>> मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट; डिजीटल मीटरचा वापर नाहीच; टॅक्सीचालकांकडून पर्यटकांची आर्थिक लुबाडणूक सुरुच
राज्यातील टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न ङ्गलदायी होऊ शकला नसून, आता ऍपआधारित टॅक्सी सेवा हाच पर्याय सरकारकडे शिल्लक राहिला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले. या ऍपआधारित टॅक्सी सेवेसाठी सरकारला विरोधी पक्षातील आमदारांचेही सहकार्य हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार डिलायला लोबो यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील किती टॅक्सींना सरकारने डिजिटल मीटर बसवले आहेत, असा प्रश्न लोबो यांनी विचारला होता. त्यावरील चर्चेवेळी ऍपआधारित टॅक्सी सेवा हा अखेरचा पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आम्ही दीर्घकाळाचा विचार करायला हवा. गोव्यात येणार्या पर्यटकांची जर टॅक्सीचालकांकडून लबाडणूक झाली, तर येथील पर्यटन उद्योगावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. आम्ही टॅक्सीचालकांना त्यांच्या टॅक्सींसाठी डिजीटल मीटर दिले; मात्र त्याचा वापर ते करीत नसल्याचे दिसून आले आहे. टॅक्सीत बसणार्या पर्यटकांना हे मीटर दिसू नयेत यासाठी टॅक्सीचालक मीटर झाकून ठेवत असल्याचेही दिसून आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. टॅक्सीमधून ङ्गिरणार्या पर्यटकांकडून भाड्यापोटी अव्वाच्या सव्वा पैसे घेण्याचे प्रकार चालूच राहिले, तर पर्यटनावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार असल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी ऍपसाठी एक चांगली व्यवस्था व पद्धतीचा अवलंब करावा लागेल, असे सांगितले. ऍपआधारित टॅक्सी हाच कायमचा तोडगा होऊ शकेल, असे आपणाला वाटत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या या निर्णयाविरोधात टॅक्सीचालकांनी आंदोलन पुकारले, तर त्याला विरोधी आमदारांनी पाठिंबा देऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
टॅक्सीचालक कपड्याने झाकतात मीटर
१८२४ टॅक्सीचालकांना सरकारने अनुदान दिल्यानंतर त्यांनी आपल्या टॅक्सीत डिजीटल मीटर बसवले आहेत; मात्र मीटर बसवल्यापासून हे टॅक्सीचालक सदर मीटर कपड्याने झाकत असल्याचे दिसून आले आहे. टॅक्सीचालक मीटरचा वापरच करीत नाहीत, अशा पर्यटकांच्या तक्रारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्याचा आदेश हा उच्च न्यायालयाने दिला होता, ही बाब देखील मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली.
मग मीटरसाठी अनुदान देऊन उपयोग काय?
किती लोकांनी डिजीटल मीटरच्या अनुदानासाठी अर्ज केले होते, असा प्रश्न डिलायला लोबो यांनी केला असता, २२६८ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी १८२४ जणांना अनुदान दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आता उर्वरित टॅक्सीचालकांनाही अनुदान द्या, अशी मागणी डिलायला लोबो यांनी केली. त्यावर बोलताना टॅक्सीचालक मीटरचा वापरच करीत नाहीत, मग त्यांना अनुदान देऊन उपयोग काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
दंड ठोठावला, तरी मीटरचा वापर शून्य
या चर्चेत भाग घेताना विजय सरदेसाई यांनी जे टॅक्सीचालक मीटरचा वापर करीत नाहीत, त्यांना दंड ठोठवा, अशी सूचना विजय सरदेसाई यांनी केली. तसेच डिलायला लोबो यांनीही ही सूचना केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही ३६८३ टॅक्सीचालकांना दंड दिलेला आहे; पण त्याचा ङ्गायदा काही होत नाही. आता ऍपआधारित टॅक्सी सेवा हाच एक पर्याय असल्याचे आपणाला वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.