… आणि कॅमेर्‍यात टिपली गेली रशियन दूताची हत्या

0
180

तुर्कस्थानची राजधानी अंकारात सोमवारी रात्री एका चित्रप्रदर्शनास उपस्थित राहिलेल्या रशियाच्या राजदूताची मागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ती सगळी दृश्ये एका वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने कॅमेर्‍यात टिपली. त्याच्यामुळेच या हल्ल्याचा घटनाक्रम जगासमोर येऊ शकला.

रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांना गोळ्या झाडून ठार मारणार्‍या हल्लेखोराचे नाव मेवलत मर्त अल्तिनास असे आहे. रशियासंबंधीच्या छायाचित्रांचे एक प्रदर्शन अंकारात आयोजित करण्यात आले होते. रशियाचे राजदूत त्या समारंभास उपस्थित होते. ते भाषणासाठी माईकसमोर येताच मागून सूट व टाय घातलेली एक व्यक्ती सभागृहात प्रकटली. कार्लोव्ह यांचे भाषण सुरू असतानाच बघता बघता तिने सूटखालून एक पिस्तुल काढले आणि कार्लोव्ह यांच्या दिशेने सटासट गोळ्या झाडल्या. हे दृश्य पाहताच समोर उपस्थितांचा थरकाप उडाला. काही लोक खांबांमागे दडून बसले, तर काहींनी टेबलाखाली आश्रय घेतला. मात्र, एका वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने त्या स्थितीतही एका भिंतीमागे दडून हल्लेखोराची छायाचित्रे टिपली.
कार्लोव्ह यांचा मृतदेह जमिनीवर पडला असताना हल्लेखोराने आपले पिस्तूल उपस्थितांना दाखवत घोषणाबाजी सुरू केली. तो सीरियातील अलेप्पो शहरावरील रशियन हल्ल्याचा निषेध अरबीमधून व्यक्त करीत होता. अल्लाहू अकबर अशा घोषणाही त्याने यावेळी दिल्या. सुरक्षा रक्षकांनी त्वरित हालचाली करून उपस्थितांना तेथून बाहेर काढले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत हल्लेखोराला गोळ्या झाडून ठार मारले.