जवळची असली तरी विसरून जातो!

गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आत्महत्या करण्यामागे काही विशिष्ट कारण असायला पाहिजे अथवा अमूकच वय असायला पाहिजे असे काही नाही. आले एखाद्याच्या मनी त्याने संपवून टाकली आपली जीवनयात्रा असाच प्रकार सध्या घडताना दिसतो. त्या मागचे निश्‍चित कारणही कळायला मार्ग नसतो. ज्या कारणासाठी आणि ज्या संख्येने आजची आत्महत्या प्रकरणे घडून येतात ते पाहिल्यास माणूस आज आव्हानात्मक जीवनापासून दूर पळणेच हितावह मानतो असे दिसून येते. आजच्या वाढत्या शिक्षणाचा, विज्ञानाचा, शास्त्राचा आणि जीवनाच्या तत्वज्ञानाचा काडीचाही असर या आत्महत्या करणार्‍यांवर होत नसल्याचे पाहून दु:ख झाल्याशिवाय राहत नाही. आत्महत्या करून आपले जीवन त्यागण्याची अशी कोणती शक्ती या लोकांना प्रेरीत करते याचा शोध घेण्याची आता गरज निर्माण झालेली आहे.

लहान मुले आत्महत्या करू शकतात, या गोष्टीवर माझा विश्‍वास बसूच शकत नाही. आज मोठ्या प्रमाणात पंधरा वर्षांखालील मुले आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात ही बाबच कल्पनेपलीकडची आहे.

मला या ठिकाणी १९७३ सालातील आत्महत्येची एक घटना आठवते! माझ्याच एका मित्राने एसएससी परीक्षेत बोर्डाला नापास झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केली होती. जून महिन्यात जेव्हा परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा भर पावसात या मुलाने आपण नापास झाल्याचे कळल्यानंतर आपल्याच घरातील काजूच्या फेणीची बाटली घेतली. सोबत एक दोरी घेतली आणि काजूच्या झाडावर चढून बसला. धो धो कोसळणार्‍या पावसात या मुलाने गळ्यात दोरीचा फास अडकवला आणि नंतर ती दारू पीत बसला. दारूच्या नशेत झाडावरून कधी खाली कोसळला आणि गतप्राण झाला हे बहुतेक त्याला कळलेच नसावे! त्याला काजूच्या वृक्षाच्या फांदीला लोंबकळताना पाहिल्यानंतर आणि तिथल्या या सर्व गोष्टीचा पंचनामा केल्यानंतर हा तर्क करण्यात आला असावा! अंत्ययात्रेसाठी जमलेल्यांकडून हे वर्णन मी त्यावेळी ऐकले होते.

गुरुदास नावाच्या या मुलाच्या आत्महत्येनंतर जग काही चालण्याचे थांबले नव्हते. बोर्डाच्या परीक्षा नित्यनेमाने घेतल्या जात होत्या. परंतु त्या मुलाची आई जेव्हा जेव्हा मला भेटायची तेव्हा कित्येक काळ नुसते उसासेच देत असायची! त्याकाळी खरे म्हणजे आजच्यासारखी स्पर्धा नव्हती! मुलांचे आईवडील पास होण्यासाठी मुलांना जबरदस्तीने राबवत नव्हते. तरी सुध्दा त्या मुलाने परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला त्यामागची मानसिकता अजून मला उलगडलेली नाही.

दुसरी एक घटना माझ्याच शाळेतील एका विद्यार्थिनीच्या बाबतीत घडलेली. नववीच्या वर्गात शिकणार्‍या सदर मुलीने पणजीतील खाडीत उडी टाकली. खाडीला ओहटी असल्याने म्हणा अथवा त्या मुलीचे दैव बलवत्तर असल्याने म्हणा ती पाण्यात वाहून गेली नाही. तेथील चिखलात रुतून बसली. लोकांनी तिला बाहेर काढले. मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मी तिची भेट घेऊन तिचे प्रश्‍न समजून घेतले. मुलगी हुशार होती. आत्महत्या करण्याच्या विचारसरणीची नव्हती. असे असतानाही तिला आत्महत्या करावीशी वाटली. त्याचे घडले होते असे – नववीची अंतिम परीक्षा चालू होती. ती आपली उत्तरपत्रिका लिहिण्यात मग्न होती. कोणी तरी एक घडी केलेला चिठोरा तिच्या दिशेने फेकला. तो तिच्या अंगावर पडला. तिने तो उचलला. पर्यवेक्षकाने ही चुळबूळ पाहिली आणि तिला कॉपी करताना पकडल्याचा कांगावा केला. तिची बाजू ऐकून न घेता तिला उत्तरपत्रिका लिहिण्यापासून परावृत्त केले. घरून पालकांना पाचारण करण्याची सक्ती केली. पण कसलीच चूक नसताना आपल्याला दिल्या गेलेल्या शिक्षेने आत्मसन्मान दुखावलेल्या त्या मुलीने खाडीत झोकून दिले. तिला मी समजावले. तिने शाळा सोडली तरी मी तिला घरबसल्या अभ्यास करायला लावला. शिकवणी लावून दिली. बाहेरून मॅट्रिकची परीक्षा द्यायला लावली. पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन या मुलीने नंतर कॉमर्समध्ये पदवी सुध्दा घेतली!

सांगायची गोष्ट म्हणजे एखाद्याच्या आत्मसन्मान जेव्हा दुखावला जातो तेव्हा माणूस आत्महत्येसारख्या गोष्टीस सुध्दा परावृत्त होतो. आत्मसन्मान ही काही मोठ्यांचीच मक्तेदारी नाही. सर्वसामान्यपणे आजाराने निराश झालेली व्यक्ती आजारास कंटाळून प्राण त्यागण्याचा प्रयत्न करते. असाध्य रोगापासून मुक्ती मिळविण्याचा तोच एक उपाय असे त्यांना वाटते ही बाब समजण्यासारखी असते. उद्योग धंद्यात दिवाळे काढल्यानंतर निराशेतून आत्महत्येसारखी टोकाची भूमिका काही काही वेळा घेतली जाते, पण क्वचितच. परंतु ज्या व्यक्तीचा आत्मसन्मान दुखावला जातो तो मात्र अत्यंत धोक्याचा असतो. आत्मसन्मानास वयाची अट नसते. तो लहान बालकांपासून वयोवृध्दापर्यंत सर्वांना असतो. आज गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याची ओरड सर्व स्तरांतून ऐकू येते. आपापल्या परीने त्याची कारणे शोधण्याचे प्रयत्नही समाजधुरिणांकडून चाललेले दिसतात. परंतु आत्मसन्मान हे सुध्दा आत्महत्येमागचे एक कारण असू शकते, याचा विचार मात्र एकाही विचारवंताला अजून सुचलेला दिसत नाही. एखाद्याच्या आत्मसन्माला ठेच लागली तर त्याला आत्महत्येपासून रोखणे अशक्य आहे याचे भान आज असा प्रयत्न करणार्‍यांनी ठेवायची आवश्यकता आहे.

खाण खात्यातील घोटाळा, अधिकार्‍यांचे निलंबन आणि आत्महत्या अशा घटना आज विविध स्तरांवरून चघळल्या जात आहेत. खाण खात्यातील एक अधिकारी या सगळ्या प्रकारात संपून गेलेला आहे आणि त्याच्या मृत्यूचे राजकारण आज राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी खेळत आहेत ही खरोखरच दुर्दैवी आणि हिडीस बाब आहे. वरकरणी दत्तात्रेय भावे या अधिकार्‍यांने आत्महत्या करण्याचा वेडेपणा केला, आपल्यावर केलेले आरोप सिध्द होईपर्यंत त्याने ही टोकाची भूमिका घेता कामा नव्हते असेच आज बोलले जाते. पण एका संवेदनशील व्यक्तीच्या आत्मसन्मानाचे काय? यावर मात्र अजून कोणी बोलल्याचे दिसत नाही.

खाण खात्यात घोटाळा झालेला आहे यात शंका नाही. शहा आयोगाने खाण खात्यावर ठपका ठेवलेला आहे ही सुध्दा वास्तव घटना आहे. जेव्हा चौकशीची चक्रे फिरायला लागतात तेव्हा त्यात हस्तक्षेप होऊ नये म्हणून संबंधित अधिकार्‍यांना त्या विभागापासून तातडीने दूर करतात कारण तिथे हस्तक्षेप आणि फेरफार होण्याची शक्यता असते. पण असे करताना जी काळजी घ्यावी लागते ती घेतली जाते का? एखादे मेलेले झुरळ चिमटीत धरून सहजपणे दूर टाकावे एवढ्या सहजतेने त्या खात्यातील अधिकार्‍यांना टाकून देणे योग्य आहे काय? अशा निलंबनाने संबंधित अधिकार्‍यांच्या आत्मसन्मानास धक्का बसणार नाही का?

निलंबन झालेल्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे सोडून नकारात्मकच अधिक विचार होतो आणि नंतर सुरू होते कुत्सित बोलणे, कुत्सित हसणे आणि कुत्सित बघणे! या वातावरणातून अंग चोरून वागण्याएवढा निर्ढावलेपणा काही लोकांच्या स्वभावात नसतो. त्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना हा मनस्ताप भोगावा लागतो. तेव्हा काहींना यातून एकच उपाय दिसतो तो आत्महत्येचा. तोच सोयीस्कर वाटल्याने आज सद्सद्विवेकबुध्दी झिडकारून आत्महत्या करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो! याला दोषी ठरवायचे कोणाला? आत्मसन्मनाला ठेच लावणार्‍यांना आम्ही दोष देणार नाही का?