आत्मघाती पाऊल

0
28

रशिया – युक्रेन युद्धाच्या कालच्या नवव्या दिवशी भल्या सकाळीच वार्ता आली ती रशियाकडून युक्रेनच्या अणुप्रकल्पावरील क्षेपणास्र हल्ल्याची. अणुप्रकल्पाच्या संयंत्रांना लक्ष्य करणारा जरी हा हल्ला नसला, तरीही एखाद्या अणुप्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याची ही इतिहासातील पहिलीवहिली घटना आहे. एखाद्या अणुप्रकल्पातून किरणोत्सर्गी गळती सुरू होणे म्हणजे काय याची कल्पना युद्धखोर रशियाला नाही असे कसे म्हणायचे? छत्तीस वर्षांपूर्वी मानवी चुकीमुळे चेर्नोबिलच्या अणुप्रकल्पातून अशा प्रकारची आण्विक किरणोत्सर्गी गळती सुरू झाली, तेव्हा काय हाहाकार उडाला आणि त्यातून उद्भवणारे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम कसे आजवरही दिसून येत आहेत हे तर जगापुढे आहेच. असे असतानाही केवळ युक्रेनला नमवण्यासाठी अशा अणुप्रकल्पाच्या परिसरात थेट क्षेपणास्र हल्ला चढवणे हे खरोखरीच अतिशय बेजबाबदारपणाचे आहे.
रशियाची लष्करी कारवाई सुरू होऊन तब्बल नऊ दिवस उलटले तरीही केवळ एक शहर वगळता राजधानी कीव, खारकीव, मारियुपोलसारख्या अन्यत्र कोठेही आपला वरचष्मा त्या देशाच्या लाखोंच्या सैन्याला प्रस्थापित करता आलेला नाही. राजधानी कीवच्या वेशीबाहेरचा ६४ किलोमीटरचा रशियन सैन्याचा ताफा अजूनही राजधानीत प्रवेश करू शकलेला नाही, एवढा चिवट प्रतिकार युक्रेनकडून चालला आहे.
त्यातून आलेल्या वैफल्यातूनच रशिया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चाललेला दिसतो. आता सरळसरळ नागरी वस्त्यांना, इमारतींना बेछूटपणे लक्ष्य केले जाऊ लागले आहे. तरीही युक्रेन निर्धाराने लढतो आहे. त्यामुळे त्याला नमवण्यासाठी त्या देशाचा बहुतेक वीजपुरवठा ज्या अणुप्रकल्पातून बनणार्‍या आण्विक ऊर्जेवर चालतो, त्यावर ताबा मिळवण्यासाठी रशियाने हा हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर त्या प्रकल्पाचा ताबाही रशियाच्या सैन्याकडे गेल्याच्या बातम्या आहेत. परंतु या लष्करी कारवाईदरम्यान आण्विक दुर्घटना घडली असती तर चेर्नोबिलच्या दहा पट पर्यावरणीय हानी झाली असती आणि अख्खा युरोप त्याच्या छायेत आला असता, हाहाकार माजला असता हे लक्षात घेणे जरूरी आहे. हा केवळ युक्रेनचा सर्वांत मोठा अणुप्रकल्प नाही. संपूर्ण युरोपमधील हा सर्वांत मोठा अणुप्रकल्प आहे. त्याची क्षमता तब्बल ५७०० मेगावॅटची आहे. परिणामांची पूर्ण कल्पना असताना अशा प्रकल्पाला लक्ष्य करणे हे सैतानीपणाचे लक्षण आहे.
एकीकडे रशियाविरुद्ध पाश्‍चात्त्य राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध जारी केले आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत हे तर गेल्या आठ दिवसांत दिसून आले आहे. त्यामुळेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल हे निर्बंध अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. युरोपीय महासंघाने पाठिंब्याच्या फुकाच्या बाता न करता रशियन विमानांना आपल्या हवाई हद्दीतून उडण्यास बंदी घालावी असे आव्हानही त्यांनी दिले आहे. झेलेन्स्कींच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक जगभरातून होते आहे. रशियाच्या लष्करी कारवाईचे पहिले लक्ष्य तेच आहेत, परंतु त्याचे कोणतेही दडपण मनावर न ठेवता ते लढत आहेत. त्यांना ठार मारण्यासाठी खास पथके रशियाकडून रवाना झालेली आहेत. पण गेल्या आठ दिवसांत अशा प्रकारचे तीन हल्ले नाकाम करण्यात आले आहेत. तरीही झेलेन्स्की यांच्या जिवाला निश्‍चितपणे धोका आहे. देशाबाहेर सुरक्षित काढण्यासाठी अमेरिकेने पुढे केलेला मदतीचा हात झिडकारून झेलेन्स्की स्वतः आघाडीवरून लढत आहेत. इतिहासाला या धाडसाची आणि शौर्याची नोंद नक्कीच ठेवावी लागेल.
युक्रेनच्या एखाद्या प्रांतावर कब्जा करण्यासाठी पुतीन यांनी ही लष्करी कारवाई चालवलेली नाही. संपूर्ण युक्रेन पुन्हा रशियाशी जोडण्यासाठीची ही मोहीम आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीन यांच्याशी बोलणी केल्यानंतर रशियाचा हा मनसुबा उघड केलेला आहे. युक्रेन आज रशियाने पुन्हा बळकावले तर तेवढ्यावर तो देश नक्कीच स्वस्थ बसणार नाही. झेलेन्स्की म्हणाले त्याप्रमाणे पुढची पाळी लात्विया, लिथुआनिया, एस्टोनिया यांची असेल. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुन्हा एकवार रशिया महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने पुतीन पछाडले गेले आहेत. विघटन झालेल्या देशांना पुन्हा जोडून पुन्हा एकवार अखंड सोव्हिएत प्रजासत्ताक बनवण्याच्या दिशेने त्यांची पावले पडत आहेत. युक्रेनशी सध्या चाललेले युद्ध हे त्या देशाशी चाललेले युद्ध नव्हे. खरे युद्ध ‘नाटो’ शी चाललेले आहे. युक्रेन हे केवळ माध्यम आहे. पाश्‍चात्य जगतालाच पुतीन यांनी ललकारलेले आहे. दोन महासत्तांमधील शीतयुद्ध आता आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे ही सर्वांत चिंतेची बाब आहे.