32 C
Panjim
Sunday, April 18, 2021

आठवणीतील प्राचार्य सुरेंद्र शिरसाट

  • ज. अ. रेडकर
    (सांताक्रूझ)

मला समवयस्क असणारा हा वसंतपुत्र यंदाच्या वसंतोत्सवाच्या प्रारंभदिनी स्वर्गवासी झाला. एक बहुआयामी, निगर्वी, अजातशत्रू असा एक मित्र मी गमावला. त्यांच्या सहवासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले.

कालच्या (दि.२९ मार्च) वर्तमानपत्रातून प्राचार्य सुरेंद्र शिरसाट अत्यवस्थ असल्याचे व त्यांना एका खाजगी इस्पितळात दाखल केल्याचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले होते आणि तेव्हांच शंकेची पाल मनात चुकचुकली होती. आजच्या
(३०मार्च) वर्तमानपत्रातून त्यांच्या निधनाची बातमी आली आणि मन हळहळले. त्यांच्या सहवासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले. १९८५ साली पणजीहून माझी बदली बार्देस तालुक्याचा तालुका शिक्षणाधिकारी या पदावर झाली होती. त्याच दरम्यान त्यांची व माझी प्रत्यक्ष भेट झाली ती त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने! तेव्हापासून ते अगदी गेल्या दोन वर्षापर्यन्त त्यांच्या माझ्या भेटीगाठी कुठे ना कुठे होतच होत्या. मात्र कोरोना काळात या भेटी पूर्णपणे मंदावल्या होत्या. त्यांचे स्थानिक वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध व्हायचे आणि ते वाचल्यानंतर फोनाफोनी व्हायची तेवढीच!

शारीरिक उंची ठेंगणी ठुसकी असली तरी बौद्धिक उंची गोव्यातील सर्वोच शिखराच्या ससो गडासारखी असणारा हा सुदृढ प्रकृतीचा माणूस कधी आजारी पडल्याचे ऐकिवात आले नाही. ज्या संस्थेत ते प्राचार्य होते, त्या ठिकाणी त्यांचा प्रचंड दरारा होता. विद्यार्थी असोत किंवा कर्मचारीवर्ग, त्यांची जरा जरी चाहूल लागली तरी सर्वत्र शांतता पसरायची. त्यांचा गडगडाट करणारा आवाज आणि तसेच मोकळे हसणे ही त्यांची खासियत होती. गोवा विधानसभेचे सभापती असताना सभागृहात त्यांचा आवाज दुमदुमून जायचा. सभागृहात देखील ते प्राचार्याची भूमिका बजावयाचे. नियमभंग करणार्‍या आमदारांना गोंधळ घालण्यापासून ते परावृत्त करायचे. सभापति म्हणून त्यांचे निवाडे आज देखील सभागृहासाठी मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. विशेषतः आपल्याच
एकेकाळच्या सहकार्‍यांना अपात्र ठरविण्याचा एक कठीण प्रसंग त्यांच्यावर आला. पण ते डगमगले नाहीत. त्यांचा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. कायद्यापुढे सर्व समान हे त्यांचे धोरण होते. पुढे त्यांच्या या निर्णयाला संबंधितांनी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि सभापतींनी दिलेला निवाडा कायदेशीर ठरविण्यात आला. या निर्णयाने त्यांची प्रतिमा अधिक झळाळून उठली. त्यांच्या एकूण कारकीर्दीत त्यांच्यावर कोणताही ठपका आला नाही. राजकारणात प्रा. शिरसाट यांच्यासारखा शुद्ध चारित्र्याचा व निष्कलंक नेता मिळणे ही दुर्मीळ गोष्ट आहे.

शिक्षण, सहकार, धार्मिक संस्था आणि राजकारण या चारही क्षेत्रात त्यांनी लीलया वावर केला. प्रत्येक गोमंतकीयाच्या रक्तात कोणती ना कोणती कला भिनलेली असते. सुरेंद्र शिरसाट हे देखील याला अपवाद नव्हते. ते उत्तम नाट्यकलाकार होते. म्हापसा येथे धार्मिक उत्सवाच्यावेळी होणार्‍या अनेक नाटकातून त्यांनी भूमिका वठवल्या. प्राचार्य पदावरून निवृत्त होईस्तोवर त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेला सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले होते. दर वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे अधिकांश विद्यार्थी गुणवत्ता यादीत यायचे. (कालांतराने गुणवत्ता यादी जाहीर करायचे शिक्षण मंडळाने बंद केले) राज्यातील एक उत्तम शिक्षण संस्था अशी त्यांच्या संस्थेची वाखाणणी संपूर्ण गोव्यात होत आहे याचे कारण प्रा. शिरसाट यांनी या संस्थेसाठी दिलेले भरीव योगदान हे कुणीही नाकारू शकणार नाही. आसगावाच्या टेकडीवर अतिशय सुरेख आणि प्रशस्त इमारत त्यांच्या कार्यकाळात ऊभी राहिली, विस्तारीत झाली. पुढे पूर्ण दर्जाचे महाविद्यालय त्या परिसरात सुरु झाले. संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्यातील सलोखा आणि ताळमेळ अन्य ठिकाणी सापडणे दुर्मीळ जो या संस्थेत आढळायचा!
सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळे गरीबांच्या दुःखांची त्यांना जाणीव होती. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रत्येक सुरुवात अगदी छोट्या कामापासून व्हायची आणि नंतर ते त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान पटकावयचे. नोकरीची सुरुवात प्राथमिक शिक्षक म्हणून ज्या संस्थेत केली त्याच ज्ञानप्रसारकसारख्या गोव्यातील प्रख्यात संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते प्राचार्य बनले. तब्बल वीस वर्षे त्यांनी प्राचार्यपद भूषविले. आपल्या ज्ञानकौशल्याने व धडाडीने विद्यालय नावारूपाला आणले. ज्या स्थानिक पक्षाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून १९७५ साली राजकीय वाटचाल सुरु केली त्याच पक्षाचे ते १९९१ ते २००० सालपर्यंत नऊ वर्षे अध्यक्ष राहिले. म्हापसा सहकार संस्था स्थापन करणार्‍यापैकी ते एक सदस्य आणि कालांतराने ते त्या संस्थेचे अध्यक्ष बनले. १९७७ साली आमदार झाले. आणि पुढे गोवा विधानसभेचे सभापति झाले. म्हणजेच ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला तेथील अत्युच्च शिखर त्यांनी गाठले. या सर्व क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. परंतु उच्चपदी पोहोचूनदेखील त्यांच्या मनाला ना अहंकाराचा वारा शिवला ना त्यांना गर्व झाला.

१९९९ मध्ये माझ्या चिरंजीवाला त्यांच्या उच्च माध्यमिकमध्ये प्रवेश घ्यायचा होता. काही अपरिहार्य कारणास्तव त्याचा प्रवेश घेणे दोन महिने लांबले होते. प्रवेश घेण्याची मुदत संपली होती. सर्व जागा भरल्या होत्या. शिक्षणखात्याने त्यांच्यावर ठराविक संख्येच्या विद्यार्थी प्रवेशांचे बंधन घातले होते. मी प्रवेश अर्ज भरायला म्हणून गेलो. त्यांच्यापुढे धर्मसंकट उभे राहिले. कारण मी शिक्षण खात्यातील व्यक्ती आणि शिवाय परस्परातील मैत्रीचे संबंध ! त्यांची मोठीच पंचाईत झाली. ते म्हणाले, अहो साहेब, तुमच्याच खात्याने आमच्यावर ठराविक संख्येपेक्षा अधिक मुलांना प्रवेश द्यायचा नाही असे बंधन घातले आहे. तुम्ही शिक्षण संचालकांची परवानगी आणा, आम्ही प्रवेश देऊ. अर्थात ही गोष्ट माझ्यासाठी फारच सोपी होती. त्यावेळच्या शिक्षण संचालिका श्रीमती सुमन पेडणेकर यांनी विशेष कोट्यातून प्रवेशाची मान्यता दिली आणि चिरंजीवाच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला.
२००४ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी शिक्षणखात्यातून निवृत्त होणार होतो. त्या निमित्ताने माझ्या वाढदिनी कर्मचारी वर्गाने बडा खाना आयोजित केला होता. या समारंभाला त्यावेळचे शालांत मंडळाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग नाडकर्णी यांच्यासह प्राचार्य शिरसाट हे देखील आवर्जून उपस्थित राहिले होते आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दुसरा प्रसंग आठवतो तो म्हणजे माझा मुलगा संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत गेला होता तो २०१३ साली सुट्टीवर घरी आला होता. त्याला घेऊन मी त्यांच्या घरी भेटीला गेलो होतो. आपला एक विद्यार्थी अभियंता होऊन अमेरिकेत गेला याचा त्यांना कोण आनन्द झाला. पुढे २०१५ साली या मुलाचे लग्न ठरले. त्याची निमंत्रणपत्रिका त्यांना दिली. आपली सर्व कामे बाजूला ठेवून, शिरसाटसर विवाह समारंभाला हजर राहिले आणि त्यांनी नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले.
मला समवयस्क असणारा हा वसंतपुत्र यंदाच्या वसंतोत्सवाच्या प्रारंभदिनी स्वर्गवासी झाला. एक बहुआयामी, निगर्वी, अजातशत्रू असा एक मित्र मी गमावला. शोकाकुल मनाची सांत्वना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवद् गीतेत पुढील श्लोक सांगितला आहे. त्याचे स्मरण करणे या प्रसंगी उचित ठरेल.

ओम् नैनं छिदन्ति शस्त्राणि,
नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो,
न शोषयति मारुतः ॥

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

पौर्णिमा केरकर ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून...